चेस्टर्टन, गिल्बर्ट कीथ: (२९ मे १८७४–१४ जून १९३६). इंग्रज पत्रकार, साहित्यिक, समीक्षक, विचारवंत आणि वादपटू. जन्म लंडनमध्ये. लंडनच्या ‘स्लेड स्कूल ऑफ फाइन आर्ट’ ह्या विख्यात कलाशिक्षणसंस्थेत चित्रकलेचे विशेष शिक्षण घेऊनही चेस्टर्टनने व्यवसाय केला तो लेखनाचा. तोही मुख्यतः वृत्तपत्रांसाठी पण कोणत्याही पत्राशी बांधून न घेता. पुढे स्वतःचे जी. के. ज वीकली  काढले (१९२५) तेवढा अपवाद. चुरचुरीत, वादपटू लेखनासाठी लवकरच त्याचे नाव झाले त्याचप्रमाणे वादपटू, हजरजबाबी वक्तृत्वासाठीही. उभय क्षेत्रांत जॉर्ज बर्नार्ड शॉसारख्या प्रतिस्पर्ध्याशी त्याने चार हात केले.

गिल्बर्ट कीथ चेस्टर्टनचेस्टर्टनच्या इतर विविध लेखनात ललित निबंध, साहित्यसमीक्षा, कथा व कविता या प्रकारांचा उल्लेख केला पाहिजे. जे लिहिले ते चटकदार उतरले, असे त्याच्या लेखणीचे कसब होते. उपहास, वक्रोक्ती, व्याजोक्ती, विरोधाभास या विनोदाच्या सर्व अंगांवर त्याचे प्रभुत्व होते, विशेषतः विरोधाभासावर पण त्याचाही अतिरेक केल्यामुळे व एकंदरीने मुद्देसूदपणापेक्षा विनोदाच्या कोलांट्या उड्या मारण्यावर तो भर देऊ लागल्यामुळे पुढेपुढे त्याच्या लेखनात काहीसा एकसुरीपणा, म्हणून कंटाळवाणेपणा आला.

त्याच्या कथालेखनापैकी सर्वांत अधिक लोकप्रिय झाले ते फादर ब्राउनच्या गुप्तहेरकथांचे (द इनोसन्स ऑफ फादर ब्राउन, १९११द विझ्डम ऑफ फादर ब्राउन, १९१४ इत्यादी). फादर ब्राउन हा साधा, निरागस पाद्री, तर्काची कसरत न करता केवळ आंतरिक ऊर्मीने, जणू अंतर्ज्ञानाने, गुन्ह्यांची कोडी सोडवतो. चेस्टर्टनने पद्यही पुष्कळ लिहिले. त्यातील काही जुन्या बॅलड (पोवाडा) पद्धतीचे आहे. तो साज त्याने वाकबगारपणे उचलला, विशेषतः त्यातील लय आणि नाद. उरलेल्यापैकी बहुतेक विनोदी ढंगाचे आहे. त्याला कसलाही प्रासंगिक, क्षुल्लक वा चमत्कारिक विषय पुरत असे. विडंबन व उपरोध ही अशा कवितांची खास वैशिष्ट्ये. मात्र अनेकदा या विनोदाआड कसले तरी कडवे मतप्रदर्शनही असे. चेस्टर्टनने दोन नाटकेही लिहिली पण ती अयशस्वी ठरली. 

टीकालेखनात चेस्टर्टनने मोठे यश मिळविले. ते नेहमीच्या साहित्यिक टीकालेखनाहून फार वेगळे आहे. त्याच्या खुसखुशीत शैलीमुळे आणि स्वतंत्र विचारसरणीमुळे सामान्य वाचकही विषयाकडे ओढला जातो. चॉसर, डिकिन्झ, ब्राउनिंग, शॉ वगैरे लेखकांवरील त्याच्या ग्रंथांची चमक अजूनही हरपली नाही. तत्कालीन सामाजिक समस्यांवरील त्याचे लेखन आग्रही, काहीसे चढाईखोर होते आणि ते त्याच्या विशिष्ट शैलीमुळे परिणामकारक ठरले. तेच धार्मिक प्रश्नांवरील लेखनाविषयी. १९२२ मध्ये रोमन कॅथलिक पंथाचा अंगीकार केल्यापासून त्याच्या असल्याच नव्हे, तर सर्व लेखनाला त्या कडव्या निष्ठेचा रंग आला. त्या पंथाचा कैवार घेऊन तो व हिलरी बेलॉक या जोडीने प्रॉटेस्टंट पंथाच्या अभिमान्यांशी शर्थीने झुंज घेतली. या निष्ठेची दोन अंगे म्हणजे : मध्ययुगीन जीवनाची श्रेष्ठता आणि आधुनिक यांत्रिक जीवनाचा हीनपणा यांची सतत तुलना व बुद्धिप्रामाण्याचा धिक्कार. अंतस्फूर्ती, भावना यांचे बळ लाभले तर माणूस सुखी होईल, हे सूत्र चेस्टर्टनच्या सर्व वाङ्‌मयात आढळते कधी स्पष्टपणे, कधी सूचनेने. जे निरर्थक वाटते, ते अनेकदा तथाकथित शहाणपणाहून शहाणे असते, हा त्याचा एक आवडता विचार. चेस्टर्टनचे आत्मचरित्र ऑटोबायग्राफी (१९३६) वाचनीय आहे. त्यात माणूस, लेखक व विचारवंत या त्याच्या तिन्ही अंगांचे प्रतिबिंब आहे. बीकन्झफील्ड येथे तो निवर्तला.

संदर्भ:   1. Belloc, H. The Place of Chesterton in English Letters, London, 1940.

2. Clemens, C. G. K. Chesterton As Seen By His Contemporaries, London, 1939.

3. Hollis, C. G. K. Chesterton, 1950.

4. Kenner, Hugh, Paradox in Chesterton, New York, 1948.

5. Ward, Masie, G. K. Chesterton, New York, 1944.

 

राजाध्यक्ष, मं. वि.