एलियट, टॉमस स्टर्न्झ : (२६ सप्‍टेंबर १८८८ ­­­— ४ जानेवारी १९६५). श्रेष्ठ इंग्रज कवी, समीक्षक व नाटककार. अमेरिकेत सेंटलूइस येथे जन्म. शिक्षण हार्व्हर्ड, पॅरिस व ऑक्सफर्ड विद्यापीठांत झाले. १९१४ पासून एलियट लंडन येथे स्थायिक झाला. १९१७ ते १९१९ पर्यंत द एगोइस्ट या वाङ्‍मयीन नियतकालिकाचे त्याने संपादन केले. १९२२ साली त्याने द क्रायटेरियन या नव्या वाङ्‍मयीन व मीमांसू नियतकालिकाची स्थापना करून त्याचे संपादन हाती घेतले. त्याच वर्षी एलियटने आपले द वेस्ट लँड हे सुप्रसिद्ध दीर्घकाव्य प्रकाशित केले. १९२७ साली एलियटने ब्रिटिश नागरिकत्व पतकरले आणि आपल्या वाढत्या धर्मश्रद्धेपोटी चर्च ऑफ इंग्‍लंडचा आश्रय घेतला. त्याच्या धार्मिक श्रद्धेचा आविष्कार १९३० सालच्या त्याच्या ‘ॲश वेन्सडे’ या कवितेत व पुढे मर्डर इन द कॅथीड्रल (१९३५) या नाटकात तसेच द आयडिया ऑफ अ ख्रिश्चन सोसायटी (१९३९) या पुस्तकात व फोर क्वार्टेट्स  (१९४३) या दीर्घ कवितेत झालेला आहे.

टॉमस स्टर्न्झ एलियट

एलियटच्या इतर महत्त्वाच्या कृती अशा : काव्य : कलेक्टेड पोएम्स, १९०९­­­—१९६२ (१९६३), ओल्ड पॉझम्स बुक ऑफ प्रॅक्टिकल कॅट्स (१९३९) नाट्य :  फॅमिली रीयूनियन (१९३९), द कॉक्‌टेल पार्टी (१९५०) समीक्षा व निबंध : द सेक्रेड वुड (१९२०), फॉर लॅन्सिलॉट अँड्रूज… (१९२८), थॉट्स आफ्टरलँबेथ (१९३१), सिलेक्टेड एसेज (१९५१), आफ्टर स्ट्रेंज गॉड्स (१९३४), व्हॉट इज अ क्‍लासिक? (१९४५), मिल्टन (१९४७), नोट्स टुवर्ड्‍‍‍‍स द डेफिनिशन ऑफ कल्चर (१९४८).

स्वत:च्या आयुष्यकालातच एलियटला इंग्रजी वाङ्‍मयाच्या इतिहासात महत्त्वाचे स्थान लाभले इतकेच नव्हे, तर आधुनिक वाङ्‍मयाच्या आंतरराष्ट्रीय क्षेत्रात त्याने जे अग्रगण्य स्थान मिळवले, त्याची ग्वाही त्याला मिळालेल्या नोबेल पारितोषिकाने मिळते (१९४८).

एलियटच्या काव्याने जरी इंग्रजी वाचकांना जबरदस्त धक्वा दिला असला, तरी त्याचा पिंड सनातनी होता. अभिजात इंग्रजी काव्यपरंपरेचे पुनरुज्‍जीवन करण्याचा त्याने ध्यास घेतलेला होता आणि सतराव्या शतकातील इंग्रजी मीमांसक (मेटॅफिजिकल) कवींचा आदर्श त्याने समोर ठेवलेला होता. स्वत:चे काव्यलेखनाचे तंत्र जोपासताना त्याला आपले सतराव्या शतकातील पूर्वसूरी आणि एकोणिसाव्या शतकातील फ्रेंच प्रतीकवादी कवी यांचा जसा उपयोग झाला, तसाच एझरा पाउंड या समकालीन कविमित्राच्या मर्मग्राही दृष्टीचाही झाला.  वेस्टलँड ही दीर्घकविता पाउंडने साक्षेपी दृष्टीने संपादित केली व एलियटने ती कृतज्ञबुद्धीने पाउंडलाच अर्पण केलेली आहे. वेस्टलँड या एकाच दीर्घकवितेमुळे एलियटचे ऐतिहासिक महत्त्व प्रस्थापित झाले असते. दान्ते या महान इटालियन कवीच्या काव्याचेही या कवितेवर सजाण संस्कार आढळतात. समग्र यूरोपीय संस्कृतीच्या विविध वाङ्‍मयीन परंपरांचा एलियटने गाढ अभ्यास केला होता आणि विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात पश्चिमी संस्कृतीत जे नाठाळ वातावरण होते, ते आपल्या काव्यात्म जीवनदर्शनात दूर करण्याचा त्याने प्रयत्‍न केला. एलियट आस्तिक व धर्मश्रद्ध असल्यामुळे व तत्त्वज्ञान आणि सापेक्ष धर्मशास्त्रांचाही त्याला उत्तम परिचय असल्यामुळे त्याच्या वाङ्‍मयात त्याच्या अन्य श्रद्धा प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे प्रकटल्या, यात विशेष नवल नाही. ‘ॲश वेन्सडे’ आणि फोर क्वार्टेट्स या त्याच्या नंतरच्या दीर्घकवितांचे तंत्र व रचना वेस्ट लँडपेक्षा निराळी आहे. फोर  क्वार्टेट्स  ही तत्त्वचिंतनात्मक दीर्घकविता असून काल आणि मानवी अस्तित्व यांच्या परस्परसंबंधांविषयी तिच्यात चिंतन केलेले आढळते.  वेस्टलँडमधील प्रतिमासृष्टी आणि तंत्र, अनपेक्षित प्रतिमांच्या सांगडी, पूर्वसूरींच्या काव्याच्या ओळी प्रतिध्वनित करून नवनवीन श्लेषांद्वारा आशयाला व भावानुभवाला गहिरेपणा देण्याचा प्रयत्‍न आणि सिद्धहस्त वृत्तकौशल्य यांमुळे नजरेत भरते. याउलट द फोर  क्वार्टेट्स या कवितेतल्या प्रतिमा व छंदसंगीत चिंतनशील आणि गूढानुभवी काव्याला साजेसे आहे. इंग्रजी काव्याच्या परंपरागत बलस्थानांची डोळस जाणीव ठेवून एलियटने स्वत:च्या कवितांवर सूक्ष्म संस्कार केले. याहीपेक्षा महत्त्वाची गोष्ट म्हणजे यूरोपीय वाङ्‍मयाच्या समग्र परंपरेचेही त्याने भान ठेवले. त्याच्या कवितेचे तंत्र तर यामुळे चतुरस्त्र बनलेच पण त्याच्या स्वत:च्या वैशिष्ट्यांना व्यापक परंपरेची चौकट मिळून त्याची कविता बहुसंस्कृत आणि बहुध्वनिशील बनली. विसाव्या शतकात दान्तेसारखाच महाकवी बनण्याची एलियटने कसोशीने तयारी केली होती, हे येथे सूचित करावयाचे आहे.

