किपलिंग, रड्‌यर्ड : (३० डिसेंबर १८६५—१८ जानेवारी १९३६). विख्यात इंग्रज साहित्यिक. जन्म मुंबई येथे. शिक्षण इंग्लंडमध्ये. १७ व्या वर्षी लाहोर येथील सिव्हील अँड मिलिटरी गॅझेट मध्ये सहसंपादक म्हणून नियुक्ती. अलाहाबादच्या पायोनिअर ह्या नियतकालिकासाठीही त्याने काम केले. हिंदुस्थानातील जीवन जवळून पाहण्याची संधी त्याला लाभली. डिपार्टमेंटल डिटीज (१८८६) हा त्याचा पहिला काव्यसंग्रह. सोल्जर्स थ्री, प्लेन टेल्स फ्रॉम द हिल्स, इन ब्लॅक अँड व्हाइट ह्यांसारखे त्याचे काही कथासंग्रह त्याच्या हिंदुस्थानातील वास्तव्यातच प्रसिद्ध झाले (१८८८). १८८९ मध्ये तो इंग्लंडला परतला. १८९२ मध्ये कॅरोलिन बॅल्स्टीअर ह्या अमेरिकन युवतीबरोबर त्याचा विवाह झाला. विवाहोत्तर काही काळ अमेरिकेत राहिल्यानंतर तो इंग्लंडला परतला. त्यानंतर त्याने दक्षिण आफ्रिकेस भेट दिली. १९०२ मध्ये ससेक्स परगण्यात तो स्थायिक झाला. १९०७ मध्ये त्यास नोबेल पारितोषिक मिळाले. हे पारितोषिक मिळविणारा तो पहिला इंग्रज साहित्यिक होय. लंडन येथे तो निधन पावला.

रड्‌यर्ड किपलिंग

मुख्यतः कथाकार म्हणून किपलिंगला विशेष लोकप्रियता लाभली. हिंदुस्थानातील वास्तव्यामुळे त्याच्या कथा-कवितादी साहित्यातून हिंदुस्थानातील जीवनाचे परिणामकारक चित्रण तो करू शकला. मायदेशापासून खूप दूर राहून हिंदुस्थानातील ब्रिटिश साम्राज्याचे रक्षण करीत राहणाऱ्या इंग्रज सैनिकांची सुखदुःखे त्याने रंगवली. तसेच गोऱ्या सनदी नोकरांचा आयुष्यक्रमही चित्रित केला. त्याने बालवाचकांसाठी केलेले कथालेखनही यशस्वी ठरले. द जंगल बुक (१८९४) आणि द सेकंड जंगल बुक (१८९५) हे कथासंग्रह त्या दृष्टीने विशेष उल्लेखनीय ठरतात. ह्या कथासंग्रहांतही भारतीय जीवनाचे चित्रण आहेच.

किम (१९०१) सारख्या कादंबरीचा अपवाद वगळता कादंबरीलेखनात मात्र तो फारसा यशस्वी होऊ शकला नाही.

साधी, प्रासादिक रचना आणि बोलभाषेतील प्रयोग ह्यांमुळे किपलिंगचे काव्य रोचक ठरले, तरी त्यात पहिल्या प्रतीचे काव्यगुण फारसे आढळत नाहीत. विख्यात साहित्यसमीक्षक टी. एस. एलियट याने मात्र किपलिंगची कविप्रतिमा उजळण्याचा प्रयत्न केला आहे.

ब्रिटिश साम्राज्यवादाचे समर्थन किपलिंगच्या साहित्यात आढळते. जगातील मागासलेल्या समाजांना स्फूर्ती देण्याचे कार्य ब्रिटिश साम्राज्यवाद्यांनी कृतज्ञेची अपेक्षा न करता करीत राहिले पाहिजे, असा सूर त्यात उमटलेला दिसतो. साम्राज्यवादाची आणि सामर्थ्याची तीव्र जाणीव इंग्लंडमध्ये असतानाच त्याचे ग्रंथ प्रकाशित झाले हे त्याला आरंभी मोठा वाचकवर्ग मिळण्याचे महत्त्वाचे कारण; तथापि साम्राज्यवादाचा समर्थक म्हणून अनेकांच्या टीकेलाही तो पात्र झाला. वाङ्‌मयीन मूल्यमापन आणि राजकीय मते ह्यांची गल्लत किपलिंगबाबतच्या टीकेत अनेकदा झालेली आढळते. त्याच्या विशिष्ट विचारसरणीमुळे चर्चाविषय झालेली ‘बॅलड ऑफ द ईस्ट अँड वेस्ट’ ही कविता प्रसिद्ध आहे. किपलिंगने काही प्रवासवर्णने आणि आत्मचरित्रही (समथिंग ऑफ मायसेल्फ, १९३६) लिहिले आहे. मरणोत्तर त्याचे सर्व लेखन ३५ खंडांत प्रसिद्ध झाले (१९३७).

संदर्भ : 1. Brown, Hilton, Rudyard Kipling, New York, 1945.

2. Carrington, C. E. The Life of Rudyard Kipling, New York, 1955.

3. Croft-Cooke, Rupert, Rudyard Kipling, London, 1948.

4. Eliot, T. S. Ed.  A Choice of Kipling’s Verse Made by T.S. Eliot, London, 1941.

5. Henn, T. R. Kipling, London, 1967.

6. Shanks, E. B. Rudyard Kipling, New York, 1940.

बापट, गं. वि.