सेठ, विक्रम : (२० जून १९५२). ख्यातनाम इंडो-अँग्लिअन साहित्यिक. जन्म कोलकाता (कलकत्ता) शहरी. त्यांचे वडील प्रेम सेठ हे बाटा इंडिया लिमिटेड ह्या पादत्राणे बनविणाऱ्या कंपनीत अधिकारपदावर होते. मातोश्री लैला सेठ ह्या दिल्ली उच्च न्यायालयात नेमल्या गेलेल्या पहिल्या महिला न्यायाधीश होत्या. त्याचप्रमाणे सिमला (हिमाचल प्रदेश) येथील उच्च न्यायालयातही त्या पहिल्या मुख्य न्यायाधीश होत्या. विक्रम सेठ यांचे शिक्षण पाटणा आणि डेहराडून येथे झाले. त्यांचे काही शिक्षण इंग्लंडमधील केंट, ऑक्सफर्ड आणि कॅलिफोर्निया येथेही झाले. ऑक्सफर्ड येथे असताना तत्त्वज्ञान, राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र या विषयांचा त्यांनी अभ्यास केला. येथेच त्यांना कवितेची गोडी लागली. पुढे काव्यलेखनाकडे वळल्यानंतर टिमोथी स्टील या कवयित्रीच्या काव्यरचनेचा त्यांच्यावर प्रभाव पडला. टिमोथीच्या कवितेची संरचना पारंपरिक होती त्यामुळे सेठ ह्यांची काव्यरचनाही पारंपरिक झाली.

विक्रम सेठ

१९८०–८२ मध्ये ‘चीनचे लोकसंख्याविषयक नियोजन’ या विषयावर प्रबंध लिहिण्याच्या दृष्टीने आवश्यक ती माहिती मिळविण्यासाठी चीनमध्ये जाऊन त्यांनी बरेच काम केले. ते करताना ते नानकिंग विद्यापीठाशी निगडित झाले. ते चिनी भाषाही शिकले आणि पुढे त्यांनी चिनी आणि हिंदी कवितांचे इंग्रजीत अनुवाद केले. फ्रॉम हेवन लेक : ट्रॅव्हल्स थ्रू सिक्यांग अँड तिबेट (१९८३) हे त्यांचे पुस्तक चीनहून तिबेटमार्गे दिल्लीला परतताना त्यांनी केलेल्या प्रवासावर आधारित आहे. यासाठी त्यांचे चिनी भाषेचे ज्ञान त्यांना उपयोगी पडले. सेठ ह्यांनी चिनी भाषेप्रमाणेच वेल्श, जर्मन, फ्रेंच, उर्दू, हिंदी अशा अनेक भाषा आत्मसात केल्या.

सेठ यांनी कविता, कादंबऱ्या, बालसाहित्य, प्रवासवर्णन असे अनेक प्रकारचे लेखन केले आहे. त्यांचे काही लेखन असे : कविता – मॅपिंग्ज (१९८०), द हंबल ॲड्‌मिनिस्ट्रेटर्स गार्डन (१९८५), ऑल यू हू स्लीप टूनाइट (१९९०); बालसाहित्य – बीस्ट्ली टेल्स (१९९१); कादंबऱ्या – द गोल्डन गेट (१९८६), ए स्यूटबल बॉय (१९९९), ॲन इक्वल म्यूझिक (१९९९), ए स्यूटबल गर्ल (२०१३ प्रकाशनार्थ). अन्य लेखन – फ्रॉम हेवन लेक… (प्रवासवर्णन), तसेच टू लाइव्ह्‌ज (२००५) हे त्यांचे आत्मचरित्र.

सेठ यांच्या साहित्यात समलिंगी संबंधांना महत्त्व दिलेले आढळते. मॅपिंग्जमधल्या प्रेमकविता स्त्रियांना, तसेच पुरुषानांही उद्देशून लिहिलेल्या आहेत. आपल्या द्विलिंगी (बायसेक्शुअल) वृत्तीविषयी त्यांनी मोकळेपणाने लिहिले आहे. आपल्या लेखनातून समलिंगी भारतीयांच्या हक्कांसंबंधी आपला पाठिंबा त्यांनी स्पष्टपणे प्रकट केला आहे.

त्यांच्या उपर्युक्त कादंबऱ्यांपैकी द गोल्डन गेट ह्या कादंबरीेचे वर्णन ‘नॉव्हेल इन व्हर्स’ असे केले जाते कारण ती पूर्णतः पद्यमय आहे. सॅन फ्रॅन्सिस्कोमधील काही तरुण व्यावसायिकांच्या जीवनांवर ती आधारलेली आहे. त्यांची ही कादंबरी खूप यशस्वी ठरली. त्यांची दुसरी कादंबरी ए स्यूटबल बॉय भारतीय पार्श्वभूमीवर लिहिलेली आहे. आपल्या मुलीसाठी सुयोग्य वर शोधू पाहणाऱ्या आईचे दर्शन ह्या कादंबरीत घडते. स्वातंत्र्योत्तर काळात स्वतंत्र भारताची जडणघडण होत असतानाचा काळ ह्या कादंबरीत दाखविला आहे. वरसंशोधनाच्या ह्या कौटुंबिक नाट्याचे चित्रण करताना त्या काळातील राष्ट्रीय राजकारण, भारतीय पंथोपपंथांतील शत्रुत्व, इथल्या कनिष्ठ जातींची स्थिती, जमीनसुधारणा असे अनेक विषय ह्या कादंबरीत आलेले आहेत. ह्या कादंबरीने सेठ ह्यांना फार मोठी कीर्ती प्राप्त झाली. काही अभिजात संगीतकार आणि त्यांचे संगीत हा ॲन इक्वल म्यूझिक ह्या कादंबरीचा विषय. तिचे कथानक समकालीन यूरोपमध्ये घडते. टू लाइव्ह्‌ज मध्ये त्यांच्या कौटुंबिक स्मृती आहेत. सेठ यांनी यात आपले पणजोबा शांती बिहारी सेठ आणि जर्मन ज्यू पणजी हेन्नी केरो यांच्या जीवनांवर प्रकाशझोत टाकला आहे.

सेठ यांना अनेक पुरस्कार आणि मानसन्मान मिळाले. त्यांपैकी काही असे : फ्रॉम हेवन लेक…. साठी ‘टॉमस कुक ट्रॅव्हल बुक ॲवॉर्ड ’ (१९८३); द हंबल ॲड्‌मिनिस्ट्रेटर्स गार्डन या काव्यसंग्रहासाठी ‘कॉमनवेल्थ पोएट्री प्राइझ ’ (१९८५); ए स्यूटबल बॉय या कादंबरीसाठी ‘आयरिश टाइम्स इंटरनॅशनल फिक्शन प्राइझ’ (१९९१) व ‘कॉमनवेल्थ रायटर्स प्राइझ’ (१९९४); ॲन इक्वल म्यूझिक या कादंबरीसाठी ‘क्रॉसवर्ड बुक ॲवॉर्ड’ (१९९९) व ‘एथ्‌निक अँड मल्टिकल्चरल मीडिआ ॲवॉर्ड’ (२००१); प्रवासी भारतीय सन्मान (२००५), भारत सरकारतर्फे पद्मश्री (२००७) इत्यादी.

कुलकर्णी, अ. र.