इंग्रजी भाषा : इंग्लिश ही इंडो-यूरोपियन कुटुंबाच्या जर्मानिक गटाची भाषा आहे. मराठीत या भाषेला इंग्रजी हे नाव असून ते पोर्तुगीजमधून घेतलेले आहे. इंग्लिश ही मुळात इंग्लंडची भाषा. नंतर ती इंग्रजांच्या वसाहतींत व त्यांच्या स्वामित्वाखालील प्रदेशांत पसरली. आज ती इंग्लंडबाहेर आयर्लंड, अमेरिका, कॅनडा, वेस्ट इंडीज, दक्षिण आफ्रिका, ऱ्होडेशिया, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, भारत, पाकिस्तान, बांगला देश, ब्रह्मदेश, श्रीलंका त्याचप्रमाणे जगाच्या इतर काही भागांत बोलली जाते. अरुणाचल व नागालँड या भारतीय राज्यांची ती राजभाषा आहे. इंग्लिश भाषिकांची नक्की संख्या सांगणे कठीण आहे परंतु ती जवळजवळ तीस कोटी लोकांची मातृभाषा असून आणखी तितक्याच लोकांना ती बोलता व लिहितावाचता येते, असे म्हणणे अतिशयोक्तीचे होणार नाही. पहिल्या महायुद्धानंतर जागतिक व्यवहारातील फ्रेंचचे महत्त्व कमी होऊन ते इंग्लिशकडे गेले. दुसऱ्या महायुद्धानंतरच्या अमेरिकन वर्चस्वामुळे ते पुष्कळच वाढले आहे

इतिहास : इतिहासकाळाच्या प्रारंभी इंग्लंडचे रहिवाशी केल्टिक भाषिक असावेत. आयर्लंड, स्कॉटलंड व वेल्स येथील लोक अजूनही केल्टिक बोलीच बोलतात. याशिवाय रोमन साम्राज्याच्या काळात तिथे काही नवलॅटिन बोलीही वापरल्या जात होत्या, असा तर्क आहे. पण पाचव्या शतकाच्या आसपास जर्मानिक भाषिक लोकांचे या प्रदेशावर आक्रमण सुरू झाले आणि हे चित्र बदलले. जर्मानिक आक्रमण तीन जमातींचे होते : अँगल, सॅक्सन व ज्यूट, अँग्लियन बोली उत्तरेकडे पसरल्या आणि त्यांच्यात नॉर्दंब्रियन व मर्सियन असे दोन भेद होते. बहुतांश दक्षिण भागात सॅक्सन बोली पसरल्या. वेसेक्सची बोली ही त्यांच्यातली सर्वांत महत्त्वाची बोली होती. ज्यूट बोली केंटमध्ये बोलल्या जात असून त्यांना केंटिश हे नाव होते

ऐतिहासिक म्हणजे कालिक भेदाच्या दृष्टीने इंग्लिश भाषेचे तीन भाग पाडण्यात येतात :  अँग्लो-सॅक्सन किंवा प्राचीन इंग्लिश, मध्यकालीन इंग्लिश व अर्वाचीन इंग्लिश

प्राचीन इंग्लिशचा कालखंड जर्मानिक आक्रमण पूर्ण झाल्यापासून नॉर्मन विजयापर्यंत, म्हणजे सातव्या शतकाच्या अखेरीपासून अकराव्या शतकाच्या उत्तरार्धापर्यंत, मानला जातो. लॅटिनच्या प्रभावापासून जवळजवळ मुक्त असे अँग्लो-सॅक्सन रूप, विकारप्रधान रूपपद्धती व शक्य तितके उच्चारानुसारी लेखन ही या भाषेची वैशिष्ट्ये होत. शब्दांना वाक्यातील त्यांच्या कार्यानुसार विकार होत असल्यामुळे वाक्यरचनेत स्थानदृष्ट्या त्यांना स्वातंत्र्य होते. या भाषेचे अनेक स्थानिक भेद होते, परंतु त्यांपैकी ॲल्फ्रेड राजाची (८४९–९०१) वेसेक्स बोली सर्वांत महत्त्वाची मानली जाते, कारण तिच्यात विपुल साहित्यरचना झाली आहे. त्यामुळे प्राचीन इंग्लिश भाषेची व्याकरणे व शब्दकोष हे मुख्यतः वेसेक्स बोलीचेच आहेत

