वाइल्ड, ऑस्कर : (१६ ऑक्टोबर १८५४-३० नोव्हेबर १९००). आयरिश विनोदकार, नाटककार, कवी ऑस्कर वाइल्ड आणि ‘कलेकरिता कला’ ह्या वादाचा कट्टर पुरस्कर्ता. लेखन इंग्रजीतून. आयर्लंडमधील डब्‍लिन शहरी त्याचा जन्म झाला. त्याचे वडील सर विल्यम वाइल्ड हे आयर्लंडमधील विख्यात नाक-कानतज्ञ आणि शल्यचिकित्सक होते. तसेच पुरातत्त्वविद्या आणि लोकविद्या हेही त्यांच्या आस्थेचे विषय होते. त्यांवर त्यांनी काही ग्रंथलेखनही केले आहे. आई जेन फ्रान्सेस्का एल्गी ही कडवी आयरिश देशभक्त व आयरिश लोकविद्येची अभ्यासिका होती. इंग्रजांच्या दडपशाहीविरुद्ध तिने जहाल कविता आणि लेख लिहिले होते. आयरिश लोकविद्येवर तिनेही लेखन केले आहे. ऑस्करने एनिस्किलन येथील ‘पोर्तोरा रॉयल स्कूल’मधून आरंभीचे शिक्षण घेतल्यांनतर डब्‍लिनच्या ‘ट्रिनिटी कॉलेजा’त (१८७१–७४) आणि पुढे ऑक्सफर्डच्या मॉड्‍‌लिन कॉलेजात (१८७४–७८) शिकून पदवी घेतली. ग्रीक भाषेवरील प्रभुत्वाबद्दल विद्यार्थीदशेत त्याला पारितोषिके मिळाली होती. मॉड्‌लिन कॉलेजातील चार वर्षांच्या काळात हजरजबाबी विनोदकार आणि कवी म्हणून त्याचा लौकिक झाला. राव्हेना ही कविता लिहून ऑक्सफर्ड विद्यापीठात काव्यलेखनासाठी असलेले न्यूडिगेट पारितोषिक त्याने मिळविले (१८७८). ही पुस्तिका ऑक्सफर्ड विद्यापीठानेच पुस्तकरूपाने प्रसिद्ध केली. हेच ऑस्करचे पहिले प्रकाशित पुस्तक. ह्या विद्यापीठात शिकत असतानाच प्राध्यापक जॉन महॅफी ह्यांच्या सोबत त्याने ग्रीसचा दौरा केला. ग्रीक कला -साहित्य-संस्कृती ह्यांबद्दल ऑस्करला ओढ होतीच. महॅफींच्या सहवासामुळे आणि ग्रीसच्या दौऱ्यामुळे ती अधिक तीव्र झाली. ग्रीक कलेत त्याने सौंदर्याचे आदर्श शोधले.मॉड्‌लिन कॉलेजात असताना ⇨जॉन रस्किन, ⇨जॉन हेन्‍री न्यूमन आणि विशेषतः ⇨ वॉल्टर पेटर ह्यांचा प्रभाव ऑस्करवर पडला. ‘कलेकरिता कला’ ह्या तत्त्वाचे ठाम समर्थन करणारा पेटर हा समीक्षक. मानवी जीवन क्षणभंगुर असल्यामुळे त्यातील प्रत्येक क्षण ‘रत्नसम ज्वाले’गत अखंड तेवत ठेवून संवेदनशीलतेच्या पूर्ण शक्तीने उपभोगला पाहिजे आणि अशा प्रकारे घेतलेला अनुभव कलात्मकच असतो, असे पेटर म्हणत असे. पेटरच्या कलावादी भूमिकेने आणि मानवी जीवन कलात्मकतेने जगण्याच्या त्याच्या संकल्पनेने वाइल्ड भारावून गेला व ‘पिवळे दशक’ म्हणून गाजलेल्या १८९०-१९०० ह्या कालखंडातील सौंदर्यनिष्ठ कलावादाचा अध्वर्यू बनला. उंच, देखण्या वाइल्डने आपल्या चित्रविचित्र रंगांच्या वेषाने आणि वैशिष्ट्यपूर्ण केशभूषेने (लांब वाढविलेले केस तो मानेपर्यंत ठेवी) तसेच मार्मिक कोट्याविनोदांनी सजवलेल्या चतुर संभाषणशैलीने आपल्या भोवती चाहत्यांचा मोठा वर्ग निर्माण केला होता. ‘जे काम परवा करता येईल ते उद्या करू नका’ ‘मोहाखेरीज मी कशाचाही प्रतिकार करू शकतो’ ‘रात्री स्वतःच्या दुर्गुणांची आठवण झाली, की मला तात्काळ झोप लागते’ ‘मित्र हा सुंदर असावा चारित्र्यवान माणसाशी आपण फक्त परिचय करावा आणि शत्रू बुद्धिवान निवडावा’ अशा व ‘जिनिअस इज बॉर्ननॉट मेड’ ह्या म्हणीला थोडी मुरड घालून ‘जिनिअस इज बॉर्न नॉट पेड’ ही त्याने सिद्ध केलेली रचना इ. चतुरोक्तींवरून त्याच्या संभाषणचातुर्याची काहीशी कल्पना येऊ शकते. एकदम प्रसिद्धीच्या झोतात आलेल्या ऑस्करने पंचसारख्या विनोदी साप्ताहिकाचेही लक्ष वेधून घेतले होते त्यातून त्याच्यावर व्यंगचित्रेही येत. ऑस्करने व्हिअरा ऑर द निहिलिस्ट्स हे आपले पहिले नाटक १८८० साली लिहिले. त्यानंतर द डचेस ऑफ पॅड्युआ (१८८३ प्रयोग १८९१) ए फ्‍लॉरेंटाइन ट्रॅजिडी (१९०८ प्रयोग १९०६) सलोमे (१८९३-मुळात फ्रेंचमध्ये लिहिलेले, इं. भा. १८९४) ही तीन नाटके त्याने लिहिली. तथापि ऑस्करच्या प्रतिमेचा अत्यंत प्रभावी आविष्कार घडून आला, तो लेडी विंडरमिअर्स फॅन (१८९३), ए वूमन ऑफ नो इंपॉर्टन्स (१८९४), ॲन आयडिअल हजबं (१८९९) आणि द इंपॉर्टन्स ऑफ बीइंग अर्नेस्ट (१८९९) ह्या नाट्यकृतींतून त्यांनी त्याला कीर्तीच्या शिखरावर नेले. 

