पोप, अलेक्झांडर : (२१ मे १६८८– ३० मे १७४४). श्रेष्ठ इंग्रज कवी. जन्म लंडनमध्ये एका रोमन कॅथलिक कुटुंबात. इंग्लडमधील कॅथलिकविरोधी कायद्यानुसार पोपच्या कुटुंबियांना लंडन सोडून प्रथम हॅमरस्मिथ येथे आणि नंतर विंडसर फॉरेस्टमधील बीनफिल्ड येथे येऊन राहावे लागले होते तसेच इंग्लंडमधील कोणत्याही विद्यापीठात पोपला प्रवेश मिळू शकला नव्हता. आपले बहुतेक शिक्षण पोपला खाजगी रीत्या आणि मुख्यतः स्वप्रयत्नांनी घ्यावे लागले होते. ह्या कारणांमुळे आपण कॅथलिक असल्याची जाणीव पोपच्या मनात नेहमीच जागी राहिली. शारिरीक दृष्ट्या तो विरूप होता त्याची प्रकृतीही नाजूक होती. तथापि तो अत्यंत बुद्धीमान होता व त्याची वाङ्‌मयीन महत्त्वाकांक्षाही मोठी होती. बालपणापासूनच तो काव्यरचना करू लागला आणि पंचविशी उलटण्याआधीच त्याची श्रेष्ठ इंग्रज कवी म्हणून प्रतिमा प्रस्थापित झाली. सर विल्यम ट्रंबल, विल्यम विचर्ली, विल्यम वॉल्श इ. तत्कालीन प्रतिष्ठित व्यक्तींची मैत्रीही त्याने आपल्या  बुद्धीमत्तेच्या आणि वाङ्‌मयीन कर्तृत्वाच्या जोरावर प्राप्त करून घेतली होती. ‘पास्टोरल्स’(१७०९) ह्या नावाने त्याने लिहिलेल्या चार कवितांमुळे तो प्रथम प्रसिद्धी पावला. ‘हिरोइक कप्‌लेट’मध्ये लिहिलेल्या ह्या कवितांत पोपने त्या वृत्ताची केलेली सफाईदार हाताळणी, तसेच त्याचे भाषाप्रभुत्व प्रत्ययास आले. ‘हिरोइक कपूलेट’ह्या वृत्तात त्याने पुढेही आपली बहुतेक रचना केली. ते अत्यंत समर्थपणे हाताळून पोपने त्यास मोठा दर्जा प्राप्त करुन दिला. ‘एसे ऑन क्रिटिसिझम’ही त्याची त्यानंतरची काव्यकृती. काव्याचे स्वरूप व समीक्षेचे कार्य हे दोन विषय पोपने ह्या काव्यातून मांडले आहेत. पोपच्या काळी प्रतिष्ठा पावलेल्या नव-अभिजाततावादी वाङ्‌मयविचाराचे प्रतिबिंब पोपच्या ह्या काव्यात पडलेले आहे. श्रेष्ठ साहित्यकृतींच्या निर्मितीसाठी ग्रीक-लॅटिन साहित्यकृतींचा आदर्श समोर ठेवला पाहिजे हे आदर्श परिपूर्ण आहेतएखाद्या प्रतिभावंताने त्यांचे उल्लंघन केलेच तर तो केवळ अपवादच मानला पाहिजे, असे विचार पोपने ह्या काव्यात व्यक्त केले आहेत. ‘रेप ऑफ द लॉक’(१७१२) ह्या काव्याने पोपला फार मोठी लोकप्रियता प्राप्त करून दिली. एका तरुण सरदारपुत्राने एका सुंदर तरुणीच्या केसांची एक बट कापली, ह्या प्रत्यक्ष घडलेल्या घटनेच्या आधारे पोपने खेळकर शैलीत हे काव्य रचिले असून त्यात महाकाव्याच्या तंत्र-संकेतांचा विडंबनात्मक उपयोग करून घेतलेला आहे. त्यानंतर ग्रीक महाकवी होमरकृत इलिअडचा पद्यानुवाद करण्याची कामगिरी त्याने हाती घेतली. हा पद्यानुवाद काटेकोरपणे केलेला नाही काव्याच्या शैलीबाबतच्या पोपच्या कल्पनांचा प्रभाव ह्या अनुवादावर अपरिहार्यपणे पडलेला आहे. भव्यता निर्माण करण्याच्या प्रयत्नात अनेकदा तो कृत्रिमतेच्या आहारी गेलेला आहे. होमरच्या शैलीचे सत्त्व जरी त्याला आपल्या अनुवादात प्रकट करता आलेले नसले,तरी त्याच्या स्वतःच्या शैलीतही तिचा असा काही जोम आहेच. सहा खंडांत प्रसिद्ध झालेल्या ह्या अनुवादाला फार मोठे यश लाभले कारण तत्कालीन समाजाच्या वीरकाव्यासंबंधीच्या कल्पना त्याच्या ह्या अनुवादात प्रभावीपणे साकारल्या होत्या. ह्या अनुवादामुळे त्याचा साहित्यिकांत दबदबा वाढला आर्थिक स्वास्थही त्याला लाभले. इलिअडप्रमाणेच ओडिसीचा पद्यानुवादही त्याने केला परंतु त्यात काही अन्य व्यक्तींचाही सहभाग होता. कवी म्हणून पोप कीर्तिवंत झाला, तरी त्याच्या कवितेवर टीकाही होत होतीच. त्यातच पोपने शेक्सपिअरच्या नाट्यकृतींची संपादित आवृत्ती काढली. संपादन करीत असताना पोपने तत्कालीन अभिरुचीला अनुसरून शेक्सपिअरच्या नाटकांत काही फेरफार केले होते पाठचिकित्सेची आवश्यक ती जाणीवही दाखवली नव्हती. ल्युइस थीओबाल्ड ह्य विद्वानाने हे उघडकीस आणल्यामुळे पोपचे त्याच्याशी  वितुष्ट आले. थीओबाल्डचा तसेच अन्य टिकाकारांचा उपहास करण्यासाठी त्याने डन्सिअड (१७२८) नावाची एक महाकाव्य-विडंबिका रचिली. पढीक पांडित्याचा ह्या महाकाव्यात निषेध केलेला आहे. तत्त्वज्ञानपर दिर्घकाव्य लिहिण्याच्या एका महत्त्वाकांक्षी योजनेचा भाग म्हणून पोपने ‘एसे ऑन मॅन’ह्या नावाने चार पद्यबद्ध पत्रे लिहिली. विश्वरचनेमागे काही परमेश्वरी सूत्र असून आपल्या मर्यादांमुळे ते पूर्णतः जाणून घेणे आपणास शक्य होत नाही, असा विचार कवितेत मांडला आहे. माणसाचे विश्वरचनेतील स्थान, आत्मज्ञानाची आवश्यकता इ. विषय ह्या पत्रांत आणलेले असले, तरी कोणतेही मौलिक असे तत्त्वज्ञान त्यांत आढळत नाही. विख्यात रोमन कवी हॉरिसकृत उपरोधिकांच्या अनुकृती म्हणुन पोपने काही सामाजिक कविता लिहिल्या. वस्तुतः अठराव्या शतकाच्या पूर्वार्धातील सामाजिक–राजकीय परिस्थितीच्या संदर्भात पोपने हॉरिसच्या काव्यांची केलेली ही रूपांतरे आहेत. ही रूपांतरे करीत असताना एका प्राचीन, अभिजात परंपरेचे सातत्य आपण टिकवीत आहोत अशी त्याची धारणा होती. पोप हा इंग्लंडमधील उद्‌बोधन युगाचा (एज ऑफ एन्‌लाय्‌टन्‌मेंट) एक वाङ्‌मयीन प्रतिनिधी. नीत्युपदेशकाची भूमिका त्याने आपल्या काव्यांतून अनेकदा घेतलेली आहे. ‘मॉरल एसेज’ह्या नावानेच त्याने चार कविता लिहिलेल्या आहेत.