मध्यकालीन इंग्लिशचा काळ नॉर्मन विजयापासून मध्ययुगाच्या अंतापर्यंतचा, म्हणजे पंधराव्या शतकाच्या मध्यापर्यंतचा आहे. प्रथम नॉर्स (स्कँडिनेव्हियन) आक्रमण व नंतर नॉर्मन विल्यम (१०२७–१०८७) व त्याचे वंशज यांची राजवट यांमुळे शब्दसंग्रहात प्रचंड बदल घडून आले. प्राचीन इंग्लिशच्या उत्तरकाळात दुबळी होत चाललेली विकारनिष्ठ पद्धती मध्यकाळात आणखी ढासळली. विकारक्षीणतेमुळे शब्दक्रमाला असलेले लवचिकपणाचे स्वातंत्र्य कमी झाले आणि शब्दांचे वाक्यातील कार्य दर्शविणारे, नामांपूर्वी येणारे संबंधदर्शक शब्द अपरिहार्यपणे वाढले. फ्रेंच लेखनिकांची अडचण दूर व्हावी म्हणून त्यांना अपरिचित असणारी इंग्लिश अक्षरे व शब्द यांच्या लेखनपद्धतीत सोयीस्कर बदल करण्यात आले आणि त्यामुळे एकंदर लेखनच गोंधळाचे बनले. या मधल्या काळात पांडित्यपूर्ण लेखनाचे माध्यम लॅटिन होते व प्रतिष्ठित वर्गाची भाषा फ्रेंच होती. अर्थातच इंग्लिश बोलींचे महत्त्व कमी झाले आणि प्रमाणभूत बोलीबद्दल कोणत्याही समाजात स्वाभाविकपणे दिसून येणारी आस्था मागे पडली. आणि अशी प्रमाणभूत बोलीच नजरेसमोर नसल्यामुळे तिला अनुकूल असे सर्वमान्य लेखन स्वीकारण्याच्या तत्त्वाकडे दुर्लक्ष झाले. नंतरच्या काळात राजकीय, व्यापारी, धार्मिक, इ. कारणांनी लंडनचे श्रेष्ठत्व प्रस्थापित होताच तिथल्या सुशिक्षित वर्गाची बोली लिखित भाषेचे प्रमाण व साहित्यिक अभिव्यक्तीचे साधन बनली आणि अशा रीतीने वेसेक्स बोलीची जागा मिडलँडच्या बोलीने घेतली.

पंधराव्या शतकाच्या मध्यापासून अखेरपर्यंतचा काळ मध्यकालीन इंग्लिश व अर्वाचीन इंग्लिश यांच्यामधील संक्रमक काळ असून या काळात व त्यापूर्वीच्या शंभर वर्षांत इंग्लिश भाषेचे शब्दभांडार लॅटिनमधील पारिभाषिक संज्ञा स्वीकारल्यामुळे व यूरोप खंडाशी आलेल्या शास्त्रीय व सांस्कृतिक संबंधांमुळे अधिक समृद्ध बनले.

अर्वाचीन इंग्लिशचा काळ सोळाव्या शतकाच्या प्रारंभापासून किंवा सामान्यपणे सातव्या हेन्रीच्या मृत्यूपासून (१५०९) सुरू होतो. त्यातला ॲन राणीच्या राज्याभिषेकापर्यंतचा किंवा १७०० पर्यंतचा दोनशे वर्षांचा काळ हा पूर्व अर्वाचीन काळ व त्यानंतरचा उत्तर अर्वाचीन काळ म्हटला जातो. पूर्व अर्वाचीन काळ संपतासंपता इंग्लिशची लेखनपद्धती स्थिर झाली आणि तिच्या उच्चारपद्धतीतही महत्त्वाची परिवर्तने घडून आली. १७०० पासून प्रचारात असलेले इंग्लिश भाषेचे स्वरुप आज वापरल्या जाणाऱ्या इंग्लिशपेक्षा फारसे भिन्न नाही.

अर्वाचीन इंग्लिश भाषा सांस्कृतिक पुनरुज्जीवनाच्या लाटेमुळे आलेल्या लॅटिन शब्दांनी व शब्दविकारांच्या लोपाने वैशिष्ट्यपूर्ण बनलेली आहे. नाम-क्रियापदांसारख्या शब्दांना लागणारे कार्यदर्शक प्रत्यय भाषेतून जवळजवळ पूर्णपणे नाहीसे झाल्यामुळे वाक्यातील शब्दक्रम पक्का ठरुन गेला. नामाआधी येणाऱ्या संबंधदर्शक शब्दांचा उपयोग सर्रास होऊ लागला. १४५० ते १७०० या काळात इंग्लिश स्वरपद्धतीत अत्यंत महत्त्वाची परिवर्तने घडून आली. पूर्वी बऱ्याच अंशी लॅटिन स्वरांप्रमाणे असलेले इंग्लिश स्वरांचे स्वरुप पंधराव्या व सतराव्या शतकांच्या दरम्यान बदलत जाऊन त्यांना आजचे स्वरुप प्राप्त झाले. मात्र पहिल्या एलिझाबेथ राणीच्या (१५३३–१६०३) काळात शब्दांचे लिखित स्वरूप स्थिर होत आले होते, ते नंतर घडून आलेले ध्वनिपरिवर्तन लक्षात न घेता तसेच कायम ठेवण्यात आल्यामुळे उच्चार व लेखन यांत आज दिसून येणारे महदंतर अपरिहार्यपणे निर्माण झाले.