लंडनमधील श्रीमंत, रिकामटेकडे सुखासीन लोक त्यांच्या पार्ट्या, व त्यांच्यातील अनेकरंगी स्त्री-पुरुषसंबंध ह्यांचे प्रत्ययकारी चित्रण करणाऱ्या ह्या नाटकांतून वाइल्डच्या स्वतःच्या संभाषणशैलीला साजेशा कोट्या, विनोद, विरोधाभास आणि चतुरोक्ती खच्चून भरलेल्या होत्या. अगदी सहजपणे त्याच्या तोंडून जाणारी वाक्येही अप्रतिम सुभाषिते असत. हीच सहजता आणि मार्मिक विनोदबुद्धी त्याच्या नाटकांतील संवादांत  आढळते. बंदिस्त घडण असलेल्या फ्रेंच सुखात्मिकांच्या संकेतचौकटीत राहूनही वाइल्डने एकोणिसाव्या शतकातील इंग्रजी रंगभूमीला सुखात्मिकेचा एक नवाच प्रकार बहाल केला. हे नवेपण त्याच्या विलक्षण विनोदचातुर्यातून आलेले होते. वाइल्डच्या नाटकांमध्ये द इंपॉर्टन्स ऑफ बीइंग अर्नेस्ट हे सर्वश्रेष्ठ गणले जाते. आभासिकेच्या (फँटसी) ढंगाच्या विशुद्ध प्रहसनाचा अत्यंत नाट्यानुकूल असा आविष्कार ह्या नाटकात वाइल्डने घडविला. ह्या नाटकातील वरवर अगदी सामान्य वाटणाऱ्या पण अर्थगर्भ अशा चतुरोक्तींनी व्हिक्टोरियन समाजातील दांभिकतेवर कठोर हल्ले केले. 

ऑस्करचा पहिला कवितासंग्रह पोएम्स १८८१ मध्ये प्रसिद्ध झाला. स्विन्‌बर्न, डँटी गेब्रिएल रोसेटी, टेनिसन आणि जॉन कीट्स ह्यांचा प्रभाव त्यातील कवितांवर जाणवतो. १८८२ मध्ये व्याख्यानांच्या दौऱ्यासाठी त्याला अमेरिकेतून निमंत्रण आले. तेथे तो वर्षभर होता. न्यूयॉर्क शहरात येताच ‘आय हॅव नथिंग टू डिक्लेअर बट माय  जीनिअस’ (माझ्या प्रतिमेखेरीज माझ्याकडे करपात्र चीज कोणतीच नाही) असे उद्गार त्याने काढले. अमेरिकेतील वृत्तपत्रांचे शत्रुत्व त्याने ओढवून घेतले, तरी एकंदरीने तेथेही तो यशस्वी ठरला. १८८४ साली त्याचा विवाह कॉन्स्टन्स मेरी लॉइड ह्या युवतीशी झाला. १८८८ मध्ये द हॅपी प्रिन्स ॲ अदर टेल्स हा त्याचा परीकथासंग्रह प्रसिद्ध झाला. त्यानंतर तीन वर्षांनी ए हाउस ऑफ पॉमग्रॅनिट्स, लॉर्ड आर्थर सेव्हिल्स क्राइम, इंटेन्शन्स आणि द पिक्चर ऑफ डोरिअन ग्रे ही पुस्तके प्रकाशित झाली.  


