कार्लाइल, टॉमस : (४ डिसेंबर १७९५ – ५ फेब्रुवारी १८८१). प्रसिद्ध स्कॉटिश लेखक. जन्म दक्षिण स्कॉटलंडमधील एक्लफेकन ह्या गावी. शिक्षण एडिंबरो विद्यापीठात. पदवी मिळण्यापूर्वीच त्याने विद्यापीठ सोडले (१८१४) आणि तो गणिताचा शिक्षक झाला. गणित हा त्याच्या विशेष आस्थेचा विषय. त्याचे वडील कॅल्व्हिन पंथीय होते आणि कार्लाइलने चर्चच्या सेवेत आपले आयुष्य घालवावे, अशी त्यांची इच्छा होती परंतु ख्रिस्ती धर्मश्रध्देपासून तो लवकरच दुरावला. १८१८ मध्ये एडिंबरो विद्यापीठात त्याने कायद्याचा अभ्यास सुरू केला पण त्यातही त्याचे मन रमले नाही. अग्निमांद्याच्या विकाराचाही त्याला फार त्रास होत असे. तथापि १८१७ मध्ये मादाम द स्ताल (१७६६—१८१७) हिचे लेखन त्याच्या वाचनात आले आणि त्यातून जर्मन वाङमयाकडे त्याचे लक्ष वेधले. गटे, शिलर ह्यांसारख्या जर्मन साहित्यिकांच्या आणि चिव्दादी तत्वज्ञांच्या लेखनात त्याला आपल्या जीवनाचा हेतू आणि आध्यात्मिक आधार गवसला व लेखक होण्याचा त्याने निर्णय घेतला. प्रथम एडिंबरो एन्सायक्लोपीडियासाठी त्याने काही लेखन केले. त्यानंतर द न्यू एडिंबरो रिव्ह्यू, द लंडन मॅगझीन ह्यांसारख्या नियतकालिकांतून तो लिहू लागला. १८२३–२४ मध्ये द लंडन मॅगझीनमधून त्याचे लाइफ ऑफ शिलर क्रमशः प्रसिद्ध झाले (पुस्तकरुपाने १८२५). गटेच्या व्हिल्हेल्म माइस्टर्स… चा त्याने अनुवाद केला. व्हिल्हेम माइस्टर्स अप्रेंटिस्‌शिप हा अनुवाद १८२४ मध्ये प्रसिद्ध झाला व व्हिल्हेल्म माइस्टर्स ट्रॅवहल्स हा अनुवाद १८२७ साली जर्मन रोमान्समध्ये समाविष्ट करण्यात आला. १८२६ मध्ये जेन वेल्श ह्या बुध्दिमान स्कॉटिश तरुणीशी त्याचा प्रेमविवाह झाला. त्यांचे वैवाहिक जीवन मात्र समाधानकारक नव्हते. क्रेगेनपटक या जेनच्या गावी असताना (१८२८—३४) कार्लाइलने आपला Sartor Resartus (इं.शी.द.टेलर री-पॅच्ड) हा ग्रंथ लिहून काढला आणि १८३४ मध्ये तो लंडनला परतला. जर्मन स्वच्छंदतावादाचा आणि विशेषतः विख्यात जर्मन लेखक ⇨ झां पाउल (झां पाउल फ्रीड्रिख रिक्टर) ह्या ग्रंथावर प्रभाव जाणवतो. ह्या ग्रंथाचे दोन विभाग आहेत. पहिल्यात टयूफेल्सड्रक नामक एका काल्पनिक प्राध्यापकाचे तत्वविवेचन असून दुसऱ्यात टयूफेल्सड्रकचे चरित्र आहे. ‘सर्व दृश्य वस्तू चिद्‌सत्तेच्या संदर्भात वस्त्रांसारख्या बाह्यात्कारी असल्यामुळे जीर्ण झालेल्या सामाजिक संस्था इ. जीर्णवस्त्रांप्रमाणेच टाकून द्यावयास हव्यात’, अशा आशयाचे प्रतिपादन पहिल्या भागात असून दुसऱ्या भागात टयूफेल्सड्रकच्या चरित्राआडून कार्लाइलने स्वतःच्याच आयुष्यातील मानसिक संघर्ष रंगविले आहेत. त्या दृष्टीने `द एव्हरलास्टिंग नो’, `सेंटर ऑफ इन्डिफरन्स’ आणि `एव्हरलास्टिंग ये’ ही त्यातील तीन प्रकरणे लक्षणीय आहेत. ह्या ग्रंथाला इंग्लंडमध्ये फारसा प्रतसाद मिळाला नाही. एमर्सनच्या प्रयत्नांमुळे १८३६ मध्ये अमेरिकेत तो प्रथम प्रसिद्ध झाला आणि त्यानंतर दोन वर्षांनी तो इंग्लंडमध्ये प्रकाशित करण्यात आला. द फ्रेंच रेव्होल्यूशन (१८३७) हा कार्लाइलचा त्यानंतरचा ग्रंथ. कार्लाइलच्या दृष्टीने पाहिलेली ही फ्रेंच क्रांती आहे. त्याच्या दृष्टीने फे्रंच क्रांती हा ईश्वरी निवाडा होता. सत्तेचा दुरुपयोग आणि कर्तव्यांची उपेक्षा ह्यांचे ते ईश्वरदत्त फलित होते. १८३७पासून कार्लाइलने वाङमयादी विषयांवर जी व्याख्याने दिली, त्यांपैकी ऑन हीरोज, हीरो षर्‌शिप अँड हिरोइक इन हिस्टरी हे १८४१ मध्ये पुस्तकरूपाने प्रसिद्ध झाले. कार्लाइलच्या अत्यंत लोकप्रिय ग्रंथांत त्याची गणना होते. जीवनाच्या विविध क्षेत्रांत निर्माण होणाऱ्या विभूती आणि विभूतिमत्वाची वैशिष्ट्ये हा ह्या ग्रंथातील विवेचनाचा विषय होय. द फ्रेंच रेव्होल्यूशन आणि ऑन हीरोज ह्या दोन्ही ग्रंथांतून भूतकाळाच्या माध्यमाव्दारे वर्तमानाशी संवाद साधण्याची प्रवृत्ती जाणवते.