प्रादेशिक भेद : इंग्लिशच्या प्रादेशिक भेदांचा विचार दोन दृष्टींनी करावा लागतो. एक खुद्द इंग्लंडमधील म्हणजे या भाषेच्या मायभूमीतील बोलींत आढळणारे भेद आणि दुसरे बाह्य जगातील ज्या ज्या प्रदेशांत इंग्लिश जाऊन स्थिरावली तिथले भेद. यांपैकी अमेरिकेसारख्या काही प्रदेशांत मुळात इंग्लिश बोलणाऱ्या लोकांनी, म्हणजे इंग्रजांनी, जाऊन वसाहत केली, तर काही प्रदेशांत स्वतःची मूळ भाषा टाकून किंवा टिकवून तेथील लोकांनी इंग्लिशचा स्वीकार केला.

इंग्लंडमध्ये स्थानिक भेद असंख्य असले, तरी त्या सर्वांचे प्राथमिक वर्गीकरण पाच भागांत करता येते. ते पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर व मध्य हे होत. या सर्व बोली महत्त्वाच्या असल्या, तरी त्यांचे संशोधन अजून नीट झालेले नाही. आजपर्यंत गोळा केलेली बहुतेक सामग्री शब्दसंग्रहासंबंधीची आहे. मात्र दुसऱ्या जागतिक युद्धानंतर भाषाशास्त्रीय अभ्यासाला मिळालेल्या चालनेमुळे अभ्यासकांचे लक्ष या प्रश्नाकडे लागले असून लौकरच ही उणीव भरुन निघेल.

बाह्य जगातील महत्त्वाचे प्रदेश अमेरिका, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका, र्‍होडेशिया तसेच भारत व पाकिस्तान हे होत. लोकसंख्येच्या दृष्टीने पाहिल्यास एकट्या अमेरिकेमधील इंग्लिश भाषिकांची संख्या उरलेल्या सर्व इंग्लिश भाषिकांच्या जवळजवळ तिप्पट आहे. ब्रिटिश इंग्लिश व्यतिरिक्त या भाषेच्या इतर कोणत्याही भेदाकडे तुच्छतेने पाहण्याच्या इंग्रजी वृत्तीमुळे बाह्य जगातील प्रदेशांत-विशेषतः अमेरिकेत-तीव्र प्रतिक्रिया आढळून येते. स्वतःच्या भाषेला काही अमेरिकन लोक ‘अमेरिकन’ हेच नाव देतात. मात्र दुसऱ्या जागतिक युद्धानंतर ब्रिटिश इंग्लिश मागे पडली असून बाह्य जगातील इंग्लिशवर अमेरिकनचाच अधिकाधिक प्रभाव पडत आहे.

स्थूल भाषिक वर्णन : पुढे दिलेल्या वर्णनात सामान्यपणे ब्रिटिश इंग्लिश आधारभूत मानलेली असून तिची सर्वसाधरण वैशिष्ट्येच दिली आहेत.


ध्वनिविचार:  इंग्लिशचे मूलभूत वर्ण पुढीलप्रमाणे आहेत :

स्वर

पुढचा मधला मागचा
संवृत
अर्धविवृत
विवृत

व्यंजने

स्फोटक अर्धस्फोटक अनुनासिक पार्श्र्विक घर्षक अर्धस्वर
ओष्ठ्य प, ब
दंतौष्ठ्य फ, व
दंत्य भ, ध
दंतमूलीय ट, ड स, झ
अनुदंतमूलीय
तालव्य दंतमूलीय च, ज श, झ
तालव्य
मृदुतालव्य क, ग
कंठ्य

एकत्र दिलेल्या दोन व्यंजनांतले पहिले अघोष व दुसरे सघोष आहे. उरलेली सर्व सघोष आहेत. स्वर ऱ्हस्व किंवा दीर्घ असू शकतो आणि काही स्वरांच्या बाबतीत हे ऱ्हस्वदीर्घत्व अर्थनिर्णायक आहे, म्हणजे ऱ्हस्वाऐवजी दीर्घ किंवा दीर्घाऐवजी र्‍हस्व वापरल्याने अर्थात फरक पडतो : sick (सिक) आजारी– seek (सीक) शोधणे, pull (पुल) ओढणे – pool (पूल) डबके इ.  यांशिवाय बहुतेक शब्दांत कोणत्यातरी एका स्वरावर एक परंपरागत आघात असतो. कित्येकदा ध्वनिसमुच्चय तोच राहून आघाताचे स्थान बदलल्याने अर्थात फरक पडतो : increase वाढ in’crease वाढवणे, insult अपमान, in’sult अपमान करणे.

व्यंजनांपैकी अघोष स्फोटक हे काही परिस्थितीत अंशतः महाप्राणयुक्त असतात : cat (खॅट) मांजर, pig (फिग) डुक्कर, इत्यादी.

इंग्‍लंडमध्ये ख्रिस्ती धर्माच्या आगमनापूर्वी रूनिक लिपीचा वापर होत असे पण लॅटिन ही ख्रिस्ती धर्माची भाषा असल्यामुळे आणि तिचा प्रभाव धार्मिक वर्चस्वाच्या काळात विशेष असल्यामुळे तिचे दृश्य वाहन जी रोमन लिपी ती इंग्‍लिश भाषिकांनी स्वीकारली.

