ओनील, यूजीन ग्‍लॅडस्टन : (१६ ऑक्टोबर १८८८ — २७ नोव्हेंबर १९५३). एक आधुनिक अमेरिकन नाटककार. जन्म न्यूयॉर्क शहरी. अमेरिकन रंगभूमीवरील जेम्स ओनील ह्या प्रसिद्ध अभिनेत्याचा हा मुलगा. विविध खासगी शिक्षणसंस्थांतून त्याने शिक्षण घेतले. प्रिन्स्टन विद्यापीठात एक वर्ष काढल्यानंतर नट, नाट्यसंस्था व्यवस्थापक, पत्रकार, खलाशी असे अनेक व्यवसाय त्याने केले. १९१२ मध्ये तो क्षयाने आजारी पडला आणि काही काळ त्याला एका रुग्णाश्रमात रहावे लागले. बरा झाल्यानंतर त्याने नाट्यलेखनाचा व्यवसाय पत्करला. सुरुवातीला त्याने बाउंड ईस्ट फॉर कार्डिफ (१९१६) वगैरे दर्यावर्दी जीवनावरील एकांकिका लिहिल्या. तथापि बियाँड द होरायझन (१९२०) या नाट्यकृतीपासून ओनीलची विस्तृत व प्रयोगशील नाट्यनिर्मिती खऱ्या अर्थाने सुरू आली. द एम्परर जोन्स (१९२०) या नाटकात एका निग्रो ‘दादा’ च्या व द हेअरी एप (१९२२) या नाटकात एका खलाशी ‘दादा’ च्या अधःपाताचे सूक्ष्म परंतु रंगदार चित्रण, अभिव्यक्तिवादी तंत्राचा यशस्वी उपयोग करून, त्याने केले आहे. डिझायर अंडर द एल्म्समध्ये (१९२४) प्यूरिटन मनाचे सखोल चित्रण आहे. स्ट्रेंज इंटरल्यूड (१९२८) या शोकात्मिकेत संज्ञाप्रवाहात्मक संभाषणांचा प्रयोग केलेला दिसतो. मोर्निंग बिकम्स इलेक्ट्रा (१९३१) ह्या नाटकत्रयीत एस्किलसच्या ओरेस्टेइआ  ह्या प्रख्यात ग्रीक नाटकत्रयीतील शाप, जारकर्म व सूड या विषयांची मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून मांडणी करण्याचा प्रभावी प्रयत्न केला आहे. ही कलाकृती म्हणजे ओनीलच्या कलेचा कळस होय. लाँग डेज जर्नी इंटू नाइट (१९५६) हे आत्मचरित्रात्मक नाटक आहे. काही जुन्या नाट्यतंत्रांचाही त्याने उपयोग करून घेतला. उदा., द ग्रेट गॉड ब्राउन (१९२६) आणि लॅझरस लाफ्ड (१९२७) ह्या दोन नाटकांत त्याने मुखवट्यांचा उपयोग केला आहे.

यूजीन ग्‍लॅडस्टन ओनील

पार्श्वभूमी, मानवी स्वभाव व तंत्र यांतील विविधता हा ओनीलच्या नाट्याचा एक मोठा गुण. मानवी आयुष्याची शोकात्मिका, मनुष्यस्वभावाचे विचित्र कंगोरे व प्यूरिटन मनाच्या विकृती हे त्याचे आवडते विषय. शैलीचा थिटेपणा व भडक प्रसंगांची आवड हे दोष सोडले, तर जीवनाकडे उघड्या डोळ्यांनी पण तितक्याच सहृदयतेनेही पाहणारा व मानवी मनाचे इतके सूक्ष्म दर्शन घडविणारा ओनीलएवढा नाटककार अमेरिकन वाङ्‌मयात नाही.

त्याच्या बियाँड द होरायझन, स्ट्रेंज इंटरल्यूड आणि लाँग डेज जर्नी इंटू नाइट  ह्या नाटकांना पुलिट्झर पारितोषिके मिळाली. १९३६ मध्ये त्याला नोबेल पारितोषिकाचा बहुमान प्राप्त झाला. बॉस्टन येथे तो निधन पावला.

संदर्भ : 1. Clark, B.H. Eugene O’Neill, The Man and His Plays, New York, 1947.

    2. Gelb, Arthur Gelb, Barbara, Eugene O’Neill, London, 1962.

    3. Leech, Clifford, Eugene O’Neill,  New York, 1963.

नाईक, म. कृ.