हॅझलिट, विल्यम : (१० एप्रिल १७७८–१८ सप्टेंबर १८३०). विख्यात इंग्रज समीक्षक, निबंधलेखक व वृत्तपत्रकार. त्याचा जन्म मेडस्टोन (केंट) येथे विल्यम हॅझलिट व ग्रेस लॉफ्ट्स या सुशिक्षित दांपत्यापोटी झाला. त्याचे वडील ख्रिस्ती धर्मोपदेशक होते, तर आई लोहाराची मुलगी होती. सुरुवातीचे शिक्षण घेतल्यानंतर तो ऐन उमेदीत चिडखोर व एकलकोंडा वागू लागला तथापि त्याने इंग्रजी साहित्य व तत्त्वज्ञान या विषयांचा अभ्यास केला होता. त्यामुळे स्वतंत्र विचार करण्याची सवय त्याला लागली परंतु विचार व्यक्त करण्यात त्याला अडचण वाटू लागली, म्हणून तो चित्रकलेकडे वळला (१७९८). तो लूव्ह्र्च्या राष्ट्रीय कला वस्तुसंग्रहालयात काम करण्यासाठी फ्रान्सला गेला (१८०२) पण इंग्लंड-फ्रान्समधील युद्धामुळे तो इंग्लंडला परतला (१८०३). त्याने इंग्रज निबंधकार चार्ल्स लँब चे व्यक्तिचित्र काढले. ते लंडनच्या राष्ट्रीय चित्रवीथीत आहे. कोलरिजवर्ड्स्वर्थ या कवी मित्रांमुळे तो चित्रकलेकडून साहित्याकडे वळला (१८०५). तरुणपणीच त्याला तत्त्वज्ञानाच्या अभ्यासाची गोडी लागली होती. त्याने इंग्रजी, स्कॉटिश आणि आयरिश तत्त्वज्ञानाचा सखोल अभ्यास करून ॲन एसे ऑन द प्रिन्सिपल्स ऑफ ह्यूमन ॲक्शन (१८०५) हा ग्रंथ लिहिला. त्यानंतर फ्री थॉट्स ऑन पब्लिक अफेअर्स (१८०६) हा त्याचा दुसरा ग्रंथ प्रकाशित झाला.

 

हॅझलिटने आपल्या काही लेखांमधून राजकीय भ्रष्टाचारावर टीकाकेली आणि मतदानपद्धती सुधारणेचा प्रस्ताव मांडला. पुढे चार्ल्स लँब आणि त्याची बहीण मेरी यांच्याशी त्याचे ऋणानुबंध जुळले. सारास्टॉडर्ट हिच्याशी त्याचा विवाह झाला (१८०८). त्यांना दोन मुले होती.

 

द मॉर्निंग क्रॉनिकल, द इग्झॅमिनर, द एडिंबर्ग रिव्ह्यू, द चँपियन,द यलो ड्वॉर्फ्, द लंडन मॅगझीन इ. नियतकालिकांसाठी तो लेखनकरू लागला. पहिल्या नेपोलियनच्या पराभवानंतर तो अस्वस्थ झालाव व्यसनाकडे आकृष्ट झाला मात्र याच काळात त्याने लिहिलेल्या निबंधांतील विविध विषयांची व्याप्ती उल्लेखनीय आहे.

 

हॅझलिट व इंग्रज साहित्यिक ली हंट ने १८१४–१७ च्या दरम्यान द इग्झॅमिनर मध्ये लिहिलेल्या निबंधमालेचे संकलन करून द राउंडटेबल (१८१७) हा ग्रंथ दोन भागांत प्रसिद्ध केला. यातील बहुसंख्यनिबंध हॅझलिटने लिहिले होते.

 

पुढे हॅझलिटने शेक्सपिअरच्या नाटकांतील पात्रांवर कॅरॅक्टर्स ऑफ शेक्सपिअर्स प्लेज (१८१७) हा आस्वादक समीक्षाग्रंथ लिहिला.त्याच्या अ व्ह्यू ऑफ द इंग्लिश स्टेज (१८१८), इंग्लिश पोएट्स् (१८१८) आणि इंग्लिश कॉमिक रायटर्स (१८१९) या ग्रंथांतून त्याने कलाकारांना सामाजिक व राजकीय जबाबदाऱ्यांचे यथार्थ भान करून देण्याचा प्रयत्न केला आहे. हॅझलिटने राजकारणावर लिहिलेला पॉलिटिकल एसेज् विथ स्केचेज् ऑफ पब्लिक कॅरॅक्टर्स (१८१९) हा ग्रंथ विशेष उल्लेखनीय आहे.

 

द क्वॉर्टरली रिव्ह्यूब्लॅकवुड्स मॅगझीन या नियतकालिकांनी त्याच्यावर जोरदार टीका केली. त्यामुळे त्याच्या लेखनावर मर्यादापडल्या. परिणामतः आर्थिक ओढाताण होऊ लागली. त्याची पत्नी सारा मुलांना घेऊन स्वतंत्र राहू लागली. दरम्यान सारा वॉकर या तरुणीच्याप्रेमात तो पडला आणि प्रथम पत्नीकडून त्याने घटस्फोटही घेतला (१८२२) पण हे प्रेमप्रकरण असफल झाले. त्यावर त्याने लाबर अमोरिस (द न्यू पिग्मॅलियन) ही पुस्तिका लिहिली (१८२३). दरम्यान त्याची टेबल टॉक (१८२१) ही प्रसिद्ध निबंधमाला प्रकाशित झाली. तीमध्ये त्याने प्रसिद्ध कवींच्या कवितांतील अवतरणांचा चपखल उपयोग केला आहे. द प्लेन स्पीकर (१८२६) या दुसऱ्या निबंधग्रंथात त्याच्या १८२०–२५ दरम्यान लिहिलेल्या उत्कृष्ट निबंधांचा अंतर्भाव आहे.

इझाबेला ब्रिजवॉटर या विधवेबरोबर त्याने दुसरा विवाह केला (१८२४). द स्पिरिट ऑफ द एज : ऑर, कंटेम्पोररी पोर्ट्रेट्स (१८२५) हा निबंधसंग्रह लाइफ ऑफ नेपोलियन बोनापार्ट (चार खंड, १८२८–३०) हा बृहद्ग्रंथ तसेच नोट्स ऑफ ए जर्नी इन फ्रान्स अँड इटली (१८२६) हे प्रवासवर्णन असे त्याचे काही उल्लेखनीय ग्रंथ. कॉर्न्व्हसेशन्स ऑफ जेम्स नॉर्थकोट (१८३०) हा त्याचा अखेरचा ग्रंथ. द कलेक्टेडवर्क्स ऑफ विल्यम हॅझलिट या शीर्षकाने त्याचे समग्र वाङ्मय ए. आर्. वॉलर आणि आर्नल्ड ग्लोव्हर यांनी संपादून तेरा खंडांत प्रसिद्ध केले (१९०२–०६).

 

कर्करोगाने त्याचे सोहो (लंडन) येथे निधन झाले.

 

संदर्भ : 1. Grayling A. C. The Quarrel of the Age : The Life and Times of William Hazlitt, London, 2000.

            2. Howe, P. P. The Life of William Hazlitt, London, 1922.

           3. Paulin, Tom, The Day-Star of Liberty : William Hazlitt’s Radical Style, London, 1998.

सावंत, सुनील