मार्क ट्‌वेन

मार्क ट्‌वेन : (३० नोव्हेंबर १८३५–२१ एप्रिल १९१०). विख्यात अमेरिकन विनोदकार आणि वास्तववादी कादंबरीकार. खरे नाव सॅम्युअल लँगहॉर्न क्लेमन्स. जन्म अमेरिकेच्या माँटॅना राज्यातील फ्लॉरिडा ह्या गावी. मिसिसिपी नदीवरील खलाशी, पाण्याची खोली दर्शविण्यासाठी जी हाक देतात, तिच्यावरून ‘मार्क ट्‌वेन’हे आपले टोपण नाव त्याने घेतले होते. त्याचे वडील जॉन मार्शल क्लेमन्स हे नशीब काढण्यासाठी हॅनिबल, मिसूरी येथे आले. तेथे मिसिसिपी नदीच्या पश्चिम किनाऱ्यावर, मार्क ट्‌वेनचे बालपण गेले. त्याच्या वयाच्या बाराव्या वर्षी, तो पितृहीन झाल्यानंतर मुद्रक, पत्रकार, बोटीवरील खलाशी असे अनेक उद्योग त्याने केले. ‘द सेलिब्रेटेड जंपिंग फ्रॉग’(१८६७) ह्या विनोदा लेखामुळे तो प्रकाशात आलां त्यानंतर द ॲड्‌व्हेंचर्स ऑफ टॉम सॉयर (१८७६) आणि द ॲड्‌व्हेंचर्स ऑफ हकलबरी फिन (१८८४) ह्या त्याच्या दोन कादंबऱ्याही गाजल्या. टॉम सॉयर हा एक कल्पक आणि खोडकर मुलगा .त्याची साहसे हा ह्या कादंबरीचा विषय. हकलबरी फिन (टॉम सॉयरचा जिवलग मित्र) ही… टॉम सॉयर ह्या कादंबरीतील एक महत्त्वाची व्यक्तिरेखा. तोच… हकलबरी फीन ह्या कादंबरीचा नायक होय. ह्या दोन्ही कादंबऱ्यांत मिसिसिपीच्या तीरावरील वातावरणाचे वास्तववादी चित्रण आणि मार्मिक विनोद आढळतो. गंगाधर गाडगीळ ह्यांनी… टॉम सॉयर ह्या कादंबरीचे मराठी रूपांतर धाडसी चंदू (१९५१) ह्या नावाने केले आहे.

मार्क ट्‌वेनच्या अन्य कादंबऱ्यांत द प्रिन्स अँड द पॉपर (१८८२), अ कनेक्टिकट यांकी इन प्रिन्स आर्थर्स कोर्ट (१८८९) ह्यांचा समावेश होतो. त्यांत इंग्रज समाजातील विषमतेवर उपरोधप्रचुर टीका त्याने केली आहे. लाइफ ऑन द मिसिसिपी (१८८३) ह्या आत्मचरित्रात्मक पुस्तकात त्याने मिसिसिपीच्या सान्निध्यातील आपल्या किशोरजीवनाचे चित्र रेखाटले आहे. त्याने विनोदप्रचुर प्रवासवर्णनेही लिहिली. द इनोसंट्‍स ॲब्रॉड (१८६९), रफिंग इट (१८७२), अ ट्रँप ॲब्रॉड (१८८०) आणि फॉलोइंग द इक्‍वेटर (१८९७) ही त्याची प्रवासवर्णनात्मक पुस्तके. द इनोसंट्‌स ॲब्रॉड मध्ये त्याने यूरोपच्या आणि पवित्र भूमीच्या (होली लँड) आपल्या दौऱ्याबद्दल लिहिले आहे. रफिंग इटमध्ये व्हर्जिनिया सिटी, सॅन फ्रॅन्सिस्को, सँडविच आयलंड्‌स आदी स्थळांना दिलेल्या भेटीसंबंधी लेखन केले आहे. १८७८ मध्ये त्याने केलेल्या यूरोप दौऱ्याचा वृत्तांत अ ट्रँप ॲब्रॉडमध्ये आहे, तर फॉलोइंग द इक्‍वेटरमध्ये ऑस्ट्रेलेशियातील त्याचे अनुभव त्याने वर्णिले आहेत. ह्याच पुस्तकात त्याने आपल्या भारतभेटीसंबंधीही लिहिले आहे. भारतातील प्रचंड लोकसंख्या, अंधश्रद्धा, दुष्काळ, प्लेगसारखे रोग ह्यांनी तो व्यथित झालेला दिसतो.