अलेक्झांडर पोप

ड्रायडन आणि एकोणिसाव्या शतकातील स्वच्छंदतावादी कवी ह्यांच्या दरमान्यच्या कालखंडातील सर्वश्रेष्ठ इंग्रज कवी म्हणून पोप मान्यता पावला आहे. केवळ इंग्लंडमध्येच नव्हे, तर फ्रान्स, इटली आदी यूरोपीय देशांतही त्याला किर्ती लाभली. आपल्या युगाशी, त्याच्या प्रेरणांशी पूर्णतः समरस झालेला असा हा कवी होता त्यामुळे त्या युगाच्या मर्यादा त्याच्या काव्यालाही अपरिहार्यपणे पडल्या. सफाईदार काव्यतंत्र, वेचक शब्दकळा आणि डौलदार, घोटीव शैली यांचे महत्त्व निर्विवादपणे मानणाऱ्या मर्यादित, नागर रसिकवर्तुळासाठी त्याने आपली कविता लिहिली. स्वच्छंदतावाद्यांच्या प्रभावकाळात त्याचे अवमूल्यन झालेपरंतु त्या काळातही बायरन, चार्ल्‌स लॅम आणि विल्यम हॅझलिटसारखे चाहते त्याला मिळाले. विसाव्या शतकातही, इंग्रजी साहित्यातील नव-अभिजाततावादाचा समर्थ प्रतिनिधी आणि आपल्या युगाचा श्रेष्ठ उद्‍गाता म्हणून पोपचे महत्त्व मान्य झालेले आहे. डब्ल्यू. जे. कोर्टहोप आणि व्हाइटवेल एल्विन ह्यांनी पोपचे समग्र साहित्य संपादून ते दहा खंडांत प्रसिद्ध केले आहे (१८७१–८९).  टि्वकनम येथे तो निधन पावला.

संदर्भ:   1. Ault, N. New Light on Pope, London, 1949.

           2. Dobree, B, Alexander Pope, London, 1951.

           3. Johnson, Samuel, Ed. Hill, G. B. Lives of the Poets, Vol. III, Oxford, 1905.

           4. Knight, D. Pope and the Heroic Tradition, New Haven, 1951.

           5. Knight G. W. Laureate of Peace : On the Genius of Alexander Pope, London, 1954.

           6. Leavis, F. R. Revaluation, London, 1936.

          7. Rogers, R. W. The Major Satires of Alexander Pope, Urbana, 1955.

          8. Root, R. K. The Political Career of Alexander Pope, Princeton, 1938.

          9. Sitwell, E. Alexander Pope, London, 1930.

         10. Stephen, L. Pope, London, 1880.

         11. Tillotson, G. On the Poetry of Pope, Oxford, 1950.

         12. Warren, A. Alexander Pope as Critic and Humanist, Princeton, 1929.

देवधर, वा. चिं.