ह्यांपैकी इंटेन्शन्स हे पुस्तक वगळता अन्य पुस्तके कथात्मक आहेत. इंटेन्शन्समध्ये त्याचे पूर्वीचे प्रसिद्ध झालेले काही निबंध संगृहीत आहेत. त्यांतून त्याने आपली कलाविषयक भूमिका आग्रहपूर्वक मांडली आहे. हॅपी प्रिन्स…. ह्या लोकप्रिय परीकथासंग्रहातील ‘हॅपी प्रिन्स’ ही कथा विख्यात आहे. त्याची चिंतनशीलता, कल्पनाशक्ती, चित्रमय ‍शैली व प्रसंगी कारुण्याची किनार लाभलेला मार्मिक विनोद ह्यांचा प्रत्यय या कथांतून येतो. त्याच्या अनेक कथांचे शेवटही चमकवून टाकणारे. द पिक्चर ऑफ डोरिअन ग्रे ही त्याची कादंबरी वादग्रस्त ठरली. दुहेरी व्यक्तिमत्व असलेल्या एका व्यसनी माणसाच्या जीवनाची ही कथा. त्याने स्वतःचे एक चित्र काढवून घेतलेले असते. ह्या चित्राची अद्‍भुतता अशी, की त्याच्या वाढत्या वयाचा कोणताही परिणाम त्याच्या स्वतःवर न होता, त्या चित्रावरच होणार असतो. त्याचे स्वतःचे सौंदर्य आणि तारुण्य मात्र कायमच राहणार असते. त्यामुळे तो चैनी आणि स्वैराचारी जीवन जगू लागतो. हळूहळू त्याचे चित्र हिडीस दिसू लागते.संतापून तो त्या चित्रावर कट्यार मारायला जातो पण ती स्वतःच्याच छातीत खुपसली जाऊन तो मरतो पण त्याच्या मृत्यूनंतर त्याचा चिरतरुण चेहरा कुरूप दिसू लागतो आणि ते चित्र मात्र सुंदर, तेजस्वी बनते. सैतानाला स्वतःचा आत्मा देऊन टाकणाऱ्या फाउस्टचा आदिबंध (आर्किटाइप) वाइल्डने ह्या कादंबरीसाठी वापरल्याचे दिसते. ह्या पुस्तकावर टीकेचे काहूर उठले. ‘इंद्रियांच्या समाधानातच आत्म्याचे कल्याण असून मोहाचा प्रतिकार करण्यासाठी मोहाला शरण जावे सदसद्‌विवेकबुद्धी आणि भेकडपणा ह्यांत काहीच फरक नाही’ अशा आशयाचे बंडखोर विचार ह्या कादंबरीत येतात. 

