सॅम्युएल जॉन्सनजॉन्सन, सॅम्युएल : (१८ सप्टेंबर १७०९-१३ डिसेंबर १७८४). इंग्रज कवी, पत्रकार-निबंधकार, कोशकार व समीक्षक. जन्म लिचफील्ड,  स्टॅफर्डशर येथे. त्याचे वडील ग्रंथविक्रेते होते. ऑक्सफर्ड विद्यापीठात प्रवेशूनही तो प्रतिकूल परिस्थितीमुळे पदवीधर होऊ शकला नाही. एलिझाबेथ पोर्टर या विधवेशी १७३५ मध्ये विवाह केल्यानंतर त्याने लिचफील्डजवळ एक शाळा काढली. ती फारशी चालली नाही. १७३७ मध्ये जॉन्सन लंडनला आला. द जंटल्‌मन्स मॅगझिनमधून तो लेखन करू लागला. ‘लंडन’ ही जॉन्सनची कविता १७३८ मध्ये निनावी प्रसिद्ध झाली. तथापि ही कविता लिहिणारा कवी फार काळ अप्रसिद्ध राहणार नाही, असे भाकीत अलेक्झांडर पोपसारख्या श्रेष्ठ कवीने त्या वेळी वर्तविले होते. त्यानंतर त्याने लिहिलेले रिचर्ड सॅव्हिज ह्या कवीचे चरित्र, शेक्सपिअरच्या मॅक्बेथवर केलेले समीक्षात्मक लेखन इत्यादींमुळे त्याच्या नावाचा बोलबाल होऊ लागला. १७४७ मध्ये त्याने आपल्या इंग्रजी शब्दकोशाची योजना जाहीर केली. त्यानंतर दोन वर्षांनी ‘द व्हॅनिटी ऑफ ह्यूमन विशेस’ हे त्याचे उत्कृष्ट दीर्घकाव्य प्रसिद्ध झाले आणि आयरीन  ही त्याची शोकात्मिका गॅरिकने रंगभूमीवर आणली. द रँब्‍लर  हे नियतकालिक त्याने १७५० मध्ये काढले. त्यातील जवळजवळ सारे लेखन त्याने स्वतः केले. ‘द आयड्‌लर ’ ह्या टोपण नावाने द युनिव्हर्सल क्रॉनिकलमध्ये नैतिक उद्‌बोधनात्मक निबंधही लिहिले. रासेलस  ही दीर्घ बोधकथा त्याने १७५९ मध्ये लिहिली. द लाइव्ह्‌ज ऑफ द पोएट्समध्ये (१७७९–८१) त्याने लिहिलेली ५२  इंग्रज कवींची चरित्र अंतर्भूत आहेत.

जॉन्सनचा खरा पिंड व्यासंगी पण आग्रही समीक्षकाचा होता. शाळेत आणि विद्यापीठात ग्रीक-लॅटिन भाषा-साहित्यांचे सखोल संस्कार त्याच्या मनावर झाले होते. त्याच्या लेखनातून त्यांचा प्रत्यय येतोच. ‘व्हॅनिटी ऑफ ह्यूमन विशेस’ सारख्या त्याच्या कवितेत प्रगल्भ नैतिक उद्‌बोधन व विवक्षितापेक्षा सर्वसाधारणाचे चित्रण हे तत्कालीन नव-अभिजाततावादी काव्यविशेष आढळतात. ‘हीरोइक कप्लेट’ हा त्या वेळी रूढ असलेला छंद मात्र त्याने विशेष समर्थपणे हाताळल्याचे दिसते. त्याची आयरीन  ही शोकात्मिका नीतिवादी दृष्टीकोणातूनच लिहिलेली आहे. ती फारशी यशस्वी ठरली नाही. द रँब्‍लरमधून जॉन्सनने लिहिलेली निबंधही बोधवादी आहेत. त्यांतून तत्कालीन सामाजिक व वाङ्‌मयीन परिस्थितीचे प्रतिबिंब उमटलेले आहे. तथापि ॲडिसन आणि स्टील ह्यांनी स्पेक्टेटरमधून निर्माण केलेली रॉजर डी कॉव्वुर्लीसारखी व्यक्तिरेखा तो निर्माण करू शकला नाही. द रँब्‍लरमधून जॉन्सनने केलेला नीत्युपदेश मुख्यतः व्यावहारिक स्वरूपाचा आहे. मनुष्येच्छांच्या निरर्थकतेचा विषय त्यांतून आलेला आहे. ‘द आयड्‌रल’ ह्या टोपण नावाने त्याने जे निबंध लिहिले, त्यांत मात्र थोडा हलकेफुलकेपणा आणण्याचा प्रयत्‍न दिसतो. राजकीय विषयांना वाहिलेली काही पुस्तपत्रे आणि निबंधही त्याने लिहिले.

