गे, जॉन :  (३० जून १६८५ — ४ डिसेंबर १७३२). इंग्रज कवी आणि नाटककार. जन्म डेव्हनशरमधील बार्नस्टपल येथे. तेथेच शालेय शिक्षण. काही काळ लंडनमधील एका रेशीम व्यापाऱ्याकडे उमेदवारी. लंडन येथेच त्याच्या आयुष्याचा बराचसा काळ त्याने व्यतीत केला. रूरल स्पोर्ट्‌स (१७१३) आणि ट्रिव्हिआ :  ऑर, द आर्ट ऑफ वॉकिंग द स्ट्रीट्स ऑफ लंडन (१७१६) ही आरंभीची उल्लेखनीय काव्ये. हॉरिस आणि व्हर्जिल ह्या रोमन कवींचा त्यांवर प्रभाव आहे. गे याला खरी कीर्ती मिळवून दिली द बेगर्स ऑपेरा (१७२८) ह्या त्याच्या संगीतिकेने. तत्कालीन समाजातील नैतिक अधःपाताचे- विशेषतः इंग्लंडचा तत्कालीन पंतप्रधान रॉबर्ट वॉल्पोल ह्याच्या कारभाराचे — उत्कृष्ट विडंबन त्याने ह्या संगीतिकेत केले आहे. हिचाच उत्तरभाग म्हणून लिहिलेल्या पॉली (१७२९) ह्या संगीतिकेवर बंदी आली होती. लंडनमध्ये तो निधन पावला. 

भागवत, अ. के.