बायरन, जॉर्ज गॉर्डन, लॉर्ड  : (२२ जानेवारी १७८८-१९ एप्रिल १८२४). श्रेष्ठ इंग्रज कवी. लॉर्ड बायरन ह्या नावाने विशेष प्रसिद्ध. जन्म लंडनमध्ये ऱ्हासाला लागलेल्या एका उमराव कुटुंबात. बायरनचे वडील वृत्तीने लफंगे होते. आपल्या पत्नीची बरीचशी संपत्ती त्यांनी उधळून टाकली होती. १७९१ मध्ये ते फ्रान्समध्ये निधन पावले. बायरनची आई संतापी आणि लहरी स्वभावाची होती. बायरन हा अत्यंत देखणा असला, तरी तो जन्मतः लंगडा होता आणि ह्या व्यंगाची त्याला तीव्र जाणीव होती. त्यामुळे बायरनच्या बालपणीची काही वर्षे दुःखातच गेली. १७९८ मध्ये त्याचे चुलत आजोबा वारल्यानंतर त्यांची संपत्ती, तसेच उमराव घराण्याचा किताब बायरनला त्यांचा वारस म्हणून प्राप्त झाला.

 बायरन, जाँर्ज गॉर्डन , लाँर्ड

बायरनच्या शिक्षणाचीही सुरुवातीस काहीशी आबाळच झाली.आरंभीचे काही शिक्षण त्याने ॲबर्‌‌डीन, नॉटिंगॅम आणि डलिज येथे घेतले १८०१ ते १८०५ ह्या कालखंडात तो हॅरो येथे शिकत होता. १८०५ मध्ये केंब्रिजच्या ट्रिनिटी कॉलेजात त्याने प्रवेश घेतला आणि १८०८ मध्ये तो एम्. ए. झाला. ट्रिनिटी कॉलेजात शिकत असतानाच फ्यूजिटिव्ह पीसिस हा आपला कवितासंग्रह त्याने खाजगी रीत्या प्रसिद्ध केला होता (१८०६). त्यानंतर प्रसिद्ध झालेल्या चाइल्ड हॅरल्ट्स पिलग्रिमेज (४ खंड, १८१२-१८), द गिओर (१८१३), ‘द कॉर्सेर’ (१८१४), लारा (१८१४), द सीज ऑफ कॉरिंथ (१८१६), डॉन वॉन (१६ सर्ग, १८१९-२४) आदी काव्यकृतींनी श्रेष्ठ कवी म्हणून त्याची प्रतिमा प्रस्थापित झाली.तो१८०९ मध्ये इंग्लड पार्लमेंटमधील हाउस ऑफ लॉर्ड्‌‌सचा सदस्य झाला. २ जानेवारी १८१५ रोजी ॲन इझाबेला मिलबँक ह्या तरुणीशी त्याचा विवाह झाला. १० डिसेंबर १८१५ रोजी ह्या दांपत्याला एक मुलगी झाली आणि १५ जानेवारी १८१६ ह्या दिवशी बायरनची पत्नी ह्या मुलीला घेऊन आपल्या माहेरी निघून गेली. ती पुन्हा परत आली नाही. ऑगस्टा ली नावाच्या एका स्त्रीबरोबर बायरनचे संबंध होते आणि तेच त्याचा संसार उद्ध्वस्त होण्यास कारणीभूत झाले, असे म्हटले जाते. ही स्त्री बायरनची-दूरची का होईना-बहीण लागत होती. बायरनचे अनेक स्त्रीयांशी संबंध आलेले होते आणि त्याच्या चारित्र्यावर समाजात टीका होत होती. त्यातच हा प्रकार घडला. बायरनने आपल्या पत्नीला कायदेशीर फारकत दिली आणि आपला देश सोडला (२५ एप्रिल १८१६). इंग्लंडला तो पुन्हा केव्हाही परतला नाही. वॉटर्लू ह्या ऐतिहासिक रणभूमीला भेट दिल्यानंतर तो काही काळ स्वित्झर्लंडमध्ये राहिला आणि नंतर इटलीत. स्वित्झर्लंडमधील वास्तव्यात शेली ह्या श्रेष्ठ इंग्रज कवीशी त्याची मैत्री झाली. क्लेअर क्लेअरमाँट ह्या शेलीच्या नात्यातील एका स्त्रीबरोबर त्याचे संबंध होते आणि ह्या संबंधातून एक मुलगी जन्मास आली तिचे नाव ॲलेग्रा. १८१९ मध्ये काउंटेस तेरेसा गुइच्चीओली ह्या स्त्रीशी त्याचे प्रेमसंबंध निर्माण झाले आणि ते अखेरपर्यंत टिकले. १८२१ पासून ग्रीकांनी तुर्कांविरुद्ध चालविलेल्या स्वातंत्र्यलढ्यात सहभागी होण्याची संधी बायरनला १८२३ मध्ये मिळाली. आपला प्रतिनिधी म्हणून ग्रीक स्वातंत्र्यसैनिकांना मदत करण्याची विनंती ‘लंडन ग्रीक कमिटी’ ह्या संघटनेतर्फे त्याला करण्यात आली. ती आनंदाने स्वीकारुन बायरन ह्या लढ्यात सर्वशक्तिनिशी उतरला. ग्रीसमधील मिसोलाँघी ह्या गावी अल्प आजारानंतर त्याचे निधन झाले. निधनानंतर त्याचा पार्थिव देह इंग्लंडमध्ये आणण्यात आला. वेस्टमिन्स्टर ॲबीत दफन होण्याचा मान त्याला देण्यात आला नाही तथापि १९६९ मध्ये वेस्टमिन्स्टर ॲबीत त्याचे एक स्मारक मात्र करण्यात आले आहे.

