आर्थर मिलर

मिलर, आर्थर : (१७ ऑक्टोंबर १९१५ –     ) विख्यात अमेरिकन नाटककार, जन्म न्यूयॉर्क शहरी. त्याच्या वडिलांचा एक छोटा धंदा होता. महामंदीच्या काळात त्या धंद्यावर आर्थिक अरिष्ट आल्यामुळे, मिलरला बालपणी कठीण दिवसांना तोंड द्यावे लागले. शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर (१९३२) मिलरला दोन वर्षे नोकरी करावी लागली. त्यानंतर त्याने मिशिगन विद्यापीठात पुढील शिक्षणासाठी प्रवेश घेतला. तेथे शिकत असतानाच त्याने नाट्यलेखन करावयास सुरुवात केली. द मॅन हू हॅड ऑल द लक (१९४४) हे ब्रॉडवे रंगभूमीवर आलेले त्याचे पहिले नाटक, तथापि नाटककार म्हणून त्याला कीर्ती मिळाली ती ऑल माय सन्स (१९४७) ह्या त्याच्या नाटकामुळे. ह्या नाटकास ‘न्यूयॉर्क ड्रामा क्रिटिक्स सर्कल’ चे पारितोषिकही मिळाले. इब्सेनचा काही प्रभाव ह्या नाटकावर जाणवतो. त्यानंतरचे डेथ ऑफ ए सेल्समन (१९४९) हे नाटक अमेरिकन रंगभूमीवर तर गाजलेच परंतु त्याला आंतरराष्ट्रीय कीर्तीही प्राप्त झाली. ह्या नाटकास ‘न्यूयॉर्क ड्रामा क्रिटिक्सज सर्कल’ च्या पारितोषिकाबरोबर पुलिट्‌झर पारितोषिकही मिळाले (१९४९). विली लोमन ह्या एका फिरत्या विक्रेत्याच्या आयुष्याची शोकांत्मिका प्रभावीपणे उभी करणाऱ्या ह्या नाट्यकृतीत वर्तमानकाळ आणि भूतकाळ ह्यांचे मिश्रण अभिव्यक्तिवादी तंत्राने निर्माण केलेल्या देखाव्यांतून, प्रत्यकारीपणे करण्यात आले आहे. अमेरिकन समाजाने जोपासलेल्या काही सदोष जीवनमूल्यांचा स्वीकार केल्यामुळे विली लोमनचा दुःखद अंत घडून येतो. द क्रुसिबल (१९५३), ए व्ह्यू फ्रॉम द ब्रिज (१९५५), ए मेमरी ऑफ टू मंडेज (एकांकिका, १९५५), आफ्टर द फॉल (१९६४), द प्राइस (१९६८) आणि द अमेरिकन क्लॉक (१९८०) ह्या मिलरच्या अन्य उल्लेखनीय नाट्यकृती, द क्रुसिबल हे राजकीय रूपक आहे. १९५० नंतर अमेरिकेत कम्युनिस्टद्वेषाची लाट उसळली होती आणि संशयित कम्युनिस्टांना आणि कम्युनिष्ट विचारसरणीबद्दल सहानुभूती असलेल्यांना त्रास देण्याचे जे सत्र सुरू झाले होते, त्यावर मिलरने रूपकात्मक पद्धतीने टीका केली आहे, खुद्द मिलरलाही संशयित कम्युनिस्ट म्हणून वागवण्यात आले होते, ही बाब ह्या संदर्भात लक्षणीय ठरते. ए व्ह्यू फॉर्म द ब्रिज ही स्वतःच्या पुतणीवर प्रेम करणाऱ्या एडी कार्बोन नावाच्या एका माणसाच्या जीवनाची शोकात्मिका होय. ए मेमरी….. मध्ये, एका कारखान्यात काम करणाऱ्या कामगारांच्या यांत्रिक, पोकळ जीवनाचे दर्शन घडविले आहे. मानवी नातेसंबंधांच्या जपणुकीत येणाऱ्या अपयशाचे चित्रण आफ्टर द फॉलमध्ये असून स्वतःच्या व इतरांच्या संदर्भातील जबाबदारीची जाणीव व अपराधभावना हा विषय, दोन भावांच्या ताणलेल्या संबंधातून द प्राइसमध्ये मांडला आहे. महामंदीचे परिणाम हा द अमेरिकन क्लॉकचा विषय. हे नाटक अंशतः आत्मचरित्रात्मकही आहे.

मिलरने तीन विवाह केले. त्यापैकी दुसरा, जगद्‌विख्यात चित्रपट अभिनेत्री मेरीलिन मन्रो हिच्याशी केलेला होता (१९५६). त्यानंतरच्या काळात त्याने तिची भूमिका असलेल्या द मिसफिट्‌स (१९६१) ह्या चित्रपटाचे लेखन केले.

फोकस (१९४५) ही त्याची कादंबरी. आय डोंट नीड यू एनी मोअर (१९६७) हा त्याचा कथासंग्रह. दूरचित्रवाणीसाठीही त्याने लेखन केले आहे.

संदर्भ : 1. Clurman, H. Ed. The Portable Arthur Miller, Baltimore, 1977.

2. Ferres, J. Ed. Twentieth Century Interpretations of the Crucibile, New York, 1972.

3. Hayman, R. Arthur Miller, New York, 1972,

4. Hitchens, G. Attention Must be paid: A study of Social Values in Four Plays by Art Miller, New York, 1962.

5. Hogan, R. Arthur Miller, Minneapolis, 1964.

6. Huftel, S. Arthur Miller, New York, 1967.

7. Moss, L. Arthur Miller, New York, 1967.

8. Murray, E. Arthur Miller, Dramatist. New York, 1967.

9. Nelson, B. Arthur Miller : Portrait of a Playright, New York, 1970.

10. Welland, D. Arthur Miller, New York, 1961.

कुलकर्णी, अ. र.