मेकॉले, टॉमस बॅबिंग्टन : (२५ ऑक्टोबर १८००–२८ डिसेंबर १८५९). इंग्रज इतिहासकार आणि निबंधकार. लायसे स्टशरमधील रॉथ्‌ली टेंपल येथे जन्मला. १८१८ मध्ये केंब्रिजच्या ट्रिनिटी कॉलेजमध्ये त्याने प्रवेश घेतला एक बुद्धिमान विद्यार्थी म्हणून तेथे तो चमकला. त्याने कायद्याची पदवी मिळविली होती परंतु वकिलीचा व्यवसाय केला नाही. १८२३ पासून क्वार्टर्ली रिव्ह्यू, एडिंबरो रिव्ह्यू ह्यांसारख्या नियतकालिकांतून तो निबंधलेखन करू लागला. हे निंबध खूप लोकप्रिय झाले. थोर आंग्ल महाकवी मिल्टन ह्याच्यावरील निबंधाने एडिंबरो रिव्ह्यूमधील आपल्या लेखनास मेकॉलेने आरंभ केला होता. नागरी आणि बौद्धिक स्वातंत्र्याचा खंदा पुरस्कर्ता आणि जुलूमशाहीचा कट्टर विरोधक ही मिल्टनची प्रतिमा मेकॉलेने ह्या निबंधात परिणामकारकपणे उभी केली होती. ह्या निबंधाची खूप प्रंशसा झाली आणि मेकॉले ह्या नियतकालिकाचा एक प्रमुख लेखक बनला. एडिंबरो रिव्ह्यूचा संपादक फ्रान्सिस जेफ्री हा निवृत्त झाल्यानंतर त्याचे पद स्वीकारण्याची विनंती मेकॉलेला करण्यात आली होती पण मेकॉलेने ती मान्य केली नाही. चांगल्या निबंधकाराला आवश्यक, असे अनेक गुण मेकॉलेमध्ये होते. स्वतःच्या मतांवर आणि दृष्टिकोणावर त्याचा ठाम विश्वास होता विविध विषयांची माहिती त्याला होती तसेच त्याच्यापाशी तरतरीत, जोमदार अशी शैलीही होती. तो उत्तम संभाषकही होता. त्याच्या ह्या गुणांमुळे त्याला राजकीय क्षेत्राचे दरवाजेही खुले झाले. १८३० मध्ये त्याचा इंग्लंडच्या पार्लमेंटमध्ये प्रवेश झाला. तेथे त्याने केलेली भाषणे संस्मरणीय ठरली. १८३२ मध्ये ‘सेक्रेटरी ऑफ द बोर्ड ऑफ कंट्रोल (ऑफ इंडिया)’ ह्या पदावर त्याची नेमणूक झाली. भारताबद्दलच्या विविध बाबींचा त्याने चांगला अभ्यास केला. पुढे भारताच्या ‘सुप्रिम काउन्सिल’ चा सदस्य म्हणून १८३४ ते १८३८ पर्यंत त्याचे भारतात वास्तव्य होते. येथे असताना, भारतीयांच्या शिक्षणासाठी एक शैक्षणिक व्यवस्था निर्माण करणे आणि भारतासाठी फौजदारी कायद्याची एक संहिता तयार करणे अशा दोन जबाबदाऱ्या त्याने पार पाडल्या.

