मुर, टॉमस : (२८ मे १७७९–२५ फेब्रुवारी १८५२). आयरिश कवी व संगीतकार, रचना इंग्रजीतून, डब्लिनमध्ये जन्मला. डब्लिनच्या ट्रिनिटी कॉलेजातून पदवीधर (१७९९) नंतर लंडनला येऊन कायद्याचा अभ्यास, वकील होऊनही वकिलीचा व्यवसाय त्याने कधी केला नाही. आयरिश मेलडीज (दहा भाग, १८०७–३४) हा त्याचा प्रमुख काव्यग्रंथ, आयर्लंड ह्या आपल्या जन्मभूमीबद्दलचे अपार प्रेम आणि आयरिश संगीत ह्या मुरच्या आयरिश मेलडीजमागील दोन महत्त्वाच्या प्रेरणा होत्या. आयरिश मेलडीजमधील कवितांना मुरने आणि सर जॉन स्टीव्हन्सन ह्या त्याच्या सहकाऱ्याने संगीत दिले होते. ह्या कवितांना खूप लोकप्रियता मिळाली आणि मुर हा आयर्लंडचा राष्ट्रीय गीतकार म्हणून ओळखला जाऊ लागला. लल्ला रूख (१८१७) ह्या पौर्वात्य वातावरण असलेल्या कथाकाव्याने मुरला विशेष कीर्ती प्राप्त करून दिली. विख्यात इंग्रज कवी लॉर्ड बायरन ह्याच्याशी त्याची मैत्री होती. बायरनने त्याला आपल्या संस्मरणिका दिल्या होत्या परंतु त्या नष्ट करून टाकणे त्याला उचित वाटले व त्याने तसे केले. पुढे त्याने बायरनची पत्रे आणि रोजनामे प्रसिद्ध केले (लेटर्स अँड जर्नल्स ऑफ लॉर्ड बायरन, १८३०). विल्टशर येथे तो मरण पावला.

कुलकर्णी, अ. र.