केस्टलर, आर्थर : (५ सप्टेंबर १९०५–     ). हंगेरियन कादंबरीकार व विचारवंत. इंग्रजीतून लेखन. बूडापेस्टमध्ये ज्यू कुटुंबात जन्म. व्हिएन्ना विद्यापीठात शिक्षण. पत्रकार म्हणून लेखनास सुरुवात. प्रथम जर्मनीमध्ये शास्त्रीय स्वरूपाचे लिखाण, पॅलेस्टाइनमध्ये शेती व यूरोपभर प्रवास. १९३२-३३ साली रशियास भेट दुसऱ्या महायुद्धापूर्वी कम्युनिस्ट पक्षात प्रवेश. खडतर मानसिक स्थित्यंतरानंतर पक्षत्याग. १९४१-४२ मध्ये ब्रिटिश सैन्यात प्रवेश. युद्धसमाप्तीनंतर वेल्समध्ये वास्तव्य, प्रवास व लेखन. आधुनिक यूरोपच्या राजकीय जीवनाचा एक श्रेष्ठ भाष्यकार म्हणून मान्यता. कादंबरी, निबंध व शास्त्रीय ग्रंथ या स्वरूपाची साहित्यनिर्मिती.

आर्थर केस्टलर

स्पार्टाकस व गुलामांचे बंड हा ग्लॅडिएटर्स (१९३९) ह्या कादंबरीचा विषय. त्याच्या कादंबरीत आलेल्या प्रमुख विषयाचे, फसलेल्या क्रांतीचे, हे पहिले चित्रण. डार्कनेस ॲट नून (१९४१). ही अत्यंत गाजलेली कादंबरी. मॉस्कोमधील कुप्रसिद्ध राजकीय खटल्यांचे विस्मयकारी दर्शन या कादंबरीत घडते. एक कडवा कम्युनिस्ट व त्या अवस्थेपर्यंत न पोहोचलेला कम्युनिस्ट पक्षाचा दुसरा एक सभासद यांच्यातील वादविवादांचे व मानसिक ताणांचे ह्या कादंबरीतील तर्कशुद्ध चित्रण हे जितके विदारक, तितकेच कलापूर्ण झाले आहे. बुद्धिवाद्यांना वाटणारे साम्यवादाचे आकर्षण व प्रत्यक्ष साम्यवादी राजवटीच्या अनुभवाने त्यांचा होणारा दारुण भ्रमनिरास यांचे प्रभावी चित्रण ह्या कादंबरीत आढळते. त्यानंतरच्या अरायव्हल  अँड डिपार्चर (१९५३), थीव्ह्‍ज इन द नाइट(१९४६) व द एज ऑफ लाँगिग (१९५१) या कादंबऱ्यांतून राजकीय प्रश्नांचे व परिस्थितीचे मर्मग्राही चित्रण आले आहे.

स्पॅनिश टेस्टामेंट (१९३८), स्कम ऑफ द अर्थ (१९४१), द योगी अँड द कमिसार (१९४५) व प्रॉमिस अँड फुलफिलमेंट (१९४९) हे त्यांचे निबंधग्रंथ. द योगी अँड द कमिसार  हा विशेष उल्लेखनीय. अध्यात्मवादी तत्त्वज्ञान आणि हुकूमशाहीचे तत्त्वज्ञान या टोकांच्या प्रवृत्तींचे विचारमंथन या ग्रथांत आहे. द ट्रेल ऑफ द दायनसोर (१९५५) या ग्रंथात केस्टलरने राजकीय जीवनाचा निरोप घेताना मनात आलेले विचार मांडले आहेत. ॲरो इन द ब्लू (१९५२) व द इन्‌व्हिजिबल रायटिंग (१९५४) हे आत्मचरित्राचे दोन खंड.

इन्साइट अँड आउटलुक (१९४९), द स्लीपवॉकर्स (१९५९), द लोटस अँड द रोबॉट (१९६०) व द ॲक्ट ऑफ क्रिएशन  (१९६४) ह्या ग्रंथांत  शास्त्र, कला तत्त्वज्ञान व समाजनीती या विषयांतील मूलतत्त्वांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला आहे. द अँक्ट ऑफ क्रिएशनमध्ये शास्त्रीय संशोधन व कलानिर्मिती यांच्या बुडाशी असणाऱ्या सर्जनशक्तीच्या स्वरूपाची चर्चा केली आहे. त्यांत केस्टलरच्या प्रदीर्घ व्यासंगाचा  व मुक्तसंचारी बुद्धीचा प्रत्यय येतो. केस्टलरने १९६० साली मानसिक शांतीच्या शोधार्थ भारत व जपान या देशांचा प्रवास केला व योगमार्गाच्या व झेन पंथाच्या अनुयायांच्या मुलाखती घेतल्या. त्यानंतर यूरोपचा  आचारविचारच श्रेष्ठ, असा निष्कर्ष त्याने काढला.

हातकणंगलेकर, म. द.