ग्रीन, रॉबर्ट : (? जुलै १५५८–३ सप्टेंबर १५९२). एक चतुरस्र इंग्रज साहित्यिक. एलिझाबेथकालीन इंग्लंडमध्ये ‘युनिव्हर्सिटी विट्स’ ह्या नावाने ओळखल्या जाणाऱ्या अभिजातविद्याविभूषित साहित्यिकांपैकी एक. त्याचा जन्म नॉरिच, नॉरफॉक येथे झाला असावा. केंब्रिज विद्यापीठातून तो एम्. ए. झाला (१५८३). स्वैराचारी जीवन जगलेल्या ह्या लेखकाने मुख्यतः उदरनिर्वाहासाठी नाटके, दीर्घकथा, पुस्तपत्रे असे विविध स्वरूपाचे लेखन केले. इंग्लंडमध्ये तो पहिला यशस्वी व्यावसायिक लेखक.

द कॉमिकल हिस्टरी ऑफ ॲल्फॉन्सस किंग ऑफ ॲरागॉन (लेखनकाळ सु. १५८८, प्रकाशित १५९९), द हिस्टरी ऑफ ओरलांदो फूर्योसो (आरिऑस्तोच्या ओरलांदो फूर्योसो  ह्या महाकाव्यावर आधारित, लेखनकाळ सु. १५९१, प्रकाशित १५९४), फ्रायर बेकन अँड फ्रायर बंगे (लेखनकाळ सु १५९१, प्रकाशित १५९४) आणि द स्कॉटिश हिस्टरी ऑफ जेम्स द फोर्थ (लेखनकाळ सु. १५९o–९१, प्रकाशित १५९८) ह्या त्याच्या प्रमुख नाट्यकृती. त्यांतील अद्‌भुतरम्यता, हळूवार प्रेमभावनेचे काव्यमय चित्रण, मानवी स्वभावाची – विशेषतः स्त्रीस्वभावाची – विविधता शेक्सपिअरला अनुकरणीय वाटलेली दिसते. अद्‌भुतरम्य सुखात्मिकेच्या संदर्भात तो शेक्सपिअरचा पूर्वसूरी. दोन स्वतंत्र संविधानके एकाच नाट्यकृतीत उभी करून त्यांच्यात प्रच्छन्न अथवा प्रतीकात्मक समांतरता साधणे, हे त्याच्या नाट्यलेखनाचे एक वैशिष्ट्य एलिझाबेथकालीन पुढील नाटककारांनी आत्मसात केले.

पँडॉस्टो (१५८८), ट्‌यूलीज लव्ह (१५८९) आणि मेनॅफॉन (१५८९) हे त्याचे उल्लेखनीय रोमान्स. त्यांत जॉन लिलीच्या युफूसमधील सुरस व चमत्कारिक कथांतील अतिरंजित लेखनशैलीचे अनुकरण दिसते. द विंटर्स टेल  ह्या आपल्या नाट्यकृतीसाठी शेक्सपिअरने पँडॉस्टोचा आधार घेतलेला आहे.

‘द कोनीकॅचिंग ट्रॅक्ट्स’ ह्या नावाने प्रसिद्ध असलेल्या कथावजा लेखनातून त्याने लंडनमधील गुन्हेगारांच्या जगाचे वास्तव चित्रण केले. लोकांना दुष्कृत्यांपासून परावृत्त करणे, हा आपल्या अशा लेखनामागील हेतू त्याने सांगितला असला, तरी त्यातून लोकशिक्षणापेक्षा लोकरंजनाचीच प्रेरणा तीव्रतेने जाणवते.

इंग्लंडमधील आद्य आत्मचरित्रकारांतही त्याची गणना होते. ग्रोट्सवर्थ ऑफ विट बॉट विथ अ मिल्यन ऑफ रिपेंटन्स (१५९२) आणि द रिपेंटन्स ऑफ रॉबर्ट ग्रीन, मास्टर ऑफ आर्ट्‌स (१५९२) ह्या त्याच्या मरणोत्तर प्रसिद्ध झालेल्या आत्मचरित्रात्मक पुस्तपत्रांतून स्वैराचारी जीवनामुळे अस्वस्थ झालेली त्याची सदसद्‌विवेकबुद्धी प्रत्ययास येते. ग्रोट्‌सवर्थ  मध्ये ‘मोराची पिसे उसनी घेऊन सजलेला कावळा’ (क्रो ब्युटिफाइड विथ अवर फेदर्स) त्या अर्थाने शेक्सपिअरविषयी त्याने काढलेले मत्सरग्रस्त उद्‌गार शेक्सपिअरच्या वाढत्या लोकप्रियतेचे निदर्शक आहेत. ए. बी. ग्रोसार्ट ह्यांनी त्याचे सर्व साहित्य १५ खंडांत प्रसिद्ध केलेले आहे (१८८१–८६). लंडनमध्ये तो निवर्तला.

भागवत, अ. के.