खाजगी रीत्या प्रकाशित झालेला उपर्युक्त, फ्यूजिटिव्ह पीसिस हा काव्यसंग्रह सोडला, तर आवर्स ऑफ आयडलनेस (१८०७) हा बायरनचा पहिला काव्यग्रंथ होय. एडिंबरो रिव्ह्यूमधून त्यावर परखड टीका झाली. तिला उत्तर म्हणून बायरनने इंग्लिश बार्ड्‌स ‌ ॲन्ड स्कॉच रिव्ह्यूअर्स (१८०९) हे विडंबनकाव्य लिहिले. चाइल्ड हॅरल्ड्स पिलथ्रिमेज ह्या खंडकाव्यात खिन्न, स्वाभिमानी, एकाकी, सामाजिक व्यवहाराबद्दल अंतर्यामी कटुता असलेला त्याचा  प्रातिनिधित नायक प्रथम साकार झाला. अनेक यूरोपीय देशांतून भटकणारा एक यात्रिक रंगवून बायरनने यूरोपातील संघर्षाचे जिवंत चित्र उभे केले आहे. तसेच सामाजिक अन्यायालाही वाचा फोडली आहे.


बायरनच्या समकालीनांना हे काव्य चटकदार वृत्तांताप्रमाणे आकर्षक वाटले. यूरोपच्या अंतःकरणाच्या तारा  ह्या काव्यातील सुरांशी तंतोतंत जुळल्या. डॉन वॉन हे बायरनचे आणखी एक विशेष उल्लेखनीय काव्य. डॉन वॉननामक नायकाच्या अनेक साहसांची पद्यबद्ध कादंबरी, असे ह्या काव्याचे स्वरुप आहे. डॉन वॉनची अनेक प्रेमप्रकरणे ह्या काव्यात बायरनने वर्णिली आहेत. सुलतान, चाचे, लावण्यसंपन्न स्त्रिया, रशियन सम्राज्ञी कॅथिरन आदी अनेक व्यक्तिरेखांची मालिका ह्या काव्यात आलेली आहे. बायरनच्या वाङ्‌मयीन शत्रूंवरही त्याने ह्या काव्यातून हल्ले केलेले आहेत. चाइल्ड हॅरल्ड्समधील खिन्नता त्याच्या ह्या काव्यात आढळून येत नाही उलट एक प्रकारच्या टवटवीतपणाचा आणि उत्साहाचा प्रत्यय येतो. बायरनच्या व्यक्तीत्त्वाचे काही वेगळे पैलू-उदा., त्याची विनोदबुद्धी आणि त्याच्यातील प्रभावी उपरोधक येथे आपणास पाहावयास मिळतात. वीरविडंबनात्मक (मॉक-हिरॉइक) शैलीत लिहिलेल्या बेप्पो (१८१८) ह्या त्याच्या काव्यकृतीतही हे पैलू प्रत्ययास येतात. बायरनचा एक वाङ्‌मयीन शत्रू रॉबर्ट सदी ह्याने ‘व्हिजन ऑफ जजमेंट’ (१८२१) नावाचे एक काव्य लिहिले होते. त्याचे जीवघेणे विडंबन बायरनने त्याच शीर्षकाचे काव्य लिहून केले (१८२२). उपरोधप्रचुरता ही अठराव्या शतकातील ऑगस्टन इंग्रजी कवितेची एक लक्षणीय प्रवृत्ती. बायरन हा स्वच्छंदतावादी कवी असला, तरी त्याच्या कवितेचे एक नाते ह्या ऑगस्टन कवितेशी होतेच. द गिओर, द कॉसेंर, लारा आणि ब्राइट ऑफ ॲबिडॉस (१८१३) ही त्याची कथाकाव्ये ‘ओरिएंटल टेल्स’ ह्या नावाने ओळखली जातात. पौर्वात्य रीतिरिवाजांचे व वातावरणाचे बायरनचे ज्ञान त्यांतून दिसून येते.