जॉन्सनने रचिलेला इंग्रजी शब्दकोश (१७५५) हे त्याचे महान कार्य होय. वास्तविक नाथॅन्येल बेली ह्याची युनिव्हर्सल एटिमॉलजिकल इंग्‍लिश डिक्शनरी (१७२१) ही जॉन्सनच्या शब्दकोशाच्या आधीची तथापि जॉन्सनचा शब्दकोश म्हणजे इंग्रजी भाषेच्या व्यवस्थितिकरणाच्या दिशेने टाकलेले पहिले लक्षणीय पाऊल होते. इंग्रजी शब्दांचे उच्चार आणि अर्थ निश्चित करणे, तिची शुद्धता टिकवणे आणि तिला दीर्घजीवित्व प्राप्त करून देणे हे जॉन्सनच्या शब्दकोशरचनेमागील मुख्य उद्देश होते. ह्या शब्दकोशातून जॉन्सनच्या इंग्रजीवरील गाढ प्रभुत्वाची प्रचीती येते. एकेका शब्दाच्या विविध अर्थच्छटा स्पष्ट करताना त्याने मार्मिक उदाहरणे दिलेली आहेत. त्याने दिलेल्या व्याख्याही काटेकोर आहेत. शब्दांच्या व्युत्पत्त्या देताना मात्र त्याच्या मर्यादा जाणवतात. त्याच्या हयातीतच ह्या कोशाच्या पाच आवृत्त्या निघाल्या. तथापि त्याच्या आर्थिक स्थितीत फारशी सुधारणा झाली नाही. आपल्या आईच्या अंत्ययात्रेचा खर्च भागविण्यासाठी त्याला रासेलस  ही दीर्घ बोधकथा लिहावी लागली (१७५९). तीत एका राजपुत्राच्या कथेच्या आधारे मानवी जीवनाच्या मर्यादा आणि त्यात अनुभवास येणारा भ्रमनिरास ह्यांवरील तात्त्विक चर्चा केलेली आहे. ह्या ग्रंथाचे अनेक भाषांत अनुवाद झाले. कृष्णशास्त्री चिपळूणकर ह्यांनी तो रासेलस  ह्या नावानेच मराठीत आणला (१८७३).

जॉन्सनने १७४५ मध्ये मॅक्‍बेथवर लेखन केले व शेक्सपिअरच्या नाट्यकृती संपादून प्रसिद्ध करण्याची आपली योजना जाहीर केली. त्यानंतर वीस वर्षांनी हे कार्य त्याच्या हातून पूर्ण झाले. शेक्सपिअरच्या उपलब्ध नाट्यसंहितांतील पाठशोधन करणे, त्यांतील दुर्बोध भागांवर प्रकाश टाकणे आणि त्यांचे वाङ्‌मयीन आधार मुळातून तपासून पाहणे ही त्याच्या संपादनाची मुख्य उद्दिष्टे होती. तथापि त्याची प्रस्तावना व त्याने दिलेल्या टीपा ह्यांमुळे शेक्सपिअरसमीक्षेत जॉन्सनच्या ह्या आवृत्तीला विशेष महत्त्व प्राप्त झाले. बुद्धिवादी प्रवृत्तीच्या अठराव्या शतकातील एका श्रेष्ठ साहित्यिकाने शेक्सपिअरचा उदारपणे केलेला गौरव म्हणून जॉन्सनच्या ह्या प्रस्तावनेकडे पाहिले जाते. लाइव्ह्‌ज ऑफ द पोएट्‌स  ही त्याने लिहिलेली कविचरित्रमालाही संस्मरणीय ठरलेली आहे मात्र मिल्टन, टॉमस ग्रे यांसारख्या कवींच्या जीवनाविषयीचे आपले पूर्वग्रह दूर ठेवून अलिप्तपणे त्यांच्या कर्तृत्वाचे मूल्यमापन करणे त्याला जमलेले नाही.

