स्कॉट, सर वॉल्टर : (१५ ऑगस्ट १७७१ — २१ सप्टेंबर १८३२). स्कॉटिश कादंबरीकार आणि कवी. जन्म एडिंबरो येथे. त्याचे वडील वकील होते आणि आई एका डॉक्टरांची कन्या होती. बालपणा-पासूनच त्याला वाचनाची आवड होती. कविता, नाटके, इतिहास, परीकथा, रोमान्स असे विविध प्रकारचे वाचन तो करीत असे. एडिंबरो विद्यापीठात त्याचे शिक्षण झाले. त्याच्या घरात वकिलीची परंपरा होती आणि त्यानेही तो व्यवसाय स्वीकारण्याची तयारी केली होती. काही काळ त्याने तो व्यवसाय केलाही पण लेखन–वाचनातच तो जास्त रमला.

सर वॉल्टर स्कॉट

इटालियन, स्पॅनिश, फ्रेंच, जर्मन, लॅटिन या भाषा त्याला अवगत होत्या. त्याच्या साहित्यसेवेच्या आरंभीच्या काळात त्याने विख्यात जर्मन महाकवी ⇨ गटे  ह्याच्या एका नाटकाचा अनुवाद केला काही जर्मन कवितांची भाषांतरे केली. मिन्स्ट्रेल्सी ऑफ द स्कॉटिश बॉर्डर (३ खंड, १८०२-०३) हे स्कॉटिश बॅलडरचनांचे संकलन प्रसिद्ध केले. त्याच्या हाती आलेल्या रचनांत मूळ कवींच्या शब्दांची अपभ्रष्ट रूपे असावीत, असे वाटल्यामुळे त्याने ह्या रचनांना त्यांचे मूळ स्वरूप प्राप्त करून देण्याचा प्रयत्न केला. ह्याप्रयत्नात काही रचना अतिशय परिणामकारक झाल्या. काही कवितांना स्वच्छंदतावादी वळण मिळाले. स्वतः स्कॉट त्या वेळी जर्मन स्वच्छंदतावादाच्या प्रभावाखाली आलेला होता. या संकलनाने स्कॉटला जनमानसात ख्याती प्राप्त करून दिली त्याचप्रमाणे त्याच्या लोककवितेकडे अनेकांचे लक्ष वेधून तिच्यात त्यांचे स्वारस्य निर्माण झाले. १८०५ मध्ये द ले ऑफ द लास्ट मिन्स्ट्रेल ( सहा सर्ग ) हे त्याचे कथाकाव्य प्रसिद्ध झाले. त्याच्या अनेक आवृत्त्या निघाल्या. त्यानंतर प्रसिद्ध झालेली मार्मिअन (६ सर्ग, १८०८ ), द लेडी ऑफ द लेक ( सहा सर्ग, १८१०) ही त्याची कथाकाव्येही अतिशय यशस्वी ठरली. ह्याच काळात इंग्रज कवी ⇨ जॉन ड्रायडन ह्याच्या ग्रंथांची संपादित आवृत्ती ड्रायडनच्या चरित्रा-सह त्याने प्रसिद्ध केली (१८ खंड , १८०८). १८१४ मध्ये त्याने ⇨ जॉनाथन स्विफ्ट च्या ग्रंथांच्या १९ भागांची आवृत्ती प्रसिद्ध केली. तत्पूर्वी १८१३ च्या सुमारास स्कॉटला कथाकाव्ये रचण्यापेक्षा वेगळे काहीतरी करावे, असे वाटू लागले. त्या वेळी ⇨ लॉर्ड बायरनची (१७८८— १८२४) कथाकाव्ये प्रसिद्ध होऊ लागली होती. त्या कथाकाव्यांनी सर्वश्रेष्ठ कथाकवी म्हणून आपले स्थान झाकोळून जाण्याचा संभवही त्याला जाणवला असावा. त्यामुळे तो कादंबरीलेखनाकडे वळला. १८१४ मध्ये वेव्हर्ली  ही त्याची पहिली कादंबरी प्रसिद्ध झाली ( ह्या कादंबरीचा काही भाग त्याने काही वर्षांपूर्वीच लिहून ठेवला होता ). ब्रिटिश सिंहासनावर स्ट्यूअर्ट घराण्याची पुनर्स्थापना करण्यासाठी १७४५ मध्ये झालेले बंड हा ह्या कादंबरीचा विषय. एडवर्ड वेव्हर्ली ह्या ‘ रोमँटिक ’ स्वभावाच्या तरुणाचा ह्या बंडाशी आलेला संबंध आणि त्याला आलेले अनुभव यांवर स्कॉटने इतिहासाच्या एका नाट्यमय टप्प्यावर उभ्या असलेल्या इंग्लंडचे जिवंत, वेधक चित्र ह्या कादंबरीत उभे केलेले आहे. ते करताना स्कॉटिश समाज, त्यातील राजकीय गट, सांस्कृतिक रीतिपद्धती ह्यांचे प्रत्ययकारी दर्शन त्याने घडवले. ह्या कादंबरीच्या वाचनातून आपण काहीतरी नवे आणि प्रभावी अनुभवतो आहोत ह्या भावनेने फार मोठ्या वाचकवर्गाचा प्रतिसाद ह्या कादंबरीला मिळाला. ह्या कादंबरीवर स्कॉटने लेखक म्हणून त्याचे नाव दिलेले नव्हते. पुढे ‘ बाय द ऑथर ऑफ वेव्हर्ली ’ — वेव्हर्लीच्या लेखकाची कृती — असा निर्देश त्याच्या कादंबर्‍यांवर येऊ लागला. त्यामुळे स्कॉटलंडच्या इतिहासावर लिहिलेल्या त्याच्या कादंबर्‍या ‘ वेव्हर्ली कादंबर्‍या ’ म्हणूनच ओळखल्या जातात. १८२७ मध्ये ह्या कादंबर्‍यांचा लेखक म्हणून स्कॉटचे नाव जाहीर करण्यात आले.

