कॉवर्ड, नोएल : (१६ डिसेंबर १८९९ — २६ मार्च १९७३). इंग्रज नाटककार आणि नट. जन्म मिडलसेक्स परगण्यातील टेडिंग्टन येथे. शिक्षण खाजगी रीत्या झाले. बालवयातच रंगभूमीवर पदार्पण. उत्कृष्ट नट म्हणून प्रसिद्धी. आय विल लीव्ह इट टू यू (१९२०) ही पहिली नाट्यकृती. कॉवर्डने गंभीर स्वरूपाचे नाट्यलेखन – उदा., द व्हॉर्टेक्स (१९२५)- केले असले, तरी नाट्यलेखनातील त्याचे यश मुख्यत: त्याच्या विनोदी नाटकांनी मिळवून दिले आहे. हे फीव्हर (१९२५), प्रायव्हेट लाइव्ह्ज (१९३०), डिझाइन फॉर लिव्हिंग (१९३२), ब्लाइद स्पिरिट (१९४१ हे संगीत सुखात्मिकेच्या स्वरूपात हाय स्पिरिट्स ह्या नावाने १९६४ मध्ये रंगभूमीवर आले) ही त्यांपैकी काही होत. कॅव्हल्केड (१९३१) हे त्याचे ऐतिहासिक नाटकही यशस्वी ठरले. ह्याशिवाय त्याने काही संगीत नाटके आणि रेव्ह्यूज (उदा. धिस यिअर ऑफ ग्रेस, १९२८ बिटर स्वीट, १९२९ वर्डंस अँड म्युझिक, १९३२) लिहिले व त्यांसाठी आवश्यक ती संगीतरचना केली. त्याने चित्रपटनिर्मितीही केली. इन व्हिच वुई सर्व्ह (१९४२) आणि ब्रिफ एनकाउंटर (१९४५) हे त्याचे काही यशस्वी चित्रपट. प्रेझेंट इंडिकेटिव्ह (१९३७) आणि फ्यूचर इन्डेफिनेट (१९५४) हे त्याच्या आत्मचरित्राचे दोन खंड होत. १९७० मध्ये त्याला ‘नाइट’ होण्याचा बहुमान प्राप्त झाला. जमेका येथे तो निधन पावला.

जोशी, अशोक