त्याच्या वाङ्‌मयीन कर्तृत्वाप्रमाणेच त्याचे स्वाभिमानी, जिद्दी पण तऱ्हेवाईक व्यक्तिमत्त्वही लक्षवेधी ठरले. चरितार्थासाठी त्याने अविरत कष्ट केले, दम्यासारख्या व्याधीला त्याने खंबीरपणे तोंड दिले. वरवर पाहता त्याचे वर्तन तुसडेपणाने आणि खडबडीत वाटे परंतु त्याचे अंतःकरण अतिशय मृदू होते. तो संभाषणचतुर असल्यामुळे त्याच्या भोवती अनेक मित्रांचे कडे तयार झाले होते. विद्वत्ता व वादपटुत्व ह्यांच्या जोरावर त्याच्या काळातील वाङ्‌मयसृष्टीवर त्याने अधिसत्ता गाजविली. कोणाच्याही आश्रयावर अवलंबून न राहता लेखकाने स्वतःच्या कर्तृत्वावर उभे राहिले पाहिजे हे त्याने कृतीने दाखवून दिले. आपला शब्दकोश तो प्रथम लॉर्ड चेस्टरफील्ड ह्या विद्याप्रेमी इंग्रज मुत्सद्याला अर्पण करणार होता पण चेस्टरफील्डकडून आपली उपेक्षा झाली असे वाटल्यावरून त्याने तो बेत रद्द केला आणि त्याच्या शब्दकोशाची चेस्टरफील्डकडून पुढे जी स्तुती झाली, तिलाही त्याने किंमत दिली नाही.

त्याची वाङ्‌मयसेवा लक्षात घेऊन सरकारतर्फे त्याला ३०० पौंडांचे वार्षिक मानवेतन सुरू करण्यात आले (१७६२). डब्‍लिन आणि ऑक्सफर्ड विद्यापीठांनी अनुक्रमे १७६५ आणि १७७५ मध्ये त्याला एल्‌एल्‌.डी. ही सन्मानपदवी दिली.

लंडन येथे तो निधन पावला. जॉन्सनच्या मृत्यूनंतर त्याचा एक निकटचा मित्र जेम्स बॉझ्वेल ह्याने लिहिलेले जॉन्सनचे चरित्र प्रसिद्ध झाले (१७९१). विष्णुशास्त्री चिपळूणकर ह्यांनी लिहिलेले जॉन्सनचरित्र द. वा. पोतदार ह्यांनी संपादिले आहे (१९२४). जॉन्सनचे संकलित ग्रंथ आर्थर मर्फी ह्याने १२ खंडांत प्रसिद्ध केले (१७९२).

संदर्भ :

1. Bailey, J. C. Dr. Johnson and His Circle, London, 1913.

2. Brown, J. E. The Critical Opinions of Samuel Johnson, Princeton, 1926.

3. Chapman, R. W. Johnsonian and Other Essays, Oxford, 1953.

4. Courtney, W. P. Smith, D. Nichol, A Bibliography of Samuel Johnson, Oxford, 1915.

5. Hagstrum, J. H. Samuel Johnson’s Literary Criticism, Minneapolis, 1952.

6. Houston, P. H. Dr. Johnson, A Study in Eighteenth Century Humanism, Cambridge, Mass., 1923.

7. Raleigh, W. Six Essays on Johnson, Oxford, 1910.

8. Wimsatt, W. K. The Prose Style of Samuel Johnson, New Haven, 1941.

देवधर, वा. चिं.