द ट्रॅजिडी ऑफ पडन्‌हेड पिल्सन (कादंबरी–१८९४), पर्सनल रिकलेक्‌शन्स ऑफ जोन ऑफ आर्क (कल्पनामिश्रित चरित्र–१८९६), टॉम सॉयर ॲब्रॉड (कादंबरी –१८९४) ह्यांसारखी पुस्तकेही त्याने लिहिली. सी. डी. वॉर्नरबरोबर द गिल्डेड एज (१८७३) ही कादंबरीही त्याने लिहिली. यादवी युद्धानंतरच्या काळातील अमेरिकन जीवनाचे चित्रण ह्या कादंबरीत आहे. भल्याबुऱ्याची पर्वा न करणारा व्यक्तिवाद आणि अस्थिर जीवनमूल्ये ह्यांचा प्रत्यय तीतून येतो. ह्या कादंबरीत वर्णिलेल्या ऐतिहासिक कालखंडाला, ह्या कादंबरीच्या नावावरूनच ‘गिल्डेड एज’ हे नाव प्रचलित झाले आहे.

आपली पत्‍नी व आपल्या दोन मुली ह्यांच्या मृत्यूमुळे तसेच कर्जबाजारीपणामुळे मार्क ट्‌वेनचे उत्तरायुष्य दुःखात गेले. ह्या श्रेष्ठ विनोदकाराला नैराश्याने घेरले. द मॅन दॅट फरप्टेड हॅड्‌लीबर्ग (१९००), व्हॉट इज मॅन ? (१९०६) आणि द मिस्टिरिअस स्ट्रेंजर (१९१६) ह्या त्याच्या पुस्तकांतून ह्याचा प्रत्यय येतो. असे असले, तरी एक थोर विनोदकार हीच मार्क ट्‌वेनची प्रतिमा लक्षात राहते. समाजातील अनिष्ट प्रवृत्तींचा तीव्र उपहास त्याने विनोदाच्या आधारे केला. अतिशयोक्ती, वक्रोक्ती, सूचकता, व्यंजना ह्यांचा कौशल्यपूर्ण वापर हे त्याच्या विनोदाचे लक्षणीय वैशिष्ट्य, अमेरिकन साहित्याला वास्तववादाचे वळण देण्यात त्याचा वाटा मोठा आहे. आपल्या जिवंत लेखनशैलीने अमेरिकन गद्यालाही त्याने नवे स्वरूप प्राप्त करून दिले.

रेडिंग (कनेक्टिकट) येथे तो निधन पावला.

संदर्भ : 1. Bellamy, Gladys Carmen, Mark Twain as a Literary Artist, Norman Okla, 1950.

           2. Brooks, Van Wyck, The Ordeal of Mark Twain New York, 1920 rev. 1933.

           3. Budd, L. J. Critical Essays on Mark Twain (1867-1910), Boston, 1982.

           4. Cox, J. M. Mark Twain : The Fate of Humour, Princeton. 1966.

           5. De voto, Bernard, Mark Twain’s America, Boston, 1932.

           6. Ferguson, Delancey, Mark Twain : Man And Legend, Indianapolis, 1943.

           7. Inge, Thomas, Huckfinn Among The Critics, 1984.

          8. Johnson, Merle, A Bibliography of the Works of Mark Twain, New York, 1935.

          9. Kaplan, Justin, Mr. Clemens and Mark Twain, New York, 1966.

         10. Paine, A. B. Mark Twain : A Biography, 3 Vols., New York, 1912.

         11. Smith, Henry Nash, Mark Twain: The Development of Writer, Cambridge, Mass. 1962.

नाईक, म. कृ.