कॉनरॅड, जोसेफ : (३ डिसेंबर १८५७ – ३ ऑगस्ट १९२४). इंग्रजीत लेखन करणारा पोलिश कथा-कादंबरीकार. मूळ नाव टीऑडॉर यूझेफ कॉनराट कॉर्झेन्यॉव्हस्की. जन्म पोलंडमधील बरडीचेव्ह शहरी. रशियन सत्तेला विरोध केल्यामुळे त्याच्या आई-वडिलांस हद्दपार करण्यात आले. हद्दपार असतानाच कॉनरॅडचे आईवडिल निवर्तले व त्याच्या काकाने त्याचा प्रतिपाळ केला. क्रेको येथे त्याने शालेय शिक्षण घेतले व त्यानंतर क्रेको विद्यापीठातील एका प्राध्यापकाकडे तो खाजगी रीत्या शिकला. ह्याच प्राध्यापकाबरोबर जर्मनी, स्वित्झर्लंड, इटली ह्या देशांचा प्रवास करीत असताना त्याला समुद्राविषयी उत्कट प्रेम निर्माण झाले. परिणामतः १८७४ पासून त्याने दर्यावर्दी जीवनाचा स्वीकार केला. फ्रेच व इंग्रजी नौदलांत त्याने वीस वर्षे नोकरी केली. ह्याच काळात त्याने इंग्रजी भाषेचा अभ्यास करून तीवर असामान्य प्रभुत्व संपादन केले. दर्यावर्दी जीवनातून निवृत्त झाल्यानंतर त्याने सर्वस्वी इंग्रजी साहित्यालाच वाहून घेतले आणि श्रेष्ठ इंग्रजी लेखकांत मानाचे स्थान मिळविले. १८८४ मध्ये त्याने इंग्लंडचे नागरिकत्व स्वीकारले. केंट परगण्यातील बिशप्सबर्न येथे तो मरण पावला.

 

त्याच्या कथा-कादंबऱ्यांतील घटना मनुष्यवस्तीपासून अतोनात दूर, निर्जन भूप्रदेशांत किंवा समुद्रसंचार करणाऱ्या गलबतांत घडलेल्या आहेत. समुद्राचे कॉनरॅडइतके वैविध्यपूर्ण व जिवंत चित्रण इंग्रजी कथा-कादंबऱ्यात क्वचितच पहावयास मिळते. अल्मायर्स फॉली (१८९५), ॲन आउटकास्ट ऑफ द आयलंड्स (१८९६), द निगर ऑफ द नार्सिसस (१८९७), लॉर्ड जिम (१९००), द शॅडोलाइन (१९१७), द रेस्क्यू (१९२०)  ह्या कादंबऱ्या ह्या दृष्टीने लक्षणीय आहेत. तथापि ‘समुद्रजीवनाचा भाष्यकार’ एवढ्यापुरतेच कॉनरॅडचे महत्त्व मर्यादित नाही कारण त्या जीवनाच्या आधारे त्याने मानवी मनाचेच खोल कप्पे उलगडून दाखविले आहेत. आपल्या व्यक्तिरेखांभोवती कठोर एकांतवासाची परिस्थिती निर्माण करून तेथे त्यांचा त्यांच्या सदसद्विवेकबुद्धीशी चालणारा झगडा कॉनरॅड परिणामकारकपणे दाखवतो (लॉर्ड जिम ). त्यांच्या मनोविश्लेषणातून कॉनरॅडचे जीवनविषयक सखोल व व्यापक चिंतन प्रत्ययास येते तसेच ते करीत असतानाचे त्याचे कलात्मक ताटस्थ्यही जाणवते. एखाद्या व्यक्तिरेखेवर प्रकाश टाकण्यासाठी तिच्याविषयी फक्त इतर व्यक्तिरेखांचे दृष्टिकोन नमूद करण्याच्या तंत्राचाही त्याने कौशल्याने उपयोग करून घेतलेला आहे. पंचमहाभूतात्मक सृष्टीत स्वभावतःच अशुभ आणि दुःखदायक अशी एक शक्ती वास करीत असून तिचा प्रतिकार करण्यासाठी व्यक्तीने स्वतःशी आणि समाजाशी प्रामाणिक राहिले पाहिजे, असा एक तात्त्विक दृष्टिकोन त्याच्या साहित्यात उमटलेला दिसतो. फ्रेंचांचे रचनाकौशल्य आणि स्लाव्हवंशसुलभ गांभीर्य ह्यांचे एकात्म दर्शन त्याच्या साहित्यकृतींतून घडते.

जोसेफ कॉनरॅड

उपर्युक्त कादंबऱ्यांखेरीज त्याच्या काही उल्लेखनीय कादंबऱ्या अशा : द इन्हेरिटर्स (१९०१, फोर्ड मॅडॉक्स ह्यूफर (फोर्ड) ह्याच्या सहकार्याने), नोस्ट्रोमो (१९०४), द सिक्रेट एजंट (१९०७), अंडर वेस्टर्न आइज (१९११), चान्स (१९१४), व्हिक्टरी  (१९१५). ‘यूथ’ (१९०२), ‘हार्ट ऑफ डार्कनेस’ (१९०२) आणि ‘टायफून’ (१९०३) ह्या त्याच्या सर्वोत्कृष्ट कथा समजल्या जातात.

 

यांशिवाय सम रेमिनिसन्सेस (१९१२, हेच पुढे ए पर्सनल रेकॉर्ड  या नावाने प्रसिद्ध झाले) हे त्याचे आत्मचरित्रही वाचनीय झाले आहे.

संदर्भ : 1.  Bradbrook, M. C. England’s Polish Genius, London, 1941.

2. Gordan, J. D. y3wuoeph Conrad : The Making of a Novelist, New York, 1941.

3. Guerad, A. J. Conrad the Novelist, London, 1959. 

 

बापट, गं. वि.