हूकर, रिचर्ड : (? मार्च १५५४ – २ नोव्हेंबर १६००). इंग्रज ईश्वरविद्यावेत्ता. हूकरची जन्मतारीख निश्चितपणे ज्ञात नाही; तथापि १५५३ च्या अखेरीस किंवा १५५४ च्या आरंभी एक्झेटर शहराच्या जवळील हेविट्री येथे त्याचा जन्म झाला असावा. विद्यापीठात शिक्षणासाठी पाठविण्याइतपत त्याच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती नव्हती; तथापि सॅलिस्बरीचा बिशप जॉन ज्यूएल ह्याच्या साहाय्यामुळे त्याला ऑक्सफर्डच्या कॉर्पस ख्रिस्ती महाविद्यालयात प्रवेश घेणे शक्य झाले. त्या काळी ‘चर्च ऑफ इंग्लंड ‘मध्ये ल्यूथरप्रणीत विचारसरणीचा फ्रेंच ईश्वरविद्यावेत्ता ⇨ जॉन कॅल्व्हिन (१५०९–६४) ह्याच्या इन्स्टिट्यूट्स ऑफ द ख्रिश्चन रिलिजन (१५३६, इं. भा.) ह्या ग्रंथाचा मोठा प्रभाव होता. त्यामुळे हूकरचे प्रशिक्षण त्या परंपरेत झाले; तथापि हूकर हा कट्टर अँग्लिकन (चर्च ऑफ इंग्लंडचा अनुयायी) होता. तो उदार कॅल्व्हिनवादाच्या पलीकडे गेला. मध्ययुगातील श्रेष्ठ ईश्वरविद्यावेत्ता आणि तत्त्वचिंतक ⇨ सेंट टॉमस अक्वाय्नस (१२२५ ?–७४) ह्याच्या विचाराच्या प्रभावातून निर्माण झालेल्या रेनेसान्स टॉमिझम ह्या संप्रदायाच्या विचारांचाही त्याने अभ्यास केला. १५७७ मध्ये त्याने एम्.ए. ही पदवी प्राप्त केली. त्याच वर्षी तो त्याच्या कॉलेजचा अधिछात्र झाला. १५८५ मध्ये त्याची ‘द टेंपल चर्च’ चा मास्टर म्हणून निवड झाली आणि तोतेथे धर्मोपदेशात्मक भाषणे देऊ लागला.
स्पॅनिश आर्माडाचा १५८८ मध्ये पराभव झाल्यानंतर ‘चर्च ऑफइंग्लंड ‘ला रोमन कॅथॉलिसिझमचा असलेला धोका नाहीसा झाला; पण कॅल्व्हिनिझमचा धोका होताच. प्रॉटेस्टंट धर्मसुधारणेच्या चळवळीनंतर कॅथलिक चर्चमध्ये सुधारणा घडवून आणण्यासाठी झालेल्या आणि ‘काउन्सिल ऑफ ट्रेंट’ ह्या नावाने ओळखल्या जाणाऱ्या परिषदेत (१५४५–६३) झालेल्या निर्णयांपैकी अनेक निर्णय हूकरला मान्य नव्हते; तथापि मध्ययुगातील अनेक स्कोलॅस्टिक तत्त्वज्ञांचे आणि ईश्वरविद्यावेत्त्यांचे – उदा., सेंट टॉमस अक्वाय्नस – विचार त्याला मान्य होते आणि तो ते आपल्या भाषणांतून मांडत होता.
१५८८ मध्ये ‘द टेंपल चर्च’ मध्ये शिकवत असतानाच हूकरने आपल्या मित्राची मुलगी जोन चर्चमन हिच्याशी विवाह केला. तिने तिच्याबरोबर आणलेल्या मालमत्तेमुळे हूकरची आर्थिक स्थिती सुधारली. १५९१ मध्ये ‘द टेंपल चर्च ‘मध्ये शिकवण्याचा संबंध संपल्यानंतर हूकर आपल्या सासऱ्याकडेच राहू लागला आणि तेथेच त्याने त्याचा ऑफ द लॉज ऑफ एक्लिझिॲस्टिकल पॉलिसी हा महत्त्वाचा ग्रंथ लिहिला. ह्या ग्रंथात हूकरने रोमन कॅथलिक आणि प्यूरिटन ह्यांना विरोध करून एलिझाबेदन चर्चचे समर्थन केले. आठव्या हेन्रीच्या पहिल्या पत्नीची मुलगी १५५३ मध्ये इंग्लंडची राणी झाली आणि तिने कॅथलिक पंथाचा प्रभाव पुन्हा वाढवण्याचे धोरण अवलंबिले होते. प्रॉटेस्टंट पंथीयांचा तिच्या कारकिर्दीत छळ झाला. तिची सावत्र बहीण एलिझाबेथ पहिली ही १५५८ मध्ये सम्राज्ञी झाल्यानंतर तिचे धोरण प्रॉटेस्टंटांना अनुकूल झाले. हूकरने रोमन कॅथलिक आणि प्यूरिटन पंथीय ह्यांच्या विरोधात लेखन केले, त्याला हा संदर्भ होता. हूकरने आपली निष्ठा राणीला वाहिलेली होती आणि चर्च व राज्य ह्यांच्यात एकता असली पाहिजे, अशी त्याची धारणा होती.
कँटरबरी, केंटजवळील बिशप्सबोर्न येथे तो निधन पावला.
कुलकर्णी, अ. र.