रूपविचार : इंडो-यूरोपियनसारख्या विकारसंपन्न भाषेतून परिवर्तित होत आलेली इंग्‍लिश भाषा रूपप्रक्रियेच्या बाबतीत जवळजवळ विकारशून्य बनलेली आहे. वाक्यातील शब्दांचे कार्य त्यामुळे त्यांच्या रूपावरून निश्चित होऊ शकत नाही आणि परिणामी शब्दांच्या क्रमाला महत्त्व प्राप्त झाले आहे.

रूपवर्गात नामे, सर्वनामे, विशेषणे, क्रियापदे, क्रियाविशेषणे, संबंधशब्द, उभयान्वयी अव्यये व उद्‌गारवाचके यांचा समावेश होतो. यांशिवाय शब्दांआधी त्यांना लागून येणारी उपपदे व शब्दांमागून त्यांना लागणारी अनुपदे आणि दोन किंवा अधिक शब्द एकत्र येऊन बनणारे समास हेही फार महत्त्वाचे आहेत.

वरील शब्दांपैकी पहिल्या पाच वर्गांतील शब्द काही प्रमाणात विकारक्षम आहेत. बाकीचे मात्र पूर्ण विकाररहित आहेत.

नामे : प्राचीन इंग्‍लिश भाषेत नामाला विभक्तिविकार होत असे आणि हा विकार नामाच्या लिंगावर अवलंबून असे. अर्वाचीन इंग्‍लिशमध्ये लिंगभेद नाही आणि विभक्तिप्रत्ययही नष्ट झालेले आहेत. सर्वनामांत मात्र लिंगभेद आहे आणि ज्यावेळी ते नामाबद्दल वापरण्यात येते त्यावेळी तदनुसार वर्गीकरण नामात गृहीत धरावे लागते. पण हे वर्गीकरण तर्कसिद्ध आहे, परंपरानिष्ठ नाही. म्हणजे पुरुषवाचक व कित्येकदा काही नरवाचक नामे पुल्लिंगी, स्त्रीवाचक व कित्येकदा काही मादीवाचक नामे स्त्रीलिंगी आणि उरलेली सर्व नामे नपुंसकलिंगी आहेत. याला क्वचित काही अपवाद आहेत परंतु हे अपवाद बरेचसे साहित्यिक भाषेत व काही मात्र बोलींत आढळणारे आहेत.

इंग्रजीत नामाचे अनेकवचन विकारयुक्त असते आणि हा विकार मुख्यतः दोन प्रकारचा आहे : एक प्रत्यय घेणारा व दुसरा स्वरविकाराने होणारा.

बहुतांश नामांचे अनेकवचन s (उच्चारात स्, झ्, किंवा इझ्) हा प्रत्यय लागून होते : cats (कॅट्स्), dogs (डॉग्झ्), judges (जजिझ्). मात्र काही ठिकाणी तो अगदी वेगळा आहे : child – children, ox – oxen. तसेच काही ठिकाणी तो शून्य आहे : sheep मेंढा, मेंढे fish मासा, मासे. तसेच स्वरविकारामुळे आलेले अनेकवचन हे मूळ भाषेतील एक प्रक्रिया टिकविल्यामुळे आलेले आहे : man – men, foot – feet.

नामाला आणखी एक विकार होतो तो स्वामित्वदर्शक प्रत्यायाचा. या ठिकाणीही नामांना एकवचनात व अनेकवचनात s असाच प्रत्यय लागतो : cat – cat’s, king – king’s. मात्र ज्या ठिकाणी अनेकवचन s हा प्रत्यय लागून झालेले असते तिथे हा प्रत्यय लागू शकत नाही : king’s – kings’. प्राचीन इंग्‍लिशमध्ये एकवचनी नामाला es हा स्वामित्वदर्शक प्रत्यय विशेष प्रमाणात लागत असे. पुढे त्यातील e चा लोप झाला आणि तो दर्शविण्यासाठी( ‘ ) हे संक्षेपदर्शक चिन्ह वापरण्यात येऊ लागले.

सर्वनामे : सर्वनामांत विकारक्षमता बरीच शिल्लक राहिली आहे. पुरुषवाचक सर्वनामांची अनेकवचनाची रूपे स्वतंत्र आहेत. फक्त द्वितीय पुरुषात अनेकवचनानेच आता एकवचनाची जागा घेतलेली असल्यामुळे तेवढाच काय तो अपवाद आहे. त्याचप्रमाणे द्वितीय पुरुष सोडून इतरांची कर्तृवाचक व कर्मवाचक रूपे भिन्न आहेत. उदा.,

एकवचन

अनेकवचन

कर्तृवाचक

कर्मवाचक

कर्तृवाचक

कर्मवाचक

I

मी

me

we

us

you

तू

you

you

you

he

तो

him

they

them

she

ती

her

they

them

it

ते

it

they

them

या सर्वनामांची स्वतंत्र स्वामित्वदर्शक रूपेही आहेत : I – my, mine you – your, yours he – his she – her it (नामाप्रमाणे) its we – our, ours you – your, yours they – their, theirs.

