ब्रिजेस, रॉबर्टसीमोर : (२३ ऑक्टोबर १८४४ – २१ एप्रिल १९३०). इंग्रज भावकवी. वॉलमेर येथे जन्मला. शिक्षण ईटन आणि कॉपर्स क्रिस्ती कॉलेज, ऑक्सफर्ड येथे. काही काळ त्याने वैद्यकाचा व्यवसाय केला. तथापि १८८२ मध्ये तो सोडून देऊन ब्रिजेसने स्वतःला सर्वस्वी काव्यलेखनास वाहून घेतले. ब्रिजेसने विपुल काव्यलेखन केले काही पद्यनाटकेही लिहिली. शॉर्टर पोएम्स (खंड १ ते ४, १८९० खंड ५, १८९५), न्यू व्हर्स (१९२५) आणि द टेस्टमेंट ऑफ ब्यूटी (१९२९) हे ब्रिजेसचे उल्लेखनीय काव्यसंग्रह होत. १९१३ मध्ये इंग्लंडचा राजकवी होण्याचा बहुमान त्यास प्राप्त झाला. १९२९ मध्ये ‘ऑर्डर ऑफ मेरिट’ देऊन त्यास सन्मानित करण्यात आले.

चिंतनशीलता, अभिजात अभिरुची संयमित, प्रासादिक अभिव्यक्ती वेचक शब्दकळा ही ब्रिजेसच्या कवितेची काही लक्षणीय वैशिष्ट्ये होत. ब्रिजेस राजकवी झाला, तेव्हाही त्याला फारशी कीर्ती प्राप्त झालेली नव्हती. ती त्याला त्याच्या वयाच्या ८५ व्या वर्षी प्रसिद्ध झालेल्या द टेस्टमेंट ऑफ ब्यूटी ह्या तत्वचिंतनात्मक दीर्घकाव्यामुळे मुख्यतः मिळाली. मन, पदार्थ, कर्तव्य, आनंद, सुख, ईश्वर, कला इत्यादींचे स्वरूप आणि त्यांचे परस्परसंबंध ह्यांबाबत तत्त्ववेत्ते, शास्त्रज्ञ व कलावंत ह्यांचे विचार ह्या काव्याच्या माध्यमातून व्यक्त करून त्यांचा समन्वय साधण्याचा प्रयत्न ब्रिजेसने केला आहे.

छंदःशास्त्र आणि काव्यरचनातंत्र ह्यांत ब्रिजेसला रस होता आणि त्याचे प्रत्यंतर ‘मिल्टन्स प्रॉसडी’ (१८९३) आणि ‘जॉन कीट्स’ (१८९५) ह्या त्याच्या निबंधांतून येते. विख्यात इंग्रज कवी जेरार्ड मॅन्‌ली हॉप्‌किन्झ ह्याच्याशी ब्रिजेसची मैत्री होती. १९१८ मध्ये त्याने हॉप्‌किन्झच्या कवितांचे संपादन केले (द पोएम्स ऑफ जेरार्ड मॅन्‌ली हॉप्‌किन्झ). इंग्रजी भाषेच्या विकासासाठी स्थापन करण्यात आलेल्या ‘सोसायटी फॉर प्यूअर इंग्लिश’ ह्या संघटनेचा ब्रिजेस हा एक क्रियाशील सदस्य होता. चिल्सवेल, ऑक्सफर्डशर येथे त्याचे निधन झाले.

संदर्भ : 1. Gordon, G. S. Robert Bridges, Cambridge, 1932.

            2. Guerard, A. Bridges: A Study of Traditionalism in Poetry. Cambridge, (Mass.), 1942.

            3. Smith, N. C. Notes on the Testament of Beauty, Rev. Ed., Oxford, 1940.

            4. Young, F. E. B. Robert Bridge : A Critical Study, London, 1914.

बापट, गं. वि.