ऑस्टेन, जेन : (१६डिसेंबर १७७५–१८जुलै १८१७). इंग्रजी स्त्री-कादंबरीकार. जन्म इंग्लंडमधील स्टीव्हंटन येथे. ऑक्सफर्ड, साउथॅम्टन आणि रेडिंग ह्या ठिकाणी तिने थोडेसे शिक्षण घेतले असले, तरी तिचे बहुतांश शिक्षण घरीच झाले. स्टीव्हंटन आणि बाथ येथे काही काळ घालविल्यानंतर ती आपल्या कुटुंबियांसमवेत हँपशर परगण्यातील चॉटन येथे जाऊन राहिली. त्यानंतर मृत्यूपूर्वीचे दोन महिने सोडल्यास तिचे स‌र्व आयुष्य येथेच गेले. ती अविवाहित होती.

जेन ऑस्टेन

सेन्स अँड सेन्सिबिलिटी  (१८११), प्राइड अँड प्रेज्युडिस (१८१३), मॅन्सफील्ड पार्क (१८१४), एमा  (१८१६) र्स्वेशन आणि नॉर्‌जँर ॲबी (१८१८) या तिच्या सहा कांदबऱ्या.

तिचे इतरही काही लेखन प्रसिद्ध करण्यात आले आहे. त्यात तिने अगदी आरंभीच्या काळात केलेले, तसेच त्रुटितावस्थेत आढळणारे काही लेखन आहे. तथापि ते फारसे महत्त्वाचे नाही.

तिच्या कादंबऱ्यांचे अनुभवविश्व मर्यादित आहे. त्यात सर्वसामान्य घटनाच आढळतात. तथापि त्यांतून तिने केलेले मनुष्यस्वभावाचे चित्रण इतके सूक्ष्म आणि कलात्मक आहे, की तिच्या प्रतिभेने निर्माण केलेली प्रत्येक व्यक्ती वाचकांच्या मनाची पकड घेते. तसेच नानाविध व्यक्तिरेखांची गर्दी असूनही वाचकांच्या मनाचा गोंधळ होत नाही. व्यक्तिरेखनासाठी संभाषणांचा उपयोग तिने कौशल्याने केला आहे. मनुष्यस्वभावातील दोष उलगडून दाखविताना तिची शैली अतिशय मार्मिक आणि उपहासप्रधान होते. तथापि आपल्या कांदबऱ्यांतील व्यक्तींचे आणि घटनांचे विश्लेषण करीत असताना कलावंताचा अलिप्तपणा ती सोडीत नाही.

जीवनाचे तत्त्वज्ञान किंवा नीती यांची चिकित्सा तिने कटाक्षाने टाळली आहे. तसेच आजूबाजूच्या ऐतिहासिक, राजकीय घटनांच्या आणि कलासंप्रदायांच्या बाबतीतही तिने लक्षणीय उदासीनता दाखविली आहे. तिच्या काळी यूरोपच्या रणक्षेत्रावर नेपोलियनच्या नेतृत्वाखालील फ्रान्सशी इंग्लंडचा तीव्र संघर्ष चालू झाला होता. पण जेन ऑस्टेनच्या कांदबऱ्यांतून या घटनेची पुसटशी दखलही घेतलेली दिसत नाही. अधूनमधून रजेवर आलेले आणि गावोगाव भटकत असलेले शिपाईगडी तेवढे डोकावतात. वर्ड्‌स्वर्थ, कोलरिज यांसारख्या समकालीनांच्या स्वच्छंदतावादाने तिच्या लेखनावर कसलाही परिणाम घडवून आणला नाही. क्षयाच्या विकाराने विंचेस्टर येथे ती निवर्तली.

संदर्भ : 1. Chapman, R. W. Jane Austen, Facts and Problems, Oxford, 1948.

2. Lascelles, M. Jane Austen and Her Art, Oxford, 1939.

3. Wright, A. Jane Austen’s Novels : A Study In Structure, London, 1953.

  कुलकर्णी, वि. ह.