 बायरन हा इंग्रजी स्वच्छंदतावाद्यांच्या दुसऱ्या पिढीतील कवी. तथापि स्वचंछंदतावाद त्याने सांकेतिकपणे पुढे चालविला नाही. तो भूतकाळात रमणारा नव्हता. वर्तमानाचे त्याचे भान प्रखर होते. कल्पनेची स्वैरता व बुद्धीचा नेमकेपणा ह्यांचा मिलाप त्याच्या ठायी झालेला होता. यूरोप खंडाचे वास्तव त्याने स्वीकारले होते. निराशेचा तीव्र, तिखट आविष्कार व स्वातंत्र्याचा अविरत, प्रामाणिक व्यास ही त्याच्या स्वच्छंदतावादाची प्रधान वैशिष्ट्ये होती. ‘उदास यात्रिका’ ची प्रतिमा त्याने चाइल्ड हॅरल्डच्या रुपाने काव्यात प्रस्थापित केलेली असली, तरी त्याला कृतिशील माणसांचेच कौतुक होते आणि त्याचे स्वतःचे जीवनही कृतिशील होते म्हणूनच ग्रीसच्या मुक्तिसंग्रामात त्याने मनःपूर्वक भाग घेतला अन्यायाविरूद्ध त्याचे मन बंड करून उठले. बायरनपाशी चिंतनात्मकता मात्र कमी होती वासनेच्या शुद्ध सामर्थ्याचीच पूजा त्याला करावयाची होती.

 बायरनने काही नाटकेही लिहिली आहेत. दंतकथेच्या नायकाने हेवा करावा, अशी लोकप्रियता बायरनला त्याच्या हयातीतच लाभली. सर्व यूरोपखंड त्याच्या संमोहनाने भारून गेले. जर्मन महाकवी गटे ह्याला बायरन हा एकोणिसाव्या शतकातला अत्यंत प्रतिभावान पुरुष वाटत असे.

बायरनचे वस्तुनिष्ठ वाङ्‌मयीन मूल्यमापन सोपे नाही. त्याच्या काव्यप्रतिभेतले दोष स्पष्ट आहेत. त्यांची शैली बंदिस्त नाही. सवंग, सैल वक्तृत्वाचे दोष तिच्यात आहेत. त्याची अभिरुची समान नाही, अनेक ठिकाणी तिच्यात दिखाऊ नाट्य आहे, त्याच्या काव्यातला छंद चढा आहे पण या दोषांवर मात करणारे गुणही त्याच्या काव्यात आहेत. त्यात जोम व ओज आहे. त्याचे निसर्गप्रेम अन्य स्वच्छंदतावादाची कवींपेक्षा कमी नाही. त्याची वर्णने वेगवान,प्रभावी आहेत. त्याच्या नाट्ययुक्त पवित्र्यातही प्रामाणिकपणाचा झोत आहे. त्याच्याइतका जगाचा प्रत्यक्ष अनुभव समकालीन कवींना नव्हता. नैसर्गिक आनंदाचे खळाळते झरे त्याच्या काव्यात ठायीठायी आहेत. ओज आणि भरडपणा यांचे मिश्रण त्याच्या काव्यात आहे. त्याच्या हातून प्रमाद घडले पण तो दुरात्मा नव्हता. मानवी जीवनाचे त्याने केलेले चित्रण सम्यक आणि संयत नसेल पण प्रसंगी ते अत्यंत भेदक झाले आहे.

संदर्भ :

1.Borst, W. A. Lord Byron’s First Pilgrimage, New Haven, 1948. 

2. Lovell, E.J. Jr. Byron: The Record of a Quest, Austin, Texas, 1949. 

3. Marchand, L. A. Byron: A Biography. 3 Vols., New York, 1957. 

4. Marchand, L. A. Byron’s Poetry: A Critical Introduction, Boston, 1965. 

5. More, Paul Elmer, Ed. The Complete Poetical Works of Lord Byron, Boston, 1905 

6. Quennell, Peter, Ed, Byron: A Self-Portrait, Letters and Diaries, 1798 to 1824, 2. Vols., London, 1950. 

7. Rutherford, Andrew, Byron: A Critical Study, Palo Alto, Calif, 1961.

8. West,Paul, Ed,Byron : A Collection of Critical Essays, Englewood Cliffs, N. J.1963.

 हातकणंगलेकर, म. द.