दर्शक सर्वनामे : this ‘हा, ही, हे’ these’ हे, ह्या, ही’ that ‘तो, ते, ती’ those ‘ते, त्या, ती’. कर्मवाचक व स्वामित्वदर्शक स्वतंत्र रूपे नाहीत. प्रश्नवाचक सर्वनामे : who ‘कोण’ – whom (कर्म) whose (स्वामित्व) which ‘कोणता’ what ‘काय, कोणता’ इत्यादी. यांतील whom हे कर्मवाचक रूप नष्ट होण्याच्या मार्गावर आहे.

विशेषणे : विशेषणांना नामांशी संबंध दाखविण्याच्या दृष्टीने कोणताही विकार होत नाही पण तुलनात्मक व श्रेष्ठत्वदर्शक रूपांत काही विशेषणांना अनुक्रमे er व est हे प्रत्यय लागतात, तर काही-विशेषतः अनेकावयवी-विशेषणांपूर्वी more व most ही विश्लेषणात्मक रूपे येतात. काही विशेषणांत मात्र परंपरागत रूपे आढळतात : more – most, -less – least.


क्रियाविशेषणे : प्राचीन इंग्‍लिशमध्ये विशेषणाला e प्रत्यय लागून क्रियाविशेषण बनत असे. अशा प्रकारची काही रूपे अंत्य e चा लोप होऊन अजूनही वापरण्यात येतात : hard, fast, long. दुसरे एक क्रियाविशेषण विशेषणाला ly हा प्रत्यय लागून बनते : glad – gladly, happy – happily. पहिल्या प्रकारच्या क्रियाविशेषणांची तरतम रूपे विशेषणांप्रमाणेच er व est हे प्रत्यय लागून होतात, तर दुसर्‍या प्रकारात विश्लेषणात्मक more व most ही रूपे पूर्वी येतात : more willingly – most willingly.

क्रियापदे : भूतकाळ बनविण्याच्या प्रक्रियेनुसार इंग्‍लिश क्रियापदांचे दोन महत्त्वाचे गट पडतात. पहिल्या गटातील धातूंचा भूतकाळ त्यांच्यातील स्वरांना विकार होऊन बनतो : drive – drove, bind – bound, तर दुसर्‍या गटात तो मूळ धातूला (e) d किंवा t प्रत्यय लावून होतो : play – played, love – loved. प्रारंभापासून मुळातच क्रियावाचक असलेली क्रियापदे पहिल्या गटातील असून दुय्यम प्रकारे क्रियावाचक बनलेली किंवा परभाषेतून आयात केलेली क्रियापदे दुसर्‍या गटात येतात. मुळात स्पष्ट असणारा भेद कित्येकदा ध्वनिपरिवर्तनाच्या परिणामामुळे किंवा बहुसंख्य व नियमित रूपांचे अनुकरण करण्याच्या माणसाच्या स्वाभाविक प्रवृत्तीमुळे अस्पष्ट झालेला आहे. उदा., buy – bought यांच्यातला फरक सकृद्दर्शनी स्वरविकार होणार्‍या क्रियापदासारखा वाटतो. पण त्यांचे पुनर्घटित रूप bugyan – buhta हे पाहिल्यावर हा गैरसमज दूर होतो. अर्वाचीन इंग्‍लिशचे वर्णन करताना अशा प्रकारचे वर्गीकरण टाळणेच इष्ट ठरते.

वर्तमानकाळी तृतीयपुरुषी एकवचनी क्रियापदाला s हा प्रत्यय लागतो. इतर रूपे पूर्ण विकाररहित असतात. मात्र आता वापरातून गेलेल्या thou या द्वितीयपुरुषी एकवचनी सर्वनामाच्या क्रियापदाला est हा प्रत्यय लागते असे. भूतकाळातही सर्वपुरुषी व सर्ववचनी एकच रूप वापरण्यात येते. स्वरविकाराव्यतिरिक्त ed किंवा t हे प्रत्यय धातूला लागतात.

वर्तमान व भूत हे शुद्ध काळ आहेत. इतर काळ मिश्र असून ते सहायक क्रियापदांच्या मदतीने बनतात. भविष्यकाळ (shall, will), अतिभूतकाळ (have) व अपूर्णकाळ (be) यांची रूपे भूतकाळवाचक धातुसाधिताबरोबर व ing प्रत्ययान्त क्रियार्थवाचकाबरोबर वापरून कालसिद्धी होते. या शिवाय do – did (नकारार्थी व प्रश्नार्थी रचनेत), may – might, would, should, must यांसारखी सहायक रूपे वापरून अनेक छटा व्यक्त करता येतात.

