चॅपमन, जॉर्ज: (१५५९ ? – १२ मे १६३४). इंग्रज कवी, नाटककार  आणि भाषांतरकार. जन्म हार्टफर्डशर येथे. अँथोनी वुड ह्या इंग्रज  इतिहासकाराने आपल्या Athenae Oxonienses ह्या ऑक्सफर्ड विद्यापीठातील लेखक आणि बिशप ह्यांच्या चरित्रकोशात, चॅपमन हा  ऑक्सफर्ड विद्यापीठात शिकत होता परंतु तो पदवीधर मात्र झाला  नाही, असे नमूद केले आहे. नेदरलॅंड्‌सला त्याने भेट दिली असावी. 

द शॅडो ऑफ नाईट (१५९४)ही त्याची प्रकाशित झालेली पहिली  कविता काहीशी दुर्बोध होती. त्यानंतर प्रसिद्ध झालेल्या ऑव्हिड्‌स बॅंक्विट ऑफ सेन्स (१५९५)ह्या कवितेला जोडलेल्या प्रस्तावनेत त्याने  कवितेतील दुर्बोधतेचे समर्थन केले आहे. ⇨ क्रिस्टोफर मार्लोचे  ‘हीरो  अँड लिअँडर’ हे अपूर्ण काव्य चॅपमनने पूर्ण करून प्रसिद्ध केले (१५९८). त्याच्या काव्यातील विचार संकुलता ही ⇨ जॉन डनच्या मेटॅफिजिकल  (मीमांसक) काव्याशी तुलनीय आहे. द ब्लाइंड बेगर ऑफ लेक्झांड्रिया (प्रथम प्रयोग, १५९६)ही यशस्वी सुखात्मिका लिहून  त्याने नाट्यलेखनाच्या क्षेत्रात पदार्पण केले. न ह्यूमरस डेज मर्थ (प्रथम  प्रयोग, १५९७),ऑल फूल्स (प्रथम प्रयोग, १५९९)ह्या त्याच्या  सुखात्मिका रंगभूमीवर काही प्रमाणात यशस्वी झाल्या ईस्टवर्ड हो! (१६०५)ही सुखात्मिका त्याने ⇨ बेन जॉन्सन  व जॉन मार्स्टन ह्या  नाटककारांच्या सहकार्याने लिहिली. स्कॉटिश लोकांसंबंधी केलेल्या  तिच्यातील काही विधानांमुळे ह्या तिघांनाही तुरूंगवास घडला होता.  तथापि ह्या सुखात्मिकेने कलात्मकतेची जी उंची गाठली, ती ह्या  नाटककारांनी स्वतंत्रपणे लिहिलेल्या सुखात्मिकांत फारशी प्रत्ययास  येत नाही. सी द अँबॉय (१६०७), द कॉन्स्पिरसी अँड ट्रॅजिडी ऑफ चार्ल्स ड्यूक ऑफ बायरन (१६०८),द रिव्हेंज ऑफ बसी द अँबॉय (१६१३)ह्यांसारख्या त्याच्या शोकात्मिकांतून पद्याचे माध्यम समर्थपणे  वापरलेले दिसते. त्याच्यावरील स्टोइक तत्त्वज्ञानाचा प्रभावही लक्षणीय आहे. आज चॅपमनी कीर्ती मुख्यत: त्याने केलेल्या होमरकृत  महाकाव्यांच्या भाषांतरांवर अधिष्ठित आहे. स्वत: चॅपमनला ते आपले सर्वश्रेष्ठ वाङ्‌मयीन कार्य वाटत होते. ह्या भाषांतरांनी भारावून जाऊन  कीट्‌सने लिहिलेले ‘ऑनफर्स्ट लूकिंग इंटू चॅपमन्स होमर’ हे सुनीत  विख्यातच आहे. होमरच्या महाकाव्यांचे भाषांतर करताना त्याने त्यात  जे बदल केले, ते त्याचे स्वत:चे वाङ्‌मयीन व्यक्तिमत्त्व समजून  घेण्याच्या दृष्टीने मोलाचे आहेत. होमरच्या महाकाव्यांनी माणसे सद्‌गुणी  बनतात, ह्या श्रद्धेतून ही भाषांतरे झालेली आहेत. त्याच्यावरील  स्टोइकांचा प्रभाव येथेही जाणवतो. शिवाय त्यांतील अलंकृतता, अधूनमधून जाणवणारा सैनिकाचा प्रभाव, परस्परविरोधी कल्पना मांडून  परिणाम साधणे इ. वैशिष्ट्ये खास एलिझाबेदन आहेत. लंडन येथे तो  निधन पावला.

संदर्भ :1. Bartlett, P. B. Ed. The Poems of George Chapman, New York, 1941.

   2. Parrott, T. M. Ed. The Tragedies and Comedies of George Chapman, 2 Vols., London, 1910, 1914.

   3. Rees, E. The Tragedies of George Chapman, Cambridge, 1954.

  4. Wieler, J. W. George Chapman – The Effect of Stoicism upon His Tragedies, New York, 1949.

भागवत, अ. के.