१८९१ साली लॉर्ड ॲल्फ्रेड डग्लस ऊर्फ ‘बोसी’ ह्या कोवळ्या तरुणाशी ऑस्करची ओळख झाली होती. त्या दोघांत मैत्रीचे आणि नंतर समलिंगी संबंधांचे नाते निर्माण झाले. ऑस्कर आणि बोसी ह्यांची दोस्ती पूर्णपणे नापसंत असलेला बोसीचा पिता ‘मार्‌क्‌वीस ऑफ क्वीन्सबरी’ ह्याने संतापाच्या भरात ‘समलिंगी संबंधाची बतावणी करणारा’ असा आरोप ऑस्करवर केला. ऑस्करने त्याच्यावर अब्रूनुकसानीची फिर्याद लावली. तथापि विरुद्ध बाजूने उभे केलेले पुरावे अंगलट येऊ लागल्यामुळे त्याने ती काढून घेतली. त्यानंतर वाइल्डला समलिंगी संबंधांच्या आरोपाखालीच अटक करण्यात आली. दरम्यानच्या काळात फ्रान्सला पळून जाण्याचा त्याच्या मित्रांचा सल्ला त्याने धुडकावला. त्याच्यावर खटला चालून दोन वर्षे सक्तमजुरीची शिक्षा त्याला झाली. त्यातली बरीचशी शिक्षा त्याने रेडिंग येथील तुरुंगात भोगली. तेथील अनुभवांवर आधारित असे ‘द बॅलड ऑफ द रेडिंग जेल’ हे प्रभावी काव्य त्याने रचिले. तुरुंगात कैद्यांना देण्यात येणाऱ्या अमानुष वागणुकीचे प्रत्ययकारी चित्र त्यात उभे केले आहे. तो तुरुंगात असतानाच त्याच्या पत्‍नीने त्याच्यापासून घटस्फोट घेतला. ह्याच तुरुंगातून त्याने बोसीला उद्देशून व De Profundis ह्या नावाने प्रसिद्ध असलेले चिंतनपर त्याने लिहिले. ह्या पत्रात त्याने आपण बोसीच्या नादी लागून आपल्या प्रतिमेचे आणि तारुण्याचे कसे नुकसान करून घेतले, हे स्पष्टपणे लिहिले. हे पत्रही अनेक मार्मिक सुभाषितांनी आणि तात्त्‍विक विचारांनी भरलेले आहे. शिक्षा झाल्यानंतर इंग्रज समाजाने त्याला जवळ जवळ वाळीतच टाकले होते. पॅरिस शहरी त्याचे निधन झाले. प्रख्यात इंग्रज शिल्पकार ⇨ जेकब एप्‍स्टाइन ह्याने त्याच्या थडग्यावर सुंदर शिल्पकृती उभी केली आहे. १६ ऑक्टोबर १९५४ रोजी, त्याच्या जन्मशताब्दीच्या निमित्ताने ‘लंडन काउंटी काउन्सिल’ने लंडनमधील त्याच्या घरावर त्याच्या नावाचा फलक सन्मानपूर्वक लावला.

वाइल्डच्या सनसनाटी जीवनक्रमामुळे त्याच्या वाङ्‍मयाचे रास्त मूल्यमापन करणे कठीण गेलेले आहे. उदा., यूरोपात त्याला साहित्यिक म्हणून फारच झुकते माप दिले गेलेले आहे. तरीही द इंपोर्टन्स ऑफ बीइंग अर्नेस्ट ह्या अभिजात सुखात्मिकेचा कर्ता व एक शैलीदार विनोदकार म्हणून त्याचे सदैव स्मरण राहील. त्याच्या निबंधानांही कलावादाच्या इतिहासात महत्त्वाचे स्थान आहे.

विख्यात मराठी साहित्यिक आचार्य प्र. के. अत्रे वाइल्डच्या साहित्याने अत्यंत प्रभावित झालेले होते. त्यांच्या विनोदावर आणि नाट्यलेखनावरही वाइल्डचा ठसा दिसतो.

वाइल्डच्या दोन नाटकांची मराठी रूपांतरे होऊन ती रंगभूमीवरही आली आहेत. वि. वा. शिरवाडकरकृत दूरचे दिवे (१९४६) हे वाइल्डच्या ॲन आयडियल हजबंड ह्या नाटकाचे रूपांतर आहे. लेडी विंडरमिअर्स फॅन ह्या नाटकाचे शोभेचा पंखा हे रूपांतर वि. ह. कुलकर्णी ह्यांनी केले आहे.

वाइल्डचे समग्र ग्रंथ १९११ साली १४ खंडांत, तर १९३६ साली पॅरिसमध्ये ४ खंडांत प्रसिद्ध करण्यात आले. द वर्क्‌स ऑफ ऑस्कर वाइल्ड ह्या नावाने १९६३ साली त्याचे साहित्य संकलित झाले आहे.

संदर्भ :  1. Agate, J. E. Oscar Wilde and the Theatre, London, 1947.

            2. Beckson, K. Ed. Oscar Wilde : The Critical Heritage, London, 1970.

            3. Elimann, R. Oscar Wilde : A Collection of Critical Essays, New Jersey, 1969.

            4. Gide, A. Oscar Wilde : A Study, Oxford, 1905.

            5. Holland, V. Oscar Wilde : A Pictorial Biography, London, 1960.

            6. Hyde, H. M. Trials of Oscar Wilde, London, 1948.

            7. San Jaun, E. (Jr.) The Art of Oscar Wilde, Princeton (N. J.) 1967.

            8.  Winwar, F. Oscar Wilde and the Yellow Nineties, New York, 1940.

            9.  Woodcock, G. The Paradox of Oscar Wilde, London, 1950. 

            १०. अत्रे, प्र. के. शापित प्रतिभावंत, मुंबई, १९८४. 

कुलकर्णी, अ. र.