टॉमसन, जेम्स–२ : (२३ नोव्हेंबर १८३४–३ जून १८८२). स्कॉटिश कवी. ‘बी. व्ही.’ ह्या टोपण नावाने त्याने इंग्रजीतून लेखन केले. पोर्ट ग्लासगो, स्कॉटलंड येथे तो जन्मला. सैनिकी शाळेत काही काळ त्याने अध्यापकाची नोकरी केली. तथापि शिस्तभंगाच्या आरोपावरून तेथून त्याला काढून टाकण्यात आले. ब्रॅडलॉ ह्या विचारवंताच्या प्रभावाने नॅशनल रिफॉर्मर ह्या साप्ताहिकात त्याने लेखन केले आणि विचारस्वातंत्र्याचा पुरस्कार केला. ‘द सिटी ऑफ ड्रेडफुल नाइट’ ह्या काव्यामुळे तो आज मुख्यतः ओळखला जातो. नॅशनल रिफॉर्मर ह्याच साप्ताहिकात १८७४ मध्ये प्रथम प्रसिद्ध झालेल्या ह्या कवितेत शहरी जीवनातील माणुसकीचा अभाव, भकासपणा आणि भेसूरपणा प्रभावीपणे वर्णिला आहे. त्यात नैराश्य व नास्तिकता प्रभावीपणे व्यक्त झालेली आहे. व्हेन्स स्टोरीज अँड अदर पोएम्स (१८८१) आणि इन्सोम्निआ (१८८२) हे त्याचे काही काव्यसंग्रह. सटायर्स अँड प्रोफेनिटीज (१८८४) ह्या नावाने त्याचे गद्यलेखन संगृहीत करण्यात आलेले आहे. लंडन येथे तो निधन पावला.

देशपांडे, मु. गो.