सिडनी, सर फिलिप : (३० नोव्हेंबर १५५४–१७ ऑक्टोबर १५८६). इंग्रज साहित्यिक, दरबारी मुत्सद्दी आणि योद्घा. जन्म पेन्सहर्स्ट, केंट येथे एका सरदार कुटुंबात. शिक्षण श्रूसबरी स्कूल आणि ख्राइस्ट चर्च, ऑक्सफर्ड येथे. १५७१ मध्ये पदवी न घेताच त्याने ऑक्सफर्ड सोडले. त्यानंतर यूरोपमध्ये तीन वर्षे प्रवास करुन त्याने आपले शिक्षण पूर्ण केले. ह्या प्रवासात त्याने फ्रान्स, जर्मनी, ऑस्ट्रिया, पोलंड, इटली इ. देशांना भेटी दिल्या लॅटिन, फ्रेंच, इटालियन ह्या भाषांचे ज्ञान वाढविले राजनैतिक सेवेचे, परराष्ट्रव्यवहारांचे खोल निरीक्षण केले आणि अनेक मित्र मिळविले. इंग्लंडला परतल्यानंतर तो उमरावी जीवन जगू लागला. त्याचे मामा रॉबर्ट ड्यूड्ली (अर्ल ऑफ लायसेस्टर) आणि बहीण (काउंटेस ऑफ पेंब्रोक) ह्यांच्या घरी त्याचे वास्तव्य असे. पहिली एलिझाबेथ इंग्लंडची सम्राज्ञी झाल्यानंतर सिडनीचे वडील ‘लॉर्ड प्रेसिडेंट ऑफ वेल्स’ ह्या पदावर आणि पुढे आयर्लंडचे ‘लॉर्ड डेप्युटी’ म्हणून नेले गेले होते. अशा प्रकारची प्रतिष्ठित, सत्ताधारी वर्गाची कौटुंबिक पार्श्वभूमी असल्यामुळे राजनैतिक सेवेत वा लष्करात त्यास चांगले स्थान मिळणे शक्य होते. काही राजनैतिक स्वरुपाची कामेही त्याच्यावर सोपवली गेली, पण दरबारात त्याला महत्त्वाचे असे पद कधीच मिळाले नाही. सिडनी हा प्रॉटेस्टंटपंथीय होता आणि या पंथीयांची एकता प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्नशील होता. इंग्लंडने यूरोपमधील प्रॉटेस्टंट राष्ट्रांबरोबर राहून रोमन कॅथलिक स्पेनसारख्या राष्ट्राकडून होणाऱ्या संभाव्य धोक्याविरुद्घ प्रतिसंतुलक शक्ती निर्माण करावी, ह्यासाठी तो खटपट करीत होता. त्यासाठी प्रॉटेस्टंट लीग उभी करण्याचे त्याचे उद्दिष्ट होते. १५८१ मध्ये तो इंग्लंडच्या पार्लमेंटचा सदस्य झाला. १५८३ मध्ये त्याला ‘नाइट’ हा किताब देण्यात आला. प्रॉटेस्टंटपंथीय डचांनी त्यांच्या स्पॅनिश सत्ताधाऱ्यांविरुद्घ चालविलेल्या लढायांत इंग्लंडने सक्रिय सहभाग घेतला पाहिजे, ह्यासाठी त्याने यशस्वी प्रयत्न केले. झटफन येथे झालेल्या एका लढाईत जखमी झाल्यामुळे आर्नहेम, नेदर्लंड्स येथे त्याचे निधन झाले.

सर फिलिप सिडनी

सिडनीला साहित्यातही स्वारस्य होते. त्याच्या साहित्यकृतींत द आर्केडिया (१५९०), अस्ट्रोफेल अँड स्टेला (१५९१) आणि द अपॉलाजी फॉर पोएट्री (१५९५ द डिफेन्स ऑफ पोएझी हे त्याचे पर्यायी नाव) ह्या विशेष उल्लेखनीय होत. द आर्केडिया हा गोपजीवनीय (पास्टोरल) वातावरण असलेला एक गद्य रोमान्स आहे. त्यात काही पद्येही आहेत. ह्याच्या तीन संहिता आहेत. यांपैकी दुसरी संहिता १५९० मध्ये प्रसिद्घ झाली. तिसरी संहिता सिडनीच्या बहिणीने १५९३ मध्ये प्रसिद्घ केली. पहिली छोटी संहिता मात्र १९२६ मध्ये प्रसिद्घ झाली. गुंतागुंतीचे संविधानक न्याय, सद्गुण, आत्मसन्मान, मैत्री अशा विषयांवर भाष्य करण्यासाठी केलेली विषयांतरे विस्तारशील शैली ही द आर्केडियाची काही वैशिष्ट्ये. ॲस्ट्रोफेल अँड स्टेला ही एक सुनीतमाला आहे. एसेक्सच्या अर्लची मुलगी पनेकुणी हिच्यावरील सिडनीच्या असफल प्रेमातून ही सुनीते रचिली गेली असे म्हटले जाते. उत्कट प्रेमाच्या विविध भावावस्था ह्या सुनीतांतून प्रकट झालेल्या आहेत. इंग्रजीतील उत्कृष्ट सुनीतांमध्ये त्यांतील काही सुनीतांची गणना केली जाते द अपॉलजी फॉर पोएट्री हा एक निबंध असून त्यात काव्यकलेची पद्घतशीर चिकित्सा केलेली आहे. त्याचप्रमाणे स्वतःच्या काळातील इंग्रजी कवितेचीही त्याने चर्चा केली आहे. अशी चर्चा इंग्रजीत पूर्वी कधी झालेली नव्हती. आरंभी काव्याच्या स्वरुपाविषयी त्याने विचार मांडले आहेत. त्यानंतर कवितेच्या वेगवेगळ्या प्रकारांचे वर्गीकरण करुन त्यांचा इतिहास, तत्त्वज्ञान त्यांच्याशी असलेल्या संबंधाची चर्चा त्याने केली आहे. प्लेटोने तसेच अन्य काहींनी कवितेवर घेतलेल्या आक्षेपांचाही परामर्श त्याने घेतला आहे. शोकात्मिका आणि सुखात्मिका यांच्या संदर्भात कोणती तत्त्वे पाळली जावीत, याबद्दलही त्याने विचार मांडले आहेत. त्यानंतर त्याने छंदशास्त्राबद्दल – विशेषतः इंग्रजी कवितेच्या संदर्भात – विवेचन केले आहे.

कुलकर्णी, अ. र.