टॉमस कार्लाइल

चार्टिझम (१८३९) पास्ट अँड प्रेझेंट (१८४८) अाणि लॅटर-डे पॅम्‌लिट्‌स (१८५०) ह्या पुस्तकांतून कार्लाइलने समकालीन राजकीय प्रश्नांवर आपले विचार मांडले आहेत. राजकीय अनवस्थेच्या निर्मूलनासाठी लोकशाहीचा मार्ग त्याला अविवेकीपणाचा वाटत होता. त्यापेक्षा एखाद्या न्यायनिष्ठुर महापुरुषाच्या हातात सारी राज्यसत्ता केंद्रित होणेच फलदायी ठरेल, अशी त्याची धारणा होती आणि त्याला सत्तेवर आणण्यासाठी निवडणुकीचा मार्ग त्याच्या दृष्टीने पूर्णतः त्याज्य होता. ईश्वरी नियोजनानेच हे होऊ शकेल, अशी त्याची धारणा जाणवते. श्रमिकांच्या कल्याणार्थ मध्ययुगीन परिस्थिती पुन्हा निर्माण करणे आवश्यक आहे, असे त्याचे मत होते. ह्या विचारांनी ⇨जॉन स्टयूअर्ट मिलसारखे त्याचे दीर्घकाळचे मित्रही त्याला दुरावले. तथापि त्याच्या काळातील एकूण विज्ञाननिष्ठ इहवादाविरुद्ध त्याची जी भूमिका होती, तिचेच प्रत्यंतर कार्लाइलच्या ह्या विचारांत येते. अनिर्बंध अर्थव्यवस्थेलाही त्याचा कडवा विरोध होता. १८४५ मध्ये ऑलिव्हर कॉमवेल्स लेटर्स अँड स्पीचीस प्रसिद्ध करून कार्लाइलने इंग्रजीतील इतिहासविषयक ग्रंथांत महत्त्वाची भर घातली आणि क्रॉमवेलसंबंधीचे अनेक अपसमज नष्ट करण्याचा प्रयत्न केला.

