प्रीस्टली, जॉन बॉईंटन : (१३ सप्टेंबर १८९४ – ). ब्रिटिश कादंबरीकार, नाटककार, निबंधलेखक, समीक्षक व समालोचक. जन्म यॉर्कशरमधील ब्रॅडफर्ड येथे. वडील शिक्षक. उच्च शिक्षण केंब्रिज विद्यापीठात. पहिल्या महायुद्धाच्या वेळी लष्करी सेवा केली व दुसऱ्या महायुद्धाच्या काळात आकाशवाणी समालोचक म्हणून काम केले. प्रीस्टलीने सॅटर्डे रिव्ह्यू या विख्यात साप्ताहिकात लेखनास प्रारंभ केला. त्याच्या दीर्घ वाड्‌मयीन कारकीर्दीच्या प्रारंभीच्या काळात फिगर्स इन मॉडर्न लिटरेचर (१९२४), द इंग्लिश कॉमिक कॅरॅक्टर्स (१९२५), द इंग्लिश नॉव्हेल (१९२७), इंग्लिश ह्यूमर (१९२८) या ग्रंथांनी रसज्ञ समीक्षक म्हणून त्याचे नाव झाले. पुढे कादंबरी आणि नाटक या क्षेत्रांतही त्याने चांगले यश संपादन केले. द गुड कंपॅनिअन्स (१९२९) आणि एंजल पेव्हमेंट (१९३०) या कादंबऱ्या लोकप्रिय झाल्या. पहिल्या कादंबरीत एका हौशी नाटकमंडळीच्या भ्रमंतीचे हृद्य चित्रण आले आहे, तर दुसऱ्या कादंबरीत लंडनमधील व्यापारी विश्वाचे दर्शन घडविले आहे. यानंतर लिहिलेल्या कादंबऱ्यात फेस्टिव्हल ॲट फारब्रिज (१९५१), सॉल्ट इज लीव्हिंग (१९६६) यांसारख्या कादंबऱ्यांचा विशेष उल्लेख करता येईल. प्रीस्टलीचे कादंबरीलेखन हे हेन्री फील्डिंग, चार्ल्स डिकिन्झ या पूर्वसूरींच्या दमदार परंपरेमध्ये बसणारे आहे.

द गुड कंपॅनिअन्स या कादंबरीवरून त्याने आपले पहिले नाटक १९३१ साली लिहिले. त्यानंतर हलकीफुलकी , गंभीर, प्रयोगशील अशी सर्व प्रकारची तीस नाटके त्याने लिहिली. त्यांत डेंजरस कॉर्नर (१९३२), लॅबर्नम ग्रव्ह (१९३३), टाइम अँड द कॉनवेज (१९३७), आय हॅव बीन हिअर बिफोर (१९३७), जॉन्सन ओव्हर जॉर्डन (१९३९), अँन इन्स्पेक्टर कॉल्स (१९४६) ही नाटके उल्लेखनीय होत. प्रीस्टलीने आपल्या नाटकांतून सामान्य माणसांच्या आशा-आकांक्षांचा वेध अभिनव पद्धतीने घेण्याचा प्रयत्न केला. डेंजरस कॉर्नर या त्याच्या पहिल्या स्वतंत्र नाटकाची रचना सुबक व कौशल्यपूर्ण आहे तीत रंगभूमीच्या सर्व तांत्रिक अंगांची उत्तम जाण दिसते. टाइम अँड द कॉनवेज, आय हॅव बीन हिअर बिफोर, जॉन्सन ओव्हर जॉर्डन या प्रयोगशील नाटकांसाठी प्रीस्टलीने जॉन डन या तत्त्वज्ञाने मांडलेल्या काळविषयक सिद्धांताचा आधार घेतला आहे. जॉन्सन ओव्हर जॉर्डन या नाटकात एक सामान्य मनुष्य मृत्युनंतर आपल्या आयुष्यातील महत्त्वाच्या घटना कालनिरपेक्ष पटावर अनुभवतो आहे, अशी कल्पना केली आहे. नाटकाची मांडणी सांकेतिक न करता प्रतीकात्मक केली आहे. काळासंबंधीच्या या गूढ दृष्टिकोणाच्या अभिव्यक्तीसाठी आवश्यक असलेली भेदक काव्यदृष्टी प्रीस्टलीच्या नाट्यप्रतिभेत नाही त्यामुळे त्याची हलकीफुलकी नाटकेच जास्त यशस्वी ठरली.

‘नाटक’ या विषयावरची त्याची व्याख्याने द आर्ट ऑफ ज ड्रॅमॅटिस्ट (१९५७) मध्ये संग्रहित केलेली आहेत. या पुस्तकाचा मराठी अनुवाद वसंत हरी गोळे यांनी नाटककाराची कला या नावाने केला आहे (१९७४).

लिटरेचर अँड द वेस्टर्न मॅन (१९६०) या पुस्तकात पाश्चिमात्य साहित्याच्या आधारे त्याने पाश्चिमात्य माणसाच्या मनाचा शोध घेतला आहे. हे पुस्तक वाचनीय तसेच उद्‌बोधक आहे.

यांखेरीज निबंध व आत्मचरित्रात्मक लेखनही त्याने केले आहे. प्रीस्टली आयुष्यभर साहित्यसेवेत दंग राहिला. त्याच्या लेखनसंसाराची विविधता व सहजसौंदर्य लक्षणीय वाटते.

संदर्भ : 1. Brown, I. J. C. J. B. Priestley, London, 1957.

2. Evans, G. L. Priestley, The Dramatist, London, 1964.

3. Hughes, D. J. B. Priestley : An Informal Study of His Works, London, 1958.

नाईक, म. कृ.