ड्रिंकवॉटर, जॉन : (१ जून १८८२–२५ मार्च १९३७). इंग्रज कवी, नाटककार आणि समीक्षक. जन्म लेटनस्टोन, एसेक्स येथे. शिक्षण ‘ऑक्सफर्ड स्कूल’ मध्ये. काही वर्षे एका विमा कंपनीत नोकरी केल्यानंतर ‘पिल्‌ग्रिम प्लेअर्स’ ह्या नाट्यसंस्थेकडे व्यवस्थापक आणि निर्माता म्हणून काम करू लागला. ह्याच नाट्यसंस्थेचे पुढे ‘बर्मिंगॅम रेपर्टरी थिएटर’ ह्या संस्थेत रूपांतर झाले आणि तिने ड्रिंकवॉटरची काही नाटके रंगभूमीवर आणली.

पोएम्स (१९०६) हा त्याचा पहिला काव्यसंग्रह. त्यानंतर त्याचे अनेक काव्यसंग्रह बाहेर पडले. त्याची संकलित कविता १९२३ मध्ये प्रसिद्ध झाली. विसाव्या शतकाच्या पहिल्या दशकात आधुनिक इंग्रजी कवितेला व्यापक वाचकवर्ग मिळवून देण्यासाठी एकत्र आलेल्या आणि ‘जॉर्जियन कवी’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कवींपैकी ड्रिंकवॉटर हा एक. त्याचे काव्यकर्तृत्व विशेष उल्लेखनीय नाही. कॉपेच्युआ  ही त्याची पहिली नाट्यकृती पद्यमाध्यमातून लिहिलेली होती. त्यानंतर त्याने आणखी काही पद्यनाटके लिहिली. शेक्सपिअरच्या काळानंतर पद्यनाटकाला पुन्हा लोकाश्रय मिळवून देणाऱ्यांमध्ये ड्रिंकवॉटरच्या नावास निश्चित स्थान आहे. १९११ ते १९१६ ह्या कालखंडात त्याने जी पद्यनाटके लिहिली, ती आधुनिक प्रेक्षकाला समजतील अशा सुगम, भावोत्कट पद्यात. शिवाय ती छोटी असल्यामुळे लोकप्रिय झाली. तथापि अब्राहम लिंकन (१९१८) ह्या त्याच्या ऐतिहासिक नाटकाने त्याला विशेष प्रसिद्धी मिळवून दिली. ह्यांखेरीज विल्यम मॉरिस, स्विन्‌बर्ग ह्यांसारख्या इंग्रज कवींवर त्याने समीक्षात्मक ग्रंथ लिहिले. त्याचे आत्मचरित्र इन्‌हेरिटन्स (१९३१) आणि डिस्कव्हरी (१९३२) ह्या दोन खंडांत प्रसिद्ध झाले आहे. लंडनमध्ये तो निधन पावला.

वानखडे, म. ना.