गॉवर, जॉन : (१३३० ?—१४०८). इंग्रज कवी. त्याच्या जीवनाविषयी फारशी माहिती उपलब्ध नाही. तो मूळचा यॉर्कशरचा किंवा केंटचा असावा. चॉसरचा तो मित्र होता आणि ‘मॉरल गॉवर’ असा त्याचा उल्लेख चॉसरने एका ठिकाणी केलेला आढळतो. गॉवर हा राजदरबारी मान्यता पावलेला कवी होता. १४०० मध्ये तो आंधळा झाला, असे दिसते. इंग्रजी, फ्रेंच आणि लॅटिन ह्या तीनही भाषांत त्याने काव्यरचना केली. कन्फेशिओ आमांतिस  हे त्याचे चौतीस हजार ओळींचे इंग्रजी काव्य त्याच्या प्रमुख काव्यांपैकी एक होय. १३८६ ते १३९० ह्या काळात झालेल्या त्याच्या तीन आवृत्त्या मिळतात. प्रीती हा जरी ह्या काव्याचा विषय असला, तरी ‘सात घोर पापे’ आणि ती निवारण्याचे मार्ग दर्शविणाऱ्या कथांची माला, असेच या ग्रंथाचे एकंदर स्वरूप आहे. ह्या ग्रंथाची तत्कालीन लोकप्रियता मोठी होती. स्पेक्युलुम मेदितांतिस  किंवा मिर्‌वार द लॉम (तीस हजार ओळी) हे त्याचे काव्य फ्रेंचमध्ये लिहिलेले आहे. ‘सात घोर पापे’ आणि ‘सात सद्‌गुण’ ह्यांचे वर्णन त्यात आहे. १३८१ पूर्वी त्याची रचना झालेली दिसते. व्हॉक्स क्लामांतिस  (सु. १३८२ ?) ह्या दहा हजार ओळींच्या लॅटिन काव्यात १३८१ मध्ये झालेल्या शेतकरी-कामकऱ्यांच्या बंडाचे चित्रण असून तत्कालीन समाजातील भ्रष्टाचार उघड केला आहे. गॉवरच्या काव्यात काव्यगुणांपेक्षा कारागिरीचाच प्रत्यय अधिक येतो. केवळ रचनेची सफाई व भाषेचा अप्रतिहत ओघ हेच त्याचे प्रमुख गुण. चॉसरचा नर्मविनोद आणि वैशिष्ट्यपूर्ण उपरोध त्याच्या काव्यात नाही मात्र मध्ययुगीन जीवनदृष्टी आणि कलामूल्ये ह्यांचा तो एक लक्षणीय प्रतिनिधी आहे. साउथवर्क येथे तो निधन पावला.

संदर्भ : 1. Macaulay, G. C. Ed. Confessio Amantis, Oxford, 1900-1901.

            2. Macaulay, G. C. Ed. The Complete Works of John Gower. 4. Vols., Oxford, 1899 —

              1902.

            3. Pearsall, D. Gower and Lydgate, London, 1969.

नाईक, म. कृ.