वॉल्पोल, सर ह्यू सीमोर : (१३ मार्च १८८४- १ जून १९४१). इंग्रज साहित्यिक. ऑक्लंड, न्यूझीलंड येथे जन्मला. त्याचे वडील अँग्लिकन धर्मोपदेशक होते. कँटरबरी येथील किंग्ज स्कूलमध्ये काही शिक्षण घेतल्यानंतर पुढचे शिक्षण त्याने डरॅम आणि केंब्रिज येथे घेतले. काही काळ त्याने अध्यापनात व्यतीत केला पण त्यात तो यशस्वी झाला नाही. पुढे त्याने स्वतःस लेखनालाच वाहून घेतले.

कथा, कादंबऱ्या प्रकारचे लेखन त्याने विपुल प्रमाणात केले आहे. मिस्टर पेरिन अँड मिस्टर ट्रेल (१९११), फॉर्टिट्यूड (१९१३), द डार्क फॉरेस्ट (१९१६) ह्या त्याच्या कादंबऱ्या उल्लेखनीय आहेत. जेरमी (१९१९), द कॅथीड्रल (१९२२), जेरमी अँड हॅम्लेट (१९२३), जेरमी ॲट केल (१९२७) ह्या त्याच्या कादंबऱ्या काहीशा आत्मचरित्रात्मक आहेत. द थर्टिन ट्रॅव्हलर्स (१९२१), द सिल्व्हर थॉर्न (१९२८) हे त्याचे काही कथासंग्रह. विख्यात कादंबरीकार जोसेफ कॉनरॅड आणि अँटोनी ट्रॉलप ह्यांवरही त्याने लिहिले.

वॉल्पोलला मोठी लोकप्रियता प्राप्त झाली. १९३७ मध्ये त्याला ‘सर’ हा किताब देण्यात आला. केझिक, कंबर्लंड तेथे तो निधन पावला.

संदर्भ : 1. Hart-Davis, R. Hugh Walpole: A Biography, New York, 1952.

          2. Swinnerton, Frauk, The Georgian Literary Scene, London, 1935.

कुलकर्णी, अ. र.