बेनेट, आर्नल्ड : (२७ मे १८६८-२७ मार्च १९३१). इंग्रज कादंबरीकार. जन्म स्टॅफर्डशरमधील हॅन्ली येथे. त्याचे वडील सॉलिसिटर होते. न्यूकॅसल-अंडर-लाइम येथील शाळेत शालेय शिक्षण घेतल्यानंतर बेनेट आपल्या वडिलांच्याच कार्यालयात कारकून म्हणून काम करू लागला. १८८९ मध्ये तो लंडनला आला तेथेही एका सॉलिसिटरच्याच कचेरीत कारमुनाची नोकरी त्याला मिळाले. तथापि लवकरच तो वाङ्मयनिर्मितीकडे वळला. १९०२ ते १९१० पर्यंत बेनेट पॅरिसमध्ये राहत होता. आपल्या वाङ्मयीन कारकीर्दीचा आरंभ त्याने कादंबरीलेखनाने केला. ए मॅन फ्रॉम द नॉर्थ (१८९८) ही पहिली कादंबरी प्रसिद्ध झाल्यानंतर तो व्यावसायिक लेखक बनला. पंचविसांहून अधिक कादंबऱ्या त्याने लिहिल्या आहेत. त्यांपैकी द ओल्ड वाइव्ह्ज टेल (१९०८) क्लेहँगर (१९१०), हिल्डा लेसथेज (१९११), दीज ट्वेन (१९१६ – हीच कादंबरीत्रयी पुढे क्लेहँगर फॅमिली ह्या नावाने पुनर्मुद्रित झाली – १९२५) ह्या चार कादंबऱ्यांवर बेनेटची कीर्ती मुख्यतः अधिष्ठित आहे. बेनेटची जन्मभूमी हॅन्ली आणि तिच्या आसपासच्या टनस्टॉल, बर्झ्लम, स्टोक-ऑन-ट्रेंट व लाँगट्न अशा पाच गावांत ह्या कादंबऱ्यातील घटना घडलेल्या दिसतात. ह्या गावांची नावे कादंबऱ्यात आणताना बेनेटने त्यांत थोडासा बदल केलेला आहे. मातकाम, चिनी मातीची भांडी ह्यासाठी प्रसिद्ध असलेल्या व इंग्रजीत पुष्कळदा ‘पॉटरी डिस्ट्रिक्ट’ म्हणून निर्दिष्ट होणाऱ्या ह्या पाच गावांतील चिमुकले पण वैविध्यपूर्ण जग त्याने आपल्या कादंबऱ्यांतून साकारले. कादंबरीलेखनात विख्यात फ्रेंच साहित्यिक ग्यूस्ताव्ह फ्लोबेअर आणि ऑनोरे द बाल्झॅकच्या वास्तववादी कादंबऱ्यांचा प्रभाव बेनेटवर आरंभी होता तसेच ‘‘मनुष्य हा भोवतालच्या सामाजिक परिस्थितीचा केवळ गुलाम आहे’’ हे तत्त्वज्ञान त्याने एमील झोला ह्या फ्रेंच कादंबरीकारापासून आत्मसात केले. शिवाय श्रेष्ठ इंग्रज कादंबरीकार टॉमस हार्डी ह्याच्याकडून त्याने प्रादेशिक कादंबरीलेखनाचा ध्वज घेतला, असेही म्हटले जाते. बेनेटचे सूक्ष्म निरीक्षण, प्रभावी वर्णनशैली व तीक्ष्ण उपरोध ह्यांचा त्याच्या कादंबऱ्यांतून प्रत्यय येतो. बेनेटच्या व्यक्तिरेखा स्वतःच्या भावबळावर जगत असल्या, तरी त्या आपल्या भावनांचे प्रदर्शन मात्र करीत नाहीत. कलात्मक अलिप्तता हे त्याच्या कादंबऱ्यांचे आणखी एक लक्षणीय वैशिष्ट्य होय. स्वतःचे भाष्य वा मतप्रदर्शन त्याने कटाक्षाने टाळलेले आहे. तरीही स्त्रियांच्या दुःखाविषयीची अनुकंपा त्याच्या लिखाणात जाणवते. माइलस्टोन्स (१९१२ एडवर्ड नॉब्लॉक ह्या लेखकाच्या सहकार्याने) आणि त्याच्या एका कादंबरीवर आधारलेले द ग्रेट अड्व्हेंचरर (१९१३) अशी काही नाटके त्याने लिहिली असली, तरी नाटककार म्हणून त्याला फारसे यश मिळाले नाही. त्याने काही कथाही लिहिल्या असून टेल्स ऑफ फाइव्ह टाउन्स (१९०५), द ग्रिम स्माइल ऑफ द फाइव्ह टाउन्स (१९०७)ह्यांसारख्या कथासंग्रहांतूनही उपर्युक्त पाच गावातील जीवनाचे दर्शन त्याने घडविले आहे. लंडन येथे तो निधन पावला.

संदर्भ : 1. Darion, F.J.H. Arnold Bernett, London, 1924. 2. Lafourcade, Georges, Arnold Bemnett : A Study, London 1939.

बापट, गं. वि.