ऑस्बर्न, जॉन : (१२ डिसेंबर १९२९–  ). दुसऱ्या महायुद्धानंतरच्या काळातील बंडखोर इंग्रज नाटककार. लंडन येथे जन्म. शिक्षण डेव्हन येथे. काही काळ द गॅस वर्ल्ड या पत्राचा तो वार्ताहर होता. ह्या व्यवसायाला कंटाळून ‘रॉयल कोर्ट थिएटर’ मध्ये तो नट बनला व पुढे स्वतःच नाटके लिहू लागला.

लुक बॅक इन अँगर  ह्या त्याच्या पहिल्या नाटकाचा प्रयोग लंडन येथे ८ मे १९५६ रोजी झाला. ह्या नाटकाने प्रचंड खळबळ माजवली. दुसऱ्या महायुद्धानंतरच्या तरुण पिढीचे वैफल्य आणि त्यांचा दांभिक समाजावरचा राग ह्यांचे वास्तववादी दर्शन ऑस्बर्नने घडविले होते. ह्या नाटकातील जिमी पोर्टर ह्या व्यक्तिरेखेद्वारा ऑस्बर्नने प्रस्तापितावर कडाडून हल्ले चढवले आहेत. ब्रिटिश रंगभूमीवर हे नाटक क्रांतीकारक ठरले. त्यानंतर १९६८ पर्यंत ऑस्बर्नने तेरा नाटके लिहिली. द एंटरटेनर (१९५७), ए सब्जेक्ट ऑफ स्कँडल अँड कन्सर्न (१९६१), ल्यूथर (१९६१), ए पॅट्रिअट फॉर मी (१९६५), ए बॉन्ड ऑनर्ड (१९६६), टाइम प्रेझेंट (१९६८) व द होटल इन ॲम्स्टरडॅम (१९६८) ही त्यांपैकी काही प्रमुख नाटके होत. ह्या साऱ्याच नाट्यकृतींतून कोसळणारी समाजमूल्ये, तीच सांभाळू पाहणारा समाज आणि ह्या समाजात एकाकी पडलेले व समाजावर वैतागलेले बंडखोर यांचा संघर्ष आढळतो. नाट्यतंत्राचा सखोल अभ्यास, जबरदस्त भावनावेगाने येणारी धारदार भाषाशैली आणि जे वाटते ते मांडण्याचा निर्भय प्रामाणिकपणा ह्या त्याच्या वैशिष्ट्यांमुळे ही नाटके इंग्लंडच्या रंगभूमीला नवी दिशा दाखविणारी ठरली. ह्याच दिशेने हॅरल्ड पिंटर, आर्नल्ड व्हिस्कर, रॉबर्ट बोल्ट, जॉन आरडेन यांसारख्या नव्या नाटककारांनी प्रवास चालविला आहे. प्रस्थापिताच्या समर्थकांना ऑस्बर्नचा आवेश खोटा वाटला. त्यांनी ऑस्बर्नचा निषेध केला, तर इतरांनी त्याला संतप्त तरुणांचा प्रतिनिधी ठरविले. पण ऑस्बर्नच्या संतप्त वृत्तीत केवळ नकारात्मक निषेध नाही. स्वतःच्या समस्यांचा प्रामाणिक शोध घेणाऱ्या आणि अपरिहार्यपणे सामाजिक स्थितीचे चित्रण करणाऱ्या कलावंताचा स्वाभाविक विकास त्याच्या नाटकांतून दिसून येतो.

ऑस्बर्नच्या नाटकांवर उलटसुलट चर्चा झाली. त्याने नाटकांशिवाय इतर काही लेखनही केले आहे. दे कॉल इट क्रिकेट मध्ये (१९५७) त्याने आपल्या राजकीय मतप्रणालीचा ऊहापोह केला आहे. तो स्वतःला डाव्या विचारसरणीचा समजतो. टॉम जोन्स ह्या गाजलेल्या चित्रपटाची पटकथा त्याने लिहिली. लुक बॅक इन अँगरएंटरटेनर  या त्याच्या नाटकांवर चित्रपट निघाले आहेत. त्यांच्या पटकथाही ऑस्बर्ननेच लिहिल्या आहेत. इंग्लंडच्या रंगभूमीला नवी दिशा दाखवून तिला अद्ययावत स्वरुप देणारा एक नाटककार म्हणून त्याचे स्थान विशेष महत्त्वपूर्ण आहे.

संदर्भ : 1. Banham, M. Osborne, Edinburgh, 1969.

            2. Russel, T. J. Anger and After London, 1962.

जगताप, दिलीप