  १८५१ मध्ये जॉन स्टर्लिंगचे चरित्र त्याने लिहिले. द हिस्टरी ऑफ फ्रीड्रिख सेकंड ऑफ प्रशिया कॉल्ड फ्रीड्रिख द ग्रेट ह्या कार्लाइलच्या ग्रंथाचे सहा खंड १८५८ ते १८६५ ह्या कालखंडात प्रसिद्ध झाले. राजाच्या रूपाने इतिहास उजळणारी एक राजविभूती म्हणून फ्रीड्रिखची प्रतिमा त्याला रंगवावयाची होती. ह्या कालखंडात प्रसिद्ध झाले. राजाच्या रूपाने इतिहास उजळणारी एक राजविभूती म्हणून फ्रीड्रिखची प्रतिमा त्याला रंगवावयाची होती. ह्या ग्रंथासाठी कार्लाइल १४ वर्षे सतत परिश्रम करीत होता. तथापि ह्या ग्रंथाविषयी कार्लाइलने बाळगलेल्या अपेक्षा ह्या ग्रंथात पूर्ण झालेल्या दिसत नाहीत, असेच मत सर्वसाधारणपणे व्यक्त केले जाते.

१८६५ मध्ये एडिंबरो विद्यापीठाचा रेक्टर होण्याची विनंती त्याला करण्यात आली आणि ती त्याने मान्य केली. २ एप्रिल १८६६ रोजी त्याने रेक्टरपदावरुन केलेले पहिले भाषण ऑन द चॉइस ऑफ बुक्स ह्या नावाने प्रसिद्ध झाले (१८६६). ते भाषण आटोपून लंडनला परतण्याच्या आतच आपली पत्नी मरण पावल्याची वार्ता त्याला समजली. ह्या घटनेने तो खचूनच गेला. तिच्या मृत्यूनंतर तिची पत्रे आणि आठवणी त्याने प्रसिद्ध केल्या (१८८३). इंग्रजीतील उत्कृष्ट पत्रांत त्यांचा समावेश होतो.

पत्नीच्या निधनानंतर कार्लाइलच्या हातून विशेष उल्लेखनीय असे लेखन झाले नाही. 1874 मध्ये जर्मन सरकारने `(इंग्रजी)’ ही अत्युच्च गौरवपद पदवी त्याला दिली. त्याच वर्षी इंग्लंड सरकारने त्याला `ग्रॅंड क्रॉस ऑफ द बाथ’ ही पदवी आणि निवृत्तिवेतन देऊ केले. तथापि ह्या दोन्ही गोष्टी त्याने स्वीकारल्या नाहीत.

लंडनमध्ये त्याचे देहावसान झाले. एकोणिसाव्या शतकातील इंग्लंडमधील महान नैतिक शक्ती, असे कार्लाइलचे वर्णन केले जाते. इंग्लंडमधील कोणत्याही समकालीन संप्रदायाच्या चौकटीत स्वतःचे व्यक्तिमत्त्व त्याने कोंडून घेतले नाही. परिणामतः समकालीन विचारवंत व विचारप्रवाह ह्यांपासून तो काहीसा अलग पडला. त्याच्या जीवनाच्या अखेरीअखेरीस एक ऋषितुल्य व्यक्तिमत्व म्हणून त्याच्याकडे पाहिले जात होते.

संदर्भ : 1. Froude, James Anthony, Thomas Carlyle : History of the First Forty Years of His Life, 1795-1835,

2. Vols, London, 1882. 2.Froude, james Anthony, Thomas Carlyle History of His Life in London, 1834-1881. 2.Vols., London 1884.

3.Harrold, Charles Frederick, Carlyle and German Thought : 1819-1834, New Haven, 1934.

4. Symons, Julian, Thomas Carlyle : The Life and Ideas of a Prophet, New York, 1952.

5.Trail, H.D.Ed. Centenary Edition of the Works of Thomas Carlyle, 30 Vols., London. 1896-1899.

6.Word, A.W. Waller. A.R.Ed. The Cambridge History of English Literature, Vol.XIII, Part II, Cambridge, 1961.

7.young. L.M. Thomas Carlyle and the Art of History., Philadelphia, 1939.

कुलकर्णी, अ.र.