फोर्ड, जॉन : (१५८६–१६४०?). इंग्रज नाटककार. जन्म डेव्हनशरमधील इझ्लिंग्टन येथे. १६०२ मध्ये कायद्याचे शिक्षण घेण्यासाठी लंडनच्या ‘मिड्ल टेंपल’ ह्या संस्थेत त्याने प्रवेश केला. तेथे तो जवळजवळ पंधरा वर्षे होता. १६०६ मध्ये डेव्हनशरच्या अर्लवर एक विलापिका त्याने लिहिली एक पुस्तपत्रही लिहिले. आरंभी टॉमस डेक्कर, विल्यम रोली अशा काही नाटककारांच्या सहकार्याने त्याने नाटके लिहिली. केवळ त्याची अशी फक्त आठ नाटके आज उपलब्ध आहेत. त्यांची नावे अशी : द ब्रोकन हार्ट (१६३३), द लव्हर्स मेलॅन्कली (१६२८), ट्स पिटी शी इज अ होअर (१६३३), प‌र्किवॉबे (१६३४) व्ह्‌ज सॅक्रिफाइस (१६३३) आणि द लेडीज ट्रायल (१६३८).

अगम्‍य आप्तसंभोग (इन्सेस्ट) घडवून आणणाऱ्या मानसिक अवस्थांबद्दल फोर्डला विशेष कुतूहल होते, असे त्याच्या द ब्रोकन हार्ट आणि इट्स पिटी शी इज अ होअर ह्यांसारख्या नाट्यकृतींवरून ‌दिसते. तथापि अशा प्रकारच्या विषयांची अंतःशक्ती प्रत्यक्ष नाट्यकृतींतून साकार करण्यात फोर्डला फारसे यश आलेले नाही. नाट्यप्रसंग अतिनाट्यत्मक करण्याकडे त्याचा कल आहे शोकात्म घटनांच्या गहन अर्थाचा शोध घेण्याचे सामर्थ्य त्याच्या नाटकांतून प्रत्ययात येत नाही. फोर्डचा काळ हा एकूणच इंग्रजी नाटकाच्या ऱ्हासाचा होता आणि त्याचे प्रत्यंतर फोर्डच्या नाटकांतूनही येते. तसेच समाजाच्या खालावलेल्या नाट्याभिरूचीचीही ती द्योतक आहेत. त्याच्या नाटकांतील निर्यमक पद्यरचना मात्र अत्यंत सफाईदार आहे. रंगभूमीच्या तांत्रिक अंगांची त्याची जाणीवही चांगली होती.

एकोणिसाव्या शतकात कवी ॲल्जर्नन चार्ल्स स्विन्बर्न, निबंधकार विल्यम हॅझ्लिट आणि चार्ल्स लँब ह्यांनी मात्र फोर्डचा गौरव केलेला आहे.

फोर्डचे निधन कोठे झाले ह्यासंबंधी माहिती मिळत नाही.

संदर्भ : 1. Leech, Clifford, John Ford and the Drama of His Time, New York, 1957.

2. Staving, Mark, John Ford and the Traditional Moral Order, Madision, Wis., 1968.

भागवत, अ. के.