आर्नल्ड, मॅथ्यू : (२४ डिसेंबर १८२२–१५ एप्रिल १८८८). एक प्रसिद्ध इंग्रज कवी, साहित्यसमीक्षक आणि विचारवंत. जन्म इंग्लंडमधील लेलहॅम येथे.  शिक्षण रग्बी, विंचेस्टर आणि ऑक्सफर्ड येथे.  ऑक्सफर्डला शिकता असताना काव्यरचनेचे न्यूडिगेट पारितोषिक त्यास मिळाले होते. ‘शाळा निरीक्षक’ म्हणून त्याने बरीच वर्ष काम केले.  ऑक्सफर्ड येथे काव्याचा प्राध्यापक म्हणूनही त्याने काम केले (१८५७–१८६७).

द स्ट्रेड रेव्हलर अँड अदर पोएम्स (१८४९) हा त्याचा पहिला काव्यसंग्रह. त्यानंतर १८६७ पर्यंत त्याचे आणखी पाच काव्यसंग्रह प्रसिद्ध झाले. ‘डोव्हर बीच’, ‘दर फरसेकन मरमन’,‘रग्बी चॅपल’यांसारख्या भावकवितांबरोबरच त्याने ‘सोराब अँड रस्तुम’, ‘मेरोपी’, ‘ए ट्रॅजेडी एंपेडोक्लीझ ऑन एटना’ यांसारखी कथाकाव्येही लिहिली.  स्कॉलर जिप्सी (१८५३) ह्या काव्यातून एका ध्येयवादी ज्ञानपिपासूची प्रतिमा साकार करून तिच्या पार्श्वभूमीवर आधुनिक  जीवनातील अंतर्विरोध त्याने उघड केले आहेत.

आर्नल्डची कविता मूलतः चिंतनशील आहे. ती आकादमिक असल्याची टीका टी. एस्. एलियटसारख्या समीक्षकांनी केलेली आहे. टेनिसन आणि ब्राउनिंग ह्या त्याच्या समकालीनांची कीर्ती त्याला लाभली नाही. ढासळत्या श्रद्धांबरोबर उद्‌ध्वस्त होणाऱ्या आत्माचे व्यथादर्शन त्याच्या कवितेतून घडते. त्याची वैचारिक निष्ठाही तीतून प्रत्ययास येते.

साहित्यसमीक्षक म्हणून आर्नल्डचे स्थान फार महत्त्वाचे आहे. समग्र यूरोपीय साहित्याचा आणि संस्कृतीचा एकत्रित विचार करून साहित्याला परिपोषक अशी भूमिका मांडणारा इंग्लंडमधील तो पहिलाच समीक्षक होय. साहित्य हे जीवनावरील भाष्य असते, असे मत त्याने मांडले. भव्योत्कट संघर्षाच्या चित्रणामुळे मानवी मनाला फार पूर्वीपासून उच्चतम आनंदाचा लाभ होत आलेला असल्यामुळे त्यांना अनुकूल असे विषयच वाङ्‍‌मयीन दृष्ट्या योग्य ठरतील, असे आर्नल्डला वाटत होते. वाङ्‍‌मयाचा जीवनाशी निकटचा संबंध असून पलायनवृत्तीला आणि बेछूट प्रवृत्तीला उपकारक ठरणारे वाङ्‍‌मय उपयोगाचे नाही असे त्याचे विचार होते. प्रतिभाशाली साहित्यिकाच्या अवताराची पूर्वतयारी करून ठेवणे, हे त्याने टीकेचे एक महत्त्वाचे कार्य मानले.  इंग्रजी तसेच विविध यूरोपीय साहित्यिकांवर त्याने उत्तम दर्जाचे समीक्षात्मक लेखन केले. त्यातील वर्ड्‌स्वर्थवरील त्याचा लेख विशेष प्रसिद्ध आहे. होमरचे भाषांतर आणि उत्कृष्ट वाङ्‍‌मयीन शैली या विषयांवरील त्याचे विचार चिंतनीय आहेत. प्रसिद्ध इंग्रजी स्वच्छंदतावादी कवी शेली यावरील त्याच्या निबंधात रसिकतेचा अभाव काही प्रमाणात आढळतो. एकोणिसाव्या शतकातील औद्योगिकीकरणामुळे बुद्धिवादी दृष्टिकोनाचे महत्त्व वाढून धर्मश्रद्धा लोप पावू लागली. अशा परिस्थितीत धर्माची जागा काव्यच भरून काढील, असा विश्वास आर्नल्डने व्यक्त केला. आर्नल्डच्या समीक्षेचे आता पुनर्मूल्यमापन होऊ लागले असून त्याच्या बऱ्याच प्रमेयांवर आक्षेपही घेतले जातात. ऑन ट्रान्स्लेटिंग होमर (१८६१), एसेज इन क्रिटिसिझम (१८६५), ऑन द स्टडी ऑफ केल्टिक लिटरेचर (१८६७), लिटरेचर अँड डॉग्मा (१८७३) हे त्याचे महत्त्वाचे टीकाग्रंथ होत.

लोकशाही,  समता, संस्कृती, अराजकता, धर्मसत्ता इ. विषयांवर त्याने महत्त्वपूर्ण विचार मांडले.  लोकशाही यशस्वी करण्यासाठी ज्यांचे आपण सेवक आहोत, त्यांना शहाणे करणे हे आपले कर्तव्य आहे, या त्याच्या मताचा विस्तार कल्चर अँड ॲनर्की (१८६९) या त्याच्या ग्रंथात आणि ‘इक्वॉलिटी’, ‘डेमॉक्रसी’ यांसारख्या त्याच्या निबंधांत त्याने केला आहे.  सरंजामदारवर्ग, मध्यमवर्ग आणि सर्वसामान्य जनता या त्याच्या काळातील तिन्ही वर्गांचे विश्लेषण तो करतो.  समाजातील विषमता कमी झाल्याशिवाय व शिक्षणाने सर्वांची मने संस्कारित झाल्याशिवाय बाह्य समृद्धीला खरे सामर्थ्य येणार नाही, असे त्याने म्हटले आहे.  या संदर्भात समाजातील मध्यमवर्गावर विशेष जबाबदारी आहे, असेही त्याने म्हटले आहे. त्याची धर्मविषयक भूमिका उदारमतवादी असल्यामुळे सनातनी व सुधारक या दोहोंकडून त्याची उपेक्षा झाली.

आर्नल्डचे काव्यविषयक विचार कोणत्याही कालखंडात विचारार्ह ठरण्यासारखे आहेत.  सुसंस्कृतता, सदाचार, संयम यांसारख्या मूल्यांचा निष्ठेने पुरस्कार करणाऱ्या व्हिक्टोरियन काळाचा तो एक महत्त्वाचा प्रतिनिधी होय.  लिव्हरपूल येथे तो मरण पावला.

संदर्भ: 1. Brown, E. K. Matthew Arnold: A Study in Conflict, Toronto, 1948. 

          2. Chambers, E. K. Matthew Arnold: A Study, Oxford, 1947. 

          3. Jump, J. D. Matthew Arnold, London, 1955.

देशपांडे, मु. गो.