लव्हलेस, रिचर्ड : (? १६१८-? १६५७ ). इंग्रज कवी. त्याचे कुटुंब केंटिश होते तथापि त्याचा जन्म बहुधा नेदरर्लंड्समध्ये झाला असावा. त्याचे वडील तेथे लष्करी सेवेत होते. चार्टरहाऊस ह्या विख्यात शिक्षणसंस्थेत आणि ऑक्सफर्ड येथे त्याचे शिक्षण झाले. १६३६ साली तो एम. ए. झाला इंग्लंडचा तो एक राजदरबारी होता आणि १६३९ सालच्या स्कॉटिश मोहिमेत तो सहभागी झालेला होता. लव्हलेस हा राजनिष्ठ होता आणि १६४२ साली राजनिष्ठांतर्फे ‘हाउस ऑफ कॉमन्स’ ला जो अर्ज (रॉयलिस्ट पिटिशन ) करण्यात आला, तो सादर करण्याचे काम त्याने केले आणि त्याबद्दल त्याला तुरुंगवासही घडला. तेथे त्याने लिहिलेल्या ‘टू अल्थिआ फ्रॉम प्रिझन’ ह्या कवितेतील ‘स्टोन वॉल्स डू नॉट अ प्रिझम मेक’ ही ओळ ख्यातनाम झालेली आहे. १६४८ मध्ये त्याला पुन्हा तुरुंगात टाकण्यात आले. तेथे असताना ‘ल्यूकास्टा काव्यग्रंथ…’, ‘ओड्स’, सॉनेट्स इ. रचना त्याने केली. ल्यूकास्टा हा त्याचा काव्यग्रंथ १६४९ मध्ये प्रसिद्ध झाला. त्याच्या मृत्यूनंतर त्याचा भाऊ डडली याने त्याच्या उरलेल्या कविता एकत्र करून पोस्ट्यूम पोएम्स (१६५९) हा संग्रह प्रसिद्ध केला. लव्हलेस हा बेन जॉन्सनच्या पठडीतल्या ‘कॅव्हेलियर कवी’ पैकी एक होता.

भावनांचा हळूवारपणा, गेयता, साधी शब्दकळा, कल्पनेची तरलता व चिंतनशीलता ही त्याच्या काव्यरचनेची लक्षणीय वैशिष्ट्ये होत.

हलाखीच्या अवस्थेत लंडन येथे तो निधन पावला.

संदर्भ : 1. Jartmann, C. H. The Cavalier Spirit and its Influence on the Life and Work of Richard

              Lovelace, 1925.

           2. Weidhorn, Manfred, Richard Lovelace,New York, 1971.

           3. Wilkison, C. H. Ed. The, Poems of Richard Lovelace, London, 1925.

भागवत, अ. के.