हेन्ली, विल्यम अर्नेस्ट : (२३ ऑगस्ट १८४९–११जुलै १९०३). प्रसिद्ध इंग्रज कवी, समीक्षक व संपादक. त्याचा जन्म ग्लुसेस्टर (इंग्लंड) येथे सामान्य कुटुंबात झाला. त्याने प्राथमिक शिक्षण घेऊन क्रिप्ट ग्रामर स्कूलमध्ये टी. इ. ब्राउन या प्रसिद्ध कवीच्या हाताखाली शिक्षण घेतले. विद्यार्थिदशेतच त्याला क्षयरोगाचा संसर्ग झाल्यामुळे अपंगत्व आले आणि डावा पाय कापावा लागला (१८६५). उजवापायही गमवावा लागेल अशी परिस्थिती निर्माण झाल्यावर तो एडिंबरो येथील डॉ. जोसेफ लिस्टर या निष्णात शल्यविशारदाच्या रुग्णालयातदाखल झाला (१८७३–७५). तेथील दीर्घकालीन वास्तव्यात त्याने ‘इन्व्हिक्टस’ ही त्याची प्रसिद्ध कविता लिहिली. यातील दवाखान्यातीलकोंदट वातावरण, कर्मचारीवर्ग, इतर प्रौढ रुग्ण, बालरुग्ण, भेट देणाऱ्या व्यक्ती तसेच जीवन व मृत्यू यांवरील चिंतन प्रकट करतात. पुढे या सर्व कविता अ बुक ऑफ व्हर्सेस (१८८८) मध्ये प्रसिद्ध झाल्या. याच काळातील सुप्रसिद्ध ‘इन्व्हिक्टस’ या कवितेचा शेवट आहे : ‘आय् ॲम द मास्टर ऑफ माय फेट आय् ॲम द कॅप्टन ऑफ माय सोल’. 

 

विल्यम अर्नेस्ट हेन्ली
 

हेन्लीच्या कविता कार्नहिलनियतकालिकामध्ये प्रसिद्ध करणारे ⇨ लेस्ली स्टीव्हन हे एडिंबरोला व्याख्यानानिमित्त गेले असता त्यांनी हेन्लीची रुग्णालयात भेट घेतली. त्यांच्यासोबत सुप्रसिद्ध इंग्रजी लेखक ⇨ रॉबर्ट लूई स्टिव्हन्सन होते. त्यांच्याशी हेन्लीची मैत्री जमली. ती पुढे अखेरपर्यंत राहिली. स्टीव्हन्सननी ट्रेझर आयलंड या आपल्या कादं-बरीत हेन्लीवर बेतलेल्या लाँग जॉन सिल्व्हर या अपंग परंतु दिलदार पात्रामध्ये हेन्लीची व्यक्तिरेखा आढळते. स्टीव्हन्सनमुळे हेन्लीला एन्सायक्लोपीडिया ब्रिटानिका च्या नवव्या आवृत्तीसाठी फ्रेंच साहित्यावर नोंदी लिहिण्याचे काम मिळाले. 

 

हेन्लीचा विवाह ॲना बॉइल हिच्याशी झाला (१८७८). त्यांना मार्गारेट एमा नावाची कन्या झाली पण तिचे सहाव्या वर्षीच निधन झाले. पुढे जे. एम्. बॅरी यांच्या मुलांसाठीच्या पिटर पॅन या अभिजात कादंबरीतील ‘वेंडी’ या पात्राद्वारे ती अमर झाली. 

 

स्टीव्हन्सन व हेन्ली या दोघांनी मिळून काही नाटकेही लिहिली. हेन्लीचे काही कवितासंग्रह पुढीलप्रमाणे : लंडन व्हालंटरीज (१८९३), पोएम्स (१८९८), हॉथॉर्न अँड लव्हेंडर (१८९९), फॉर इंग्लंड्स सेक (१९००) आणि अ साँग ऑफ स्पीड (१९०३). हेन्लीने चार नियतकालिकांचे संपादन केले. सुरुवातीस लंडन या अल्पकाळटिकलेल्या नियतकालिकाचे संपादन केले (१८७७). त्यानंतर त्याने मॅगझीन ऑफ आर्ट या मासिकाच्या संपादनाची धुरा १८८२–८६ दरम्यान वाहिली.द स्कॉट्स ऑब्जर्व्हर (द नॅशनल ऑब्जर्व्हर) या नियतकालिकाच्या संपादकपदी त्याची नियुक्ती झाली (१८८९). १८८९–९४ या काळात त्याने अनेक इंग्रजी लेखकांना प्रकाशात आणले. त्यांपैकी रड्यर्डकिपलिंग या लेखकाची ‘द बरॅक रूम बॅलड्स’ ही कविता द नॅशनल ऑब्जर्व्हर मध्ये छापली. शिवाय येट्स, एच्. जी. वेल्स यांच्या लेखनालाही त्याने या नियतकालिकात प्रसिद्धी दिली. नियतकालिकांबरोबर त्यानेअनेक साहित्यकृतींच्या संपादनाचे मौलिक काम केले. 

 

समीक्षक म्हणून स्वतःच्या नियतकालिकांबरोबरच हेन्लीने द अथिनिअम, द सॅटरडे रिव्ह्यू, व्हॅनिटी फेअर, सेंट जेम्स गॅझेट आणि द पॉल मॉल गॅझेट या नियतकालिकांसाठी लेखन केले. १८९० मध्ये त्याने व्ह्यूज अँड रिव्ह्यूज : एसेज इन ॲप्रिसिएशन हा समीक्षाग्रंथ लिहिला. यात अनेक लेखक व कलाकारांविषयी चिकित्सक लेखन आहे. तो सौंदर्यवाद्यांच्या विरोधी लिहीत होता, तरी कलेच्या स्वायत्ततेवर त्याची अढळ निष्ठा होती आणि त्याने आपल्या नियतकालिकांमध्येलेखकांना त्यांचे विचार निर्भीडपणे मांडण्याचे पूर्ण स्वातंत्र्य दिले होते. एकोणिसाव्या शतकात मुक्तछंदात काव्यलेखन केलेल्या हेन्लीने आधुनिक कवितेची नांदी करण्याचे महान काम केले. 

 

द पोएट्री ऑफ रॉबर्ट बर्न्‌स (१८९७), इन्व्हिक्टस आणि ए साँग ऑफ लंडन (देशभक्तिपर काव्य) यांमुळे त्याची वाङ्मयीन क्षेत्रात कीर्ती झाली तथापि बर्न्स या व्यक्तीच्या वास्तव शब्दचरित्रामुळे स्कॉटिश वाचक दुखावले गेले. 

 

क्षयाच्या व्याधीनेच त्याचे लंडनमध्ये निधन झाले. 

 

संदर्भ : 1. Buckley, Jerome Hamilton, William Ernest Henley : A Study in the Counter-Decadence of the Nineties, London, 1945.

            2. Frawley, Maria H. Invalidism and Identity in Nineteenth Century Britain, London, 2004. 

सावंत, सुनील