ऑर्वेल, जॉर्ज : (? १९०३–२१ ? जानेवारी १९५०). इंग्रज कादंबरीकार, स‌मीक्षक आणि विचारवंत. खरे नाव एरिक ब्लेअर. जन्म भारतात मोतीहारी (बंगाल) येथे. शिक्षण इंग्लंडमधील ईटन येथे. पोलीस दलात त्याने काही काळ नोकरी केली. त्यानंतर सु. दीड वर्ष त्याने पॅरिसमध्ये भ्रमंती आणि लेखन करण्यात घालविले. इंग्लंडला परतल्यावर ‘जॉर्ज ऑर्वेल’ ह्या टोपणनावाने तो लिहू लागला.

जॉर्ज ऑर्वेल

बर्मिज डेज (१९३४), क्लर्जिमन्स डॉटर (१९३५), कीप द ॲस्पिडिस्ट्रा फ्लाइंग (१९३६), ॲनिमल फार्म (१९४५) व नाइन्टीन एटीफोर (१९४९) या त्याच्या प्रसिद्ध कादंबऱ्याबर्मीज डेजमधून त्याने ब्रिटीश साम्राज्यवादावर हल्ला चढविला, तर क्लर्जिमन्स डॉटर आणि कीप द ॲस्पिडिस्ट्रा फ्लाइंगमधून श्रमिकांच्या जीवनाचे वास्तववादी चित्रण केले. ॲनिमल फार्म आणि नाइन्टीन एटीफोर ह्या त्याच्या कादंबऱ्यांनी खळबळ उडवून दिली. ॲनिमल फार्म हे रशियन राज्यक्रांतीवरील उपरोधप्रचुर रूपक होय. नाइन्टीन एटीफोरमध्ये स‌र्वंकष राजसत्तेवर विदारक टीका केलेली आहे. इन्‌साइड द व्हेल (१९४०), क्रिटिकल एसेज (१९४६) आणि शूटिंग ॲन एलिफंट (१९५०) हे त्याच्या टीकात्मक लेखांचे संग्रह. त्याची स‌मीक्षा काही ठिकाणी पूर्वग्रहदूषित वाटली, तरी मर्मग्राही आणि स्वतंत्र विचारांची निदर्शक आहे.

रोड टू विगन पिअर (१९३७) आणि होमेज टू कॅटलोनिआ (१९३८) या पुस्तकांतील त्याचे लेखन राजकीय स्वरूपाचे आहे. पहिल्यात लँकाशरमघील श्रमिकांचे त्याने यथार्थ वर्णन केले आहे. दुसर्‍यापुस्तकात स्पेनमधील यादवी युध्दासंबंधीचे आपले अनुभव त्याने चित्रित केले आहेत. तसेच दुसऱ्यामहायुध्दाच्या काळात ब्रिटिश ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशन (बी. बी. सी.) वरील कार्यक्रमांचीही महत्त्वपूर्ण जबाबदारी त्याने उचलली होती. लंडन येथे त्याचे निधन झाले.

संदर्भ : Thomas, E. M. Orwell, London, 1968.

हातकणंगलेकर, म. द.