स्पेंडर, स्टीव्हन : (२८ फेब्रुवारी १९०९ — १६ जुलै १९९५). इंग्रज कवी, कादंबरीकार, समीक्षक आणि संपादक. लंडन येथे त्याचा जन्म झाला. त्याचे पूर्ण नाव सर स्टीव्हन हेरॉल्ड स्पेंडर. युनिव्हर्सिटी कॉलेज स्कूल, लंडन आणि युनिव्हर्सिटी कॉलेज, ऑक्सफर्ड येथे त्याचे शिक्षण झाले. त्याच सुमारास क्रिस्टोफर इशरवुड, विस्टन ह्यू ऑडन, सेसिल डे ल्यूइस या साहित्यिकांशी त्याचा परिचय झाला. क्रिस्टोफर इशरवुडबरोबर काही महिने तो जर्मनीत राहिला.

स्पेंडरने होरायजन (१९४०-४१) आणि एन्काउंटर (१९५३ — ६७) या नियतकालिकांचे संपादन केले पण एन्काउंटर हे नियतकालिक गुप्तचर यंत्रणा चालविते हे कळताच त्याचे संपादन त्याने बंद केले. दुसऱ्या महायुद्धानंतर स्पेंडर आंतरराष्ट्रीय पातळीवर काम करू लागला. युनेस्कोच्या सल्लागारपदी त्याची नेमणूक झाली.

स्पेंडर याने अमेरिका व ब्रिटनमधील अनेक विद्यापीठांमध्ये इंग्रजीचे अध्यापन केले. १९७० मध्ये युनिव्हर्सिटी कॉलेज, लंडन येथे इंग्रजीचा प्राध्यापक म्हणून तसेच पुढे १९७७ मध्ये गुणश्री प्राध्यापक म्हणून त्याची नेमणूक झाली. तत्पूर्वी त्याने १९७२ मध्ये लेखकांच्या दडपल्या जाणाऱ्या स्वातंत्र्यासाठी इंडेक्स ऑन सेन्सॉरशिप ही संघटना स्थापन केली.

दि थर्टीज अँड आफ्टर (१९७९) या ग्रंथात कला आणि राजकारण या दोन्ही क्षेत्रांतील ख्यातनाम साहित्यिकांविषयी त्याने लिहिले आहे.पुढे १९८६ मध्ये प्रकाशित झालेल्या जर्नल्स १९३९८३ या जॉन गोल्डस्मिथ संपादित ग्रंथातही त्याने आपल्या समकालीन लेखकांचा आढावा घेतला आहे. त्याच्या उत्कृष्ट कविता वर्ल्ड विदिन वर्ल्ड (१९५१) हे त्याचे आत्मचरित्र व दि टेम्पल (१९८८) ही त्याची कादंबरी यांवरही पहिल्या व दुसऱ्या महायुद्धाची दाट छाया पडलेली दिसते.विशेषतः सामाजिक न्याय आणि वर्गसंघर्ष या आशयसूत्रांची अभिव्यक्ती करणाऱ्या साहित्याची निर्मिती त्याने केली.

समाजवादी युद्धविरोधी भूमिका घेतलेल्या स्पेंडरने १९२९ ला जर्मनीला भेट दिली. फ्रँकोची फॅसिस्ट राजवट उलथवून टाकण्यासाठी लढणाऱ्या आंतरराष्ट्रीय सैन्यतुकडीत सामील होण्यासाठी तो स्पेनलाही गेला. त्यासाठी त्याने ग्रेट ब्रिटनच्या साम्यवादी पक्षाचे सदस्यत्व स्विकारले. स्पेंडरचे पोएम्स् (१९३३) आणि व्हिएन्ना (१९३४) हे कवितासंग्रह त्याची डाव्या विचारसरणीची बांधीलकी व्यक्त करतात तथापि सामाजिक विद्रोह व्यक्त करणाऱ्या त्याच्या कवितांनाही एक व्यक्तिगत आणि मानवतावादी आर्तता लाभल्यामुळे त्या प्रचारकी वाटत नाहीत. प्रचलित ग्रामीण कवितेची परंपरा मोडीत काढीत स्पेंडरने दि पायलॉन्स् या कवितेत तंत्रज्ञानविषयक प्रगतीची प्रशंसा केली आहे. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात साम्यवादाविषयी भ्रमनिरास झाल्यावर स्पेंडरने दि गॉड दॅट फेल्ड (१९४९) या ग्रंथात आपली नाराजी व्यक्त केली.

स्टीव्हन स्पेंडरची महत्त्वाची ग्रंथसंपदा पुढीलप्रमाणे : पोएम्स् दि स्टिल सेंटर (१९३९), पोएम्स् ऑफ डेडिकेशन (१९४७), दि एज् ऑफ बीइंग (१९४९), दि क्रिएटिव्ह एलिमेंट (१९५३), दि स्ट्रगल ऑफ द मॉडर्न (१९६३), दि जनरस डेज् (१९७१) आणि लव्ह-हेट रिलेशन्स (१९७४).

स्पेंडरला पुढील मानसन्मान व पुरस्कार मिळाले : कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ द ब्रिटिश एंपायर ’ (१९६२), सर हा किताब (१९८३), गोल्डन पीइएन् ॲवार्ड ’ (१९९५) इत्यादी.

लंडन येथे त्याचे निधन झाले.

सावंत, सुनील