मेकॉलेने भारतीयांच्या शिक्षणासाठी इंग्रजी माध्यमाचा पुरस्कार  केला.  तो  भारतात  आला  तेव्हा  इंग्रजी  राजवट येथे स्थिरावली होती. भारतासारख्या बहुभाषिक देशातील कारभारात एकसूत्रीकरण आणायचा, तर इंग्रजी भाषाच सोयीची, असे इंग्रज राज्यकर्त्यांना वाटू लागले होते. इंग्रजी भाषा अन्य काही कारणांनीही त्यांना सोयीस्कर वाटत होती. ह्या देशातील जनता आणि तिच्यावर राज्य करणारे आपण ह्यांच्यातील दुभाषांचा एक वर्ग इंग्रजी शिक्षणातून तयार होईल हे लोक रक्ताने आणि वर्णाने भारतीय असले, तरी त्यांची अभिरूची, त्यांची मते आणि त्यांची विचारपद्धती इंग्रजी असेल, अशी अपेक्षा मेकॉलेची होती. नव्या, उच्च शिक्षणाचे माध्यम म्हणून देशी भाषा मुळीच उपयुक्त नाहीत, असे त्याचे मत होते. प्राचीन भारतीय वाङ्‌मयही त्याला टाकाऊ वाटत होते. ७ मार्च १८३५ रोजी गव्हर्नर जनरल विल्यम बेंटिक ह्याने  इंग्रजी  शिक्षणाचा  पुरस्कार करण्यासाठी काढलेले फर्मान म्हणजे मेकॉलेच्या विचारसरणीचा विजय होय. ह्या धोरणामुळे देशी भाषांची गळचेपी झाली.

भारतातील फौजदारी कायद्याच्या संहितेचा मेकॉले हा प्रमुख शिल्पकार मानला जातो.

इंग्लंडला परतल्यानंतर एडिंबरोचा प्रतिनिधी सदस्य म्हणून पार्लमेंटवर त्याची निवड झाली. १८३९ ते १८४१ ह्या काळात युद्धसचिव म्हणून त्याचा अंतर्भाव कॅबिनेटमध्ये करण्यात आला होता. पेमास्टर जनरल ह्या पदावरही त्याने काम केले (१८४६–४७). परंतु हळूहळू राजकारणापेक्षा लेखनात तो अधिक रमू लागला. वॉरन हेस्टिंग्ज, रॉबर्ट क्लाइव्ह, ॲडिसन, थोरला विल्यम पिट ह्यांच्यावर त्याने निबंध लिहिले. तथापि त्याने लिहिलेला इंग्लंडचा इतिहास हिस्टरी ऑफ इंग्लंड (६ खंड १८४९–१८६१) हे त्याच्या आयुष्याच्या उत्तरार्धात त्याने केलेले प्रमुख वाङ्‌मयीन कार्य होय. दुसऱ्या जेम्सच्या राज्यारोहणापासून तिसऱ्या विल्यमच्या मृत्यूपर्यंतचा इतिहास मेकॉलेने ह्या बृहद्‌ग्रंथात व्हिग दृष्टिकोणातून सांगितला आहे. स्वतःच्या मतांविषयीची आग्रही वृत्ती येथेही प्रत्ययास येते. त्याच्या विशिष्ट वक्तृत्वपूर्ण शैलीचे आवाहन आधुनिक वाचकांपर्यंत पोचले नाही, तरी मेकॉलेच्या ह्या इतिहासाला फार मोठी लोकप्रियता प्राप्त झाली होती.

त्याने केलेल्या काही कविता ‘लेज ऑफ एन्शंट रोम’ (१८४२) ह्या नावाने पुस्तकरूप झाल्या. मेकॉलेच्या या कवितासंग्रहातील कविता रोम देशाच्या लोककाव्यावर आधारित आहेत. रोमचे लोककाव्य इंग्रजीत आणण्याचा मेकॉलेचा हा चांगला प्रयत्न आहे. १८४३ मध्ये त्याचे निबंध संकलित करण्यात आले.

१८५७ मध्ये त्याला उमराव (पीअर) करण्यात आले.

लंडन येथे तो निधन पावला. वेस्टमिन्स्टर ॲबेमध्ये त्याचे दफन करण्यात आले.

संदर्भ : 1. Beatty, C. Lord Macaulay, Victorian Liberal, 1938.

             2. Bryant, Arthur, Macaulay, London, 1933.

             3. Trevelyan, Sir 2. George Otto, The Life and Letters of Lord Maculay, 2 Vols., 1876, repr. 1932.

कुलकर्णी, अ. र.  

Close Menu
Skip to content