  ‘वेव्हर्ली कादंबर्‍यां’तून त्याचप्रमाणे नंतरच्या त्याच्या कादंबर्‍यांतूनही एक लेखक म्हणून त्याच्या अंतःशक्ती समर्थपणे प्रकटलेल्या आहेत. त्याच्यातल्या जन्मजात कथाकथनकाराने आपल्या ऐतिहासिक कादं-बर्‍यांतून वैविध्यपूर्ण आणि वाचकांची मने गुंतवून ठेवणार्‍या कित्येक व्यक्तिरेखा निर्माण केल्या. परिणामकारक संवादलेखनाची ताकद त्याच्या ठायी होती. स्कॉटलंडचा इतिहास, तेथील सामाजिक जीवन, त्या समाजाच्या विविध स्तरांतील लोकांच्या वृत्तिप्रवृत्ती आणि आचार ह्यांचे सखोल ज्ञान त्याच्याकडे होते. सरदार-उमरावांच्या जगाचे, त्यांच्या राजकीय परिसराचे दर्शन तो सहज घडवू शकत होता पण त्या जगालाच विशेष महत्त्व देणार्‍या ऐतिहासिक कथात्मक साहित्याच्या मळलेल्या वाटेने न जाता त्याने सर्वसामान्य माणसांना आपल्या कादंबर्‍यांतून दिलेले महत्त्व लक्षणीय  आहे. आपल्या चित्रमय शैलीने त्याला आपल्या व्यक्तिरेखांप्रमाणेच सतराव्या-अठराव्या शतकांत राजकीय आणि धार्मिक वादांनी उसळत राहिलेल्या स्कॉटलंडचेही जिवंत चित्रण करता आले. त्याच्या संपन्न पण सहज ओघवत्या भाषाशैलीत भावगेयतेच्या सौंदर्याबरोबरच पारदर्शक वर्णनात्मकताही आढळते.

स्कॉटच्या कादंबर्‍यांचे विषय आणि त्यांत प्रकट झालेला परिसर ह्यांच्या आधारे त्याच्या कादंबर्‍यांची एक वर्गवारी करता येईल : पहिला वर्ग स्कॉटिश इतिहासावर आधारलेल्या कादंबर्‍यांचा. त्यात द ब्लॅक ड्वार्फ (१८१६), ओल्ड मॉर्टॅलिटी (१८१६), रॉब रॉय (१८१७), द हार्ट ऑफ मिड्लोथिअन (१८१८), ए लेजंड ऑफ मॉन्ट्रोज (१८१९), द मॉनॅस्टरी (१८२०) आणि द ॲबट (१८२०) अशा काही कादंबर्‍यांचा समावेश होतो. 

  ह्या कादंबर्‍यांच्या लेखनानंतर स्कॉट इंग्लंडच्या इतिहासावरील कादंबरीलेखनाकडे वळला. हा त्याच्या कादंबर्‍यांचा दुसरा वर्ग. त्यानेच निर्माण केलेल्या ऐतिहासिक कादंबर्‍यांच्या वाचकवर्गाची वाढती भूक हे जसे एक कारण ह्यामागे होते, तसेच त