न्यूमन, जॉन हेन्‍री : (२१ फेब्रुवारी १८०१–११ ऑगस्ट १८९०). ख्यातनाम इंग्रज साहित्यिक आणि एकोणिसाव्या शतकातील एक ख्रिस्ती धर्मनेता. लंडनमध्ये त्याचा जन्म झाला. ईव्हँजेलिक संस्कार झालेल्या न्यूमनचे शिक्षण ऑक्सफर्डच्या ट्रिनिटी कॉलेजात झाले. १८२१ मध्ये तो पदवीधर झाला. १८२२ मध्ये ऑक्सफर्डच्या ‘ओरिअल कॉलेज’चा अधिछात्र (फेलो) म्हणून त्याची नियुक्ती झाली. १८२४ मध्ये अँग्लिकन डीकन म्हणून तो नेमला गेला १८२५ मध्ये तो धर्मगुरू (प्रीस्ट) झाला. १८२४–२६ मध्ये ऑक्सफर्डच्या सेंट क्लेमंट्स चर्चचा तो क्यूरेट होता. १८२८ मध्ये त्याची ऑक्सफर्डच्या सेंट मेरीज विद्यापीठाचा व्हिकार म्हणून नेमणूक झाली. ह्या सुमारास रिचर्ड हरेल फ्रूड, प्यूसी आणि जॉन केबल ह्या अँग्लिकन धर्मगुरूंच्या विचारांचा प्रभाव त्याच्यावर पडला. १८३३ मध्ये ‘ऑक्सफर्ड मूव्हमेंट’ किंवा ‘ट्रॅक्टरिअन मूव्हमेंट’ ह्या नावाने जी एक धर्मविषयक चळवळ इंग्लंडमध्ये सुरू झाली, तिचा प्रणेता जॉन केबल होता. फ्रूड आणि न्यूमन हे ह्या चळवळीचे प्रमुख नेते होते. ही चळवळ ‘चर्च ऑफ इंग्लंड’च्या चौकटीत राहूनच चालविली गेली तथापि इंग्लिश चर्चच्या तत्त्वप्रणालीत व धर्मकृत्यांमध्ये अनुस्यूत असलेल्या ज्या कॅथलिक प्रवृत्ती होत्या त्या योग्य आहेत, हे दाखवून देण्यावर तिचा भर होता. धर्मपीठाचे राजसत्तेहून स्वतंत्र अस्तित्व असले पाहिजे, या उद्दिष्टाने धर्मात प्रखरपणा आणण्याचा व नवचैतन्य ओतण्याचा तिचा प्रयत्न होता. ह्या चळवळीची भूमिका स्पष्ट करून सांगण्यासाठी ‘ट्रॅक्ट्स फॉर द टाइम्स’ ह्या नावाने ज्या पुस्तिता लिहिल्या गेल्या, त्यांचा प्रभाव एवढा होता की, त्या छापून व्हायच्या आत विकल्या जात असत. केबल, प्यूसी, फ्रूड यांच्याबरोबर त्या लिहिण्यात न्यूमन प्रामुख्याने सहभागी होता. ९० लहान पुस्तिकांच्या मालेसाठी त्याने एकूण २९ पुस्तिका लिहिल्या. त्यानेच लिहिलेली त्यातील शेवटची पुस्तिका अत्यंत खळबळजनक ठरून त्या वादामुळे ही मालिका बंद पडली. ‘चर्च ऑफ इंग्लंड’च्या चौकटीतच ही चळवळ चालू असली, तरी हळूहळू न्यूमनच्या विचारांचा कल रोमन कॅथलिक पंथाकडे झुकू लागला होता. मध्यममार्गीयांची भूमिका सांभाळण्याचा तो आटोकाट प्रयत्न करीत होता तथापि ही धडपडही अनेकांना टीकार्ह वाटत होती. ह्या प्रकारामुळे व्यथित होऊन न्यूमन लिट्लमोअर ह्या आपल्या चॅपेलच्या ठिकाणी जाऊन राहिला (१८४२). तेथे अध्ययन-प्रार्थनेत त्याने काही वर्षे घालविली. १८४३ मध्ये सेंट मेरीज विद्यापीठातील आपल्या पदाचे त्याने त्यागपत्र दिले. ‘द पार्टिंग ऑफ फ्रेंड्स’ हे ‘चर्च ऑफ इंग्लंड’चा अनुयायी म्हणून त्याने दिलेले अखेरचे प्रवचनही ह्या वर्षाचेच. पुढे ‘रोमन कॅथलिक चर्च’ वर वेळोवेळी केलेली टीका त्याने पूर्णतः मागे घेतली आणि ९ ऑक्टोबर १८४५ रोजी रोमन कॅथलिक पंथाचा त्याने स्वीकार केला. ‘रोमन कॅथलिक चर्च’ ही प्राचीन अविभक्त चर्चच्या, योग्य दिशेने झालेल्या विकासाचीच एक अवस्था असून प्रॉटेस्टंट हे त्या विकासापासून दूर झालेले आहेत, अशी भूमिका त्याने घेतली. एसे ऑन द डिव्हलपमेंट ऑफ ख्रिश्चन डॉक्ट्रिन (१८४५) हा त्याचा ग्रंथ ह्या संदर्भात उल्लेखनीय आहे. ह्या धर्मांतरामुळे प्रॉटेस्टंटांचा रोष तर त्याने ओढवून घेतलाच तथापि कडव्या रोमन कॅथलिकांची त्याच्याकडे पाहण्याची दृष्टीही काहीशी अविश्वासाची राहिली.