क्रियापदांच्या बाबतीत वरील कारणांनी इंग्‍लिश भाषा अर्थसमृद्ध आहे, त्याचप्रमाणे मूळ रूपातच नामांचा क्रियावाचक प्रयोग करण्याची शक्यता असल्यामुळे ती अतिशय क्रियासमृद्धही आहे : matter, man, hand, floor, telephone, water इ. असंख्य नामे क्रियापदांसारखी वापरता येतात, हे या भाषेच्या अभिव्यक्तीच्या संपन्नतेचे द्योतक आहे आणि हे सर्व मूळ क्रियापदाच्या केवळ चार रूपांच्या आधारे होते. ती रूपे म्हणजे मूळ रूप (play, go इ.), भूतकालवाचक रूप (played, went), भूतकाळवाचक धातुसाधित (played, gone)व क्रियार्थवाचक रूप (playing, going) ही होत.

संबंधशब्द : मराठीत शब्दयोगी अव्ययाने जे कार्य होते ते इंग्‍लिशमध्ये संबंधशब्दाने साध्य होते. मात्र हा संबंधशब्द नामापूर्वी येतो. मूळ भाषेतील नामविकार ध्वनिपरिवर्तनाने क्षीण झाला हे तर खरेच, पण शिवाय केवळ मूठभर विभक्तिप्रत्ययांनी एखाद्या नामाचे वाक्यातील इतर शब्दांशी असलेले विविध प्रकारचे संबंध व्यक्त होणे अशक्य होते. त्यामुळेच विभक्तिप्रत्ययाव्यतिरिक्त आणखी अनेक शब्द वापरणे अपरिहार्य झाले. कालांतराने विभक्तिप्रत्यय पूर्णपणे नष्ट होताच या नव्या प्रकारचे संबंधदर्शक शब्द त्यांच्या जागी आले.

अशा प्रकारचे संबंधशब्द व त्यांच्याशी निगडित एक किंवा अनेक शब्द मिळून एक अर्थपूर्ण व निश्चित कार्यदर्शक वाक्यांश तयार होतो. या वाक्यांशाचे कार्य एखाद्या विकारयुक्त नामाप्रमाणे असते. on the hill, on top of the hill हे अशा प्रकारचे स्वायत्त वाक्यांश आहेत आणि त्यामुळे त्यांना वाक्यरचनेत थोडे स्वातंत्र्य आहे.

उपसर्ग व अनुसर्ग : कोणतीही भाषा तिच्या मूळ शब्दसंग्रहावर निभवू शकत नाही. नव्या कल्पना व्यक्त करण्यासाठी नवे शब्द बनविणे हे प्रगतिशील समाजाला अपरिहार्य असते. भाषेतील जुन्या रूपांची नवी मांडणी करूनही हे करता येते. अशा प्रकारे निर्माण केलेला शब्द परिचित व अर्थग्राह्य वाटतो. अशा प्रकारे बनलेले असंख्य शब्द इंग्‍लिश भाषेत आहेत.

उपपदे व अनुपदे जोडून बनविलेले असे दोन प्रकारचे शब्द या भाषेत आहेत. त्यातील mis- व un- उपपदे फार महत्त्वाची आहेत (misuse, misbehave, unpopular, undo, unearth). यांशिवाय co-, ex-, extra-, dis- इ. अनेक उपपदे आहेत. काही संबंधशब्द दुसर्‍या शब्दांशी एकरूप होऊनही नवे शब्द बनलेले आहेत (overthrow, underestimate, withstand) आणि त्यांनी अर्थाच्या विविध छटा व्यक्त केल्या आहेत.

अशाच प्रकारे शब्दानंतर जोडून येणाऱ्या अनुपदांनीही नव्या शब्दांना जन्म देऊन इंग्‍लिशचे शब्दभांडार समृद्ध केले आहे. धातूला कर्तृवाचक नाम बनविणारे -er हे अनुपद (doer, player, singer) कित्येकदा नामालाही लागते (hatter, Londoner). धातूला -ing हे अनुपद लागून क्रियावाचक नाम बनते (doing, smoking). विशेषणाला –ness लागून नाम बनते (kindness, fairness) व -en हे लागून क्रियापद बनते (harden, soften) इत्यादी. यांशिवाय -ish, -dom, -ship, -less, -ful, -y, -ed इ. अनेक अनुपदे दाखवून देता येतील.

अगदी नव्यानेच अशा प्रकारचे अनुपद एखाद्या शब्दाला जोडून आपल्याला हवी असलेली छटा व्यक्त करायला इंग्‍लिश लेखक किंवा बोलणारा माणूस मागेपुढे पहात नाही. हे गमतीने केले जाते, गमतीने स्वीकारले जाते आणि अशा नव्या शब्दाची उपयुक्तता प्रत्ययाला आली तर तो रूढही होतो. इंग्‍लिश भाषेच्या प्रयोगस्वातंत्र्याच्या प्रवृत्तीमुळे या भाषेत नव्यानव्या शब्दांची भर एकसारखी पडत आहे. परिचित भाषिक घटकांचा उपयोग करून हे होत असल्यामुळे भाषेला लाभलेले हे अर्थनावीन्य खटकत नाही.

सामासिक शब्द : इंग्‍लिशचे आणखी एक वैशिष्ट्य सामासिक शब्द हे आहे. हे समास अनेक प्रकारे बनलेले असू शकतात : नाम + नाम, नाम + क्रियापद, क्रियापद + नाम, विशेषण + नाम इत्यादी. दोन नामांच्या समासात पहिले नाम पुष्कळदा विशेषणात्मक असते : bookstall, horseback. क्रियापदाला नाम जोडून होणारा शब्दही बहुधा नामच असते : kill-joy, pick-pocket.सामासिक शब्दांचे कार्य केवळ संक्षेप साधण्याचे नसून अर्थच्छटा अधिक परिणामकारक करण्याचेही असते. लेखनात कित्येकदा असे शब्द एकत्र (headmaster, mankind), तर कित्येकदा जोडरेषा वापरून (word-order, man-made)येतात. मात्र कित्येकदा असे शब्द शेजारीशेजारी ठेवले जातात (gold coin, iron curtain). कित्येकदा एखादा सबंध वाक्यांशही अर्थानुसार समासाचे एक पद म्हणून वापरला जातो. (man in the street attitude, middle of the road government). अशा प्रकारे समास बनविण्यासाठी कोणतीही गुंतागुंतीची प्रक्रिया नसल्यामुळे अभिव्यक्तीच्या गरजेनुसार ते बनविणे सहज शक्य होते.

वाक्यरचना : वाक्यरचनेची महत्त्वाची अंगे कर्ता, क्रियापद, कर्म ही आहेत. इंग्‍लिशमध्ये सामान्यतः कर्ता + क्रियापद + कर्म असा क्रम आहे : The water saw its lord. विशेषणे किंवा विशेषणात्मक वाक्यांश संबंधित नामाच्या मागे किंवा पुढे येतात : a long rope, a rope long enough to tie an elephant. पण वाक्यरचनेबाबत कोणत्याही भाषेबद्दल सर्वसाधारण प्रकारचीच विधाने करणे शक्य आहे, हे लक्षात ठेवले पाहिजे. इंग्‍लिश शब्दक्रमाबद्दल बोलताना ऑटो येस्पर्सन यांनी पुढील अर्थाची विधाने केली आहेत : इंग्‍लिश भाषेचे व्यावहारिक व कणखर स्वरूप तिच्या शब्दक्रमातही प्रतिबिंबित झालेले आहे. लॅटिनप्रमाणे इंग्‍लिशमध्ये शब्द लपंडाव खेळत नाहीत, किंवा जर्मनप्रमाणे तर्कदृष्ट्या, एकमेकांजवळ हवे असायला पाहिजेत, असे शब्द वक्त्याच्या लहरीनुसार किंवा पुष्कळदा व्याकरणाच्या एखाद्या कडक नियमानुसार एकमेकांपासून दूर फेकले जात नाहीत. इंग्‍लिशमध्ये सहायक क्रियापद मुख्य क्रियापदापासून दूर जात नाही आणि नकारदर्शक शब्द त्याने नकारार्थक केलेल्या शब्दाच्या, सामान्यतः (सहायक) क्रियापदाच्या, अगदी शेजारी असतो. विशेषण जवळजवळ नेहमी नामापूर्वी येते. याला एकमेव असा खरोखर महत्त्वाचा अपवाद म्हणजे संबंधी उपवाक्याचे कार्य करणारा नामामागून येणारा विशेषणात्मक शब्दसमूह : a man every way prosperous and talented = सर्व दृष्टींनी भरभराट होणारा व बुद्धिमान माणूस. हाच नियमितपणा अर्वाचीन इंग्‍लिशच्या शब्दक्रमात इतरही सर्व बाबतींत आढळतो. क्रमनिष्ठा व सुसंगती ही इंग्‍लिश भाषेच्या अर्वाचीन रूपाची निदर्शक आहेत.


कोणतीही भाषा पूर्णपणे तर्कनिष्ठ व नियमित नसते हे खरे असले, तरी हे गुण ज्या प्रमाणात इंग्‍लिशमध्ये सापडतात, त्या प्रमाणात ते चिनी भाषा सोडल्यास इतर कोणत्याही भाषेत सापडणे कठीण. पण हा तर्क नेहमीच व्याकरणनिष्ठ नसतो. जरूर पडेल तेव्हा तो व्यवहारनिष्ठही बनतो. family हा शब्द बहुतेक भाषांत एकवचनी आहे पण इंग्‍लिशमध्ये अर्थानुरोधाने तो एकवचनात किंवा अनेकवचनात वापरता येतो. अशा वेळी त्याच्याशी संबंधित असलेले क्रियापद किंवा सर्वनाम अर्थानुरूप असते. यामुळे ही भाषा फ्रेंचप्रमाणे टणक न राहता लवचिक बनलेली आहे.

शब्दसंग्रह : व्यक्तिस्वातंत्र्याबद्दल ब्रिटिश समाजात असलेली जागरूकता इंग्‍लिशच्या शब्दभांडारातही दिसून येते. अभिव्यक्तीसाठी किंवा अर्थवाहित्वासाठी व्यक्तीने केलेली निर्मिती किंवा उसनवारी यावर या समाजाने कधीही निर्बंध घातला नाही. अर्थवैभवाचा हा मार्ग सदैव उघडा राहिल्याने त्याचे शब्दभांडार समृद्ध बनले.

मूळ जर्मानिक संग्रहात बाहेरून आलेल्या शब्दांची आज इतकी भर पडलेली आहे, की उसनवारीने घेतलेल्या शब्दांपेक्षा इंग्‍लिशमधील मूळ शब्दांची यादी देणेच कितीतरी सोपे आहे.

राजकीय, धार्मिक, सांस्कृतिक इ. अनेक कारणांनी ही उसनवारी चालू होती. अशा प्रकारे आयात केलेल्या शब्दांत बराच मोठा वाटा स्कँडिनेव्हियन, लॅटिन, ग्रीक, फ्रेंच त्याचप्रमाणे डच, इटालियन, स्पॅनिश व जर्मन यांचा आहे. यांशिवाय ब्रिटिश साम्राज्य व वसाहती ज्या ज्या ठिकाणी पसरल्या त्या त्या ठिकाणचे शब्दही आवश्यकतेच्या प्रमाणात घेतले गेले. यामुळेच हे शब्दभांडार विपुल व विविधतापूर्ण बनले आहे.

अमेरिकन व भारतीय इंग्‍लिश : बाह्य जगात पसरलेल्या इंग्‍लिशने वेगवेगळी रूपे धारण केली. प्रमाण इंग्‍लिश भाषिकाला थोड्याफार प्रयत्‍नानंतर बर्‍याच प्रमाणात ती समजू शकतात.

इंग्‍लिश भाषिकांचा सर्वांत मोठा गट अमेरिकेत आहे. तीनशे वर्षांपूर्वी तेथे स्थायिक झालेल्या लोकांच्या वंशजांची भाषा आता काही प्रमाणात बदलली आहे आणि यात अस्वाभाविक असे काहीच नाही. उच्चारदृष्ट्या पाहिल्यास व्यंजने तीच आहेत. स्वरही जवळजवळ तेच आहेत. पण त्यांचा वापर मात्र अगदी इंग्रजीप्रमाणेच होतो असे नाही. उदा., इंग्‍लिशमध्ये ‘हॉट’ असा उच्चारला जाणारा शब्द अमेरिकनमध्ये ‘हाट्’ असा आहे.

शब्दांच्या दृष्टीने पाहिल्यास आज इंग्‍लिशमधून नष्ट झालेले काही शब्द अमेरिकनने टिकवून धरले आहेत. इंग्‍लिशमध्ये get चे भूतकाळवाचक धातुसाधित रूप आता got होते अमेरिकनमध्ये ते gotten असेच राहिले आहे. याशिवाय इंग्‍लिश autumn, aim at, tap = अमेरिकन fall, aim to, faucet असे शब्द व वाक्प्रचार अनेक आहेत. यांशिवाय बाह्यतः सारखे दिसणारे पण भिन्न अर्थ व्यक्त करणारे शब्दही पुष्कळ आहेत.

भारतीयांनी इंग्‍लिश ही एक अतिरिक्त भाषा म्हणून आत्मसात केली. पुस्तक डोळ्यांसमोर ठेवून शिकलेली ही भाषा उच्चारदृष्ट्या तर फारच विकृत झाली आणि तीही भारताच्या वेगवेगळ्या प्रदेशांत वेगवेगळ्या दिशांनी कारण त्या त्या प्रादेशिक भाषेची वैशिष्ट्ये तिच्यात मिसळली गेली. मराठी भाषेत z (rise), z (measure), f (fig), th (this, thin) इ. घर्षक नसल्यामुळे तिने स्वतःचे तसे वाटणारे झ, फ, ध, थ असे ध्वनी त्या जागी घुसडले. एखाद्या विधानाला पुष्टिकारक उत्तर मिळावे म्हणून करण्यात येणारा प्रश्न मूळ विधानाच्या रचनेवर अवलंबून असतो : he is clever, isn’t he? you have read this book, haven’t you? मराठी भाषिक व बहुसंख्य भारतीय लोक अशा ठिकाणी isn’t it असा प्रयोग सर्रास करतात. इतके असूनही भारतीय इंग्‍लिश ही बर्‍याच अंशी देशातल्या भिन्नभाषिक विद्वानांना व कार्यकर्त्यांना एकत्र आणण्यात यशस्वी ठरली.

कोणत्याही भाषेचे भवितव्य सांगणे फार कठीण आहे. पण आज तरी जागतिक विनिमयाचे साधन म्हणून इंग्‍लिशचे स्थान अनन्यसाधारण आहे.

संदर्भ : 1. Jones, Daniel, An Outline of English Phonetics, Cambridge, 1962.

2. Meillet, Antoine Cohen, Marcel, Les Langues du Monde, Paris. 1954.

3. Wrenn, C. L. The English Language, London, 1963.

कालेलकर, ना. गो.