काउली, अब्राहम : ? १६१८–२८ जुलै १६६७). इंग्रज कवी आणि निबंधकार. जन्म लंडन येथे. शिक्षण वेस्टमिन्स्टर व केंब्रिज येथे. इंग्लंडमधील यादवी युद्धात दुसऱ्या चार्ल्स राजाशी एकनिष्ठ राहिल्यामुळे १६४६ ते १६५५ ह्या कालखंडात त्याला फ्रान्समध्ये परागंदा व्हावे लागले. राजाचा हेर म्हणून १६५५ मध्ये इंग्लंडला आल्यावर काही काळ तुरुंगवासही भोगावा लागला. राजाच्या पुनर्स्थापनेनंतर मात्र त्याचे आयुष्य शांततेत गेले. ‘रॉयल सोसायटी’ (१६६२) स्थापन करण्यात त्याचा पुढाकार होता. 

द मिस्ट्रेस (१६४७) आणि मिसेलनीज (१६५६) हे त्याचे मुख्य काव्यग्रंथ. ‘द डेव्हिडायस’ (१६५६) हे महाकाव्य, ‘व्हर्सिस ऑन सेव्हरल ऑकेझन्स’ राजाच्या पुनर्स्थापनेवर आणि क्रॉमवेलविरुद्ध लिहिलेल्या काही उद्देशिका इ. काव्यरचना मिसेलनीज मध्येच अंतर्भूत आहे.

इंग्लंडमधील मीमांसक काव्य (मेटॅफिजिकल पोएट्री) रचणारे कवी आणि नव-अभिजाततावादी कवी ह्यांच्यामधील काउली हा महत्त्वाचा दुवा. द मिस्ट्रेसमध्ये तात्त्विक काव्यशैलीचा प्रत्यय येतो, तर ‘द डेव्हिडायस’ ह्या महाकाव्यामध्ये इंग्रजी साहित्यातील ऑगस्टन कालखंडात (अठराव्या शतकाचा पूर्वार्ध) प्रभावी ठरलेल्या नव-अभिजाततावादी काव्यशैलीची पूर्वचिन्हे दिसून येतात. काउलीच्या काव्यरचनेत सफाई असली, तरी त्याच्या शब्दकळेत फारसे लालित्य आढळून येत नाही. तथापि मोजक्या शब्दात चमकदार रचना करण्याच्या बाबतीत त्याने अठराव्या शतकातील कवींना आदर्श घालून दिला. त्याची मिसेलनीजमध्ये प्रसिद्ध झालेली पिंडॅरिक ओड्‌स आलंकारिक असून ती अनियमित छंदांत रचिलेली आहेत. ड्रायडनसारख्या कवींनी त्यांचे अनुकरण केले. समकालीन कवींत तो श्रेष्ठ म्हणून गणला गेला. तथापि आज त्याचे महत्त्व केवळ ऐतिहासिक ठरले आहे. चर्टसी येथे तो निधन पावला.

भागवत, अ. के.