१८४७-४८ मध्ये न्यूमनने बर्मिंगहॅम येथे एक ऑरेटरी स्थापन केली. १८५१ मध्ये डब्लिनमधील संकल्पित कॅथलिक विद्यापीठाचा पहिला रेक्टर होण्याचे त्याने मान्य केले आणि त्या दृष्टीने आदर्श विद्यापीठासंबंधीची आपली कल्पना स्पष्ट करणारी व्याख्याने १८५२ मध्ये दिली. ‘आयडिआ ऑफ अ यूनिव्हर्सिटी’ ह्या नावाने ती प्रसिद्ध आहेत. ह्या व्याख्यानांत व्यक्त केलेले विचार आजच्या उदारमतवादी शिक्षणाचा पायाच आहेत. निर्हेतुक ज्ञानोपासना, कोणत्याही गोष्टीचा सर्वांगीण, पूर्वग्रहरहित विचार करण्याची सवय, सद्‍भावना आणि सहयोगिता ह्यांची जोपासना, परमतसहिष्णुता व व्यक्तिमत्त्वाचा विकास ही न्यूमनच्या मते शिक्षणाची उद्दिष्टे. ही गाठण्यासाठी ईश्वरविद्या व धर्म ह्यांना पारखे होऊन चालणार नाही, अशी त्याची भूमिका होती. ज्ञानाच्या विकासामुळे धर्मश्रद्धा आणि ईश्वराचे सर्वश्रेष्ठत्व यांना धक्का पोहोचू नये, असे त्याचे प्रथमपासूनचे म्हणणे होते.

१८६४ मध्ये चार्ल्स किंग्झली ह्या साहित्यिकाने न्यूमनवर काही टिका केली. तिला उत्तर देण्यासाठी म्हणून न्यूमनने अपोलोजिया प्रोव्हिटा सुआ (१८६४) ही आपली विख्यात कैफियत लिहिली. ही कैफियत म्हणजे न्यूमनच्या धार्मिक परिवर्तनाचा आणि आध्यात्मिक विकासाचा प्रांजळ आलेखच होय. त्याच्या आधारे आपली भूमिका सत्यान्वेषकाचीच असल्याचे त्याने सिद्ध केले. त्याची प्रतिमाही त्यामुळे उजळली. १८७० मध्ये द ग्रामर ऑफ अ सेंट हा ईश्वरविद्याविषयक महत्त्वपूर्ण ग्रंथ त्याने लिहिला. इंग्लंडमधील त्या वेळचा प्रमुख धर्मनेता मॅनिंग याच्या विरोधामुळे न्यूमनला बराच त्रास झाला पण १८७९ मध्ये पोप तेरावा लीओ ह्याने त्याला कार्डिनल केले. कार्डिनल न्यूमन ह्या नावाने तो आजही ओळखला जातो. ॲरिस्टॉटल, डेव्हिड ह्यूम, बिशप जोसेफ बटलर आणि रिचर्ड व्हेट्ली ह्यांच्या विचारांनी त्याच्या मनावर संस्कार केले होते. डौलदार भाषाशैली आणि तर्कशुद्ध प्रतिपादन ही त्याच्या वैचारिक लेखनाची वैशिष्ट्ये. त्याच्या प्रसन्न व्यक्तिमत्त्वाची साक्षही त्याच्या लेखनावरून पटते. बर्मिंगहॅम येथे तो निधन पावला.

संदर्भ : 1. Cameran, J. M. John Henry Newman, London, 1956.

           2. Cronin, J. F. Cardinal Newman: His Theory of Knowledge, Washington, 1935.

           3. Cross, F. L. John Henry Newman, London, 1933.

           4. Culler, A. D. The Imperial Intellect : A Study of Newman’s Educational Ideal, New Haven, 1955.

           5. McGrath, F. Newman’s University : Idea and Reality, London, 1951.

           6. Sarolea, C. Cardinal Newman and His Influence on Religions Life and Thought, Edinburgh, 1908.

देशपांडे, मु. गो.