टॉमसन, जेम्स–१(११ सप्टेंबर १७००–२७ ऑगस्ट १७४८). स्कॉटिश कवी. इंग्रजीतून लेखन. जन्म एडनॅम, रॉक्सबरो येथे. एडिंबरो विद्यापीठात काही काळ शिक्षण घेतल्यानंतर तो लंडनला आला (१७२५). तेथे असतानाच त्याचेद सीझन्स(४ भाग, १७२६–३०) हे काव्य प्रसिद्ध झाले. निर्यमक छंदात रचिलेल्या ह्या काव्यात चार ऋतूंचे– ‘विंटर’,‘समर’, ‘स्प्रिंग’आणि ‘ऑटम’–हृदयंगम वर्णन आलेले आहे. प्रत्येक ऋतूस अनुकूल अशा भावांची जागृती टॉमसन समर्थपणे घडवून आणतो. पोप आदी समकालीन नवअभिजाततावादी कवींहून टॉमसनची संवेदनशीलता काहीशी वेगळी होती. टॉमसनच्या काळातील इंग्रजी कविता कलात्मक निसर्गवर्णनांना पारखी झालेली असतानाद सीझन्स मधून टॉमसनने घडविलेले निसर्गदर्शन आणि दिलेला भावप्रत्यय इंग्रजी काव्यातील एका लक्षणीय नवप्रवृत्तीचा द्योतक होता. तथापि नित्युपदेशाची व मानवजातीसंबंधी सर्वसाधारण स्वरूपाची विधाने करण्याची नव-अभिजाततावादी कवींची प्रवृत्ती टॉमसनमध्येही आहेच. टॉमसनच्या शब्दकळेवर मिल्टनचा प्रभाव आहे. अठराव्या शतकाच्या उत्तरार्धात इंग्रजी साहित्यात उदयास आलेल्या स्वच्छंदतावादी संप्रदायाच्या काव्याची पूर्वचिन्हे टॉमसनच्या काव्यात काही समीक्षकांना जाणवतात. ‘ द कासल ऑफ इंडोलन्स’ही टॉमसनची दुसरी उल्लेखनीय कविता ९ ओळींच्यास्पेन्सरिअन वृत्तात लिहिलेली असून तिच्यावर स्पेन्सरचा प्रभाव आहे.यांशिवाय ‘रूल! ब्रिटानिया’, ‘लिबर्टी’ ह्यांसारख्या कविता आणि काही नाटकेत्याने लिहिली. तत्कालीन वैज्ञानिक प्रगतीबद्दल त्याला आस्था होती. ‘पोएमसेक्रिड टू द मेमरी ऑफ सर आय्‌झॅक न्यूटन’ ही त्याची कविता त्या दृष्टीने उल्लेखनीय आहे.

रिचमंड येथे तो निधन पावला. १७५० मध्ये त्याचे समग्र साहित्य ४ खंडांत प्रसिद्ध झाले.

संदर्भ1. Hill, G. B. Ed.Lives of the Poets, Vol. III, Oxford, 1905.

         2. McKillop, A. D.The Background of Thomson’s ‘ Seasons,’Minneapolis, 1942.

           3. Robertson, J. L.Poetical Works of James Thomson, London, 1908.

देवधर, वा. चिं.