धर्मशास्त्रामध्ये त्याला रस असल्यामुळे आणि तत्त्वचिंतक स्वभावामुळे काव्यविषयाची मांडणी, आशयाचा सांगाडा आणि भावसंस्कारांना अनुकूल अशी भाषा व वृत्तरचना अशा चतुर्विध गोष्टी एकत्र आणून आपल्या काव्यात दान्तेप्रमाणेच एक सुसंगत, सनातन जीवनदर्शन मांडणे त्याला सुकर झाले.

एलियटच्या कवितेने द वेस्ट लँडच्या रूपाने इंग्रजी वाङ्‍मयरसिकांना व समीक्षकांना १९२२ मध्ये जोराचा हादरा देऊन त्यांचे लक्ष वेधून घेतलेच पण त्याहीपेक्षा महत्त्वाची गोष्ट म्हणजे इंग्‍लंड-अमेरिकेतील कवींच्या आणि समीक्षकांच्या उगवत्या पिढीवर या कवितेचा गाढ परिणाम झाला आणि अनेकांना तिच्यामुळे काव्यशैलीच्या व तंत्राच्या वापराच्या नव्या शक्यता दिसून आल्या. तसेच द वेस्ट लँडमुळे परंपरागत इंग्रजी काव्याकडे पाहण्याची नव्या कवींची दृष्टीही जास्त सजाण झाली.

एलियटने इंग्रजीतील परंपरागत पद्यनाट्याचे पुनरुज्‍जीवन करण्याचा प्रयत्‍न केला पण रंगभूमीवर तो फारसा यशस्वी ठरला नाही. मात्र काव्याइतकीच महत्त्वाची कामगिरी एलियटने वाङ्‍मयीन समीक्षेच्या क्षेत्रात केली. वाङ्‍मयातील परंपरा आणि नवता यांच्यातील सजीव संबंधाचे महत्त्व एलियटने आपल्या समीक्षेद्वारा इंग्रजी वाचकांना पटवून दिले त्याचप्रमाणे समग्र परंपरेकडे पाहण्याची एक व्यापक दृष्टी समीक्षेचे अनेक निकष उलगडत त्याने वाचकांसमोर मांडली. त्याच्या अभिजात पांडित्यामुळे त्याची धक्वा देणारी अनेक मतेसुद्धा इतर समीक्षकांनी गंभीरपणे विचारात घेतली आणि त्यामुळे या शतकातील इंग्रजी व अमेरिकन वाङ्‍मयविचारांना पुष्कळच चालना मिळाली.

लंडनमध्ये एलियटचा जेव्हा मृत्यू झाला, तेव्हा समकालीन विश्ववाङ्‍मयातला अग्रगण्य मोहरा म्हणून तो अगोदरच मान्यता पावलेला होता.

संदर्भ : 1. Congress for Cultural Freedom, T. S. Eliot, Bombay, 1965.

2. Hayward, John, T. S. Eliot : Selected Prose, Great Britain, 1963.

3. Maxwell, D. E. S. The Poetry of T. S. Eliot, London, 1952.

4. Unger, Leonard, T. S. Eliot, Minneapolis, 1961.

5. Williamson, George, A Reader’s Guide to T. S. Eliot, London, 1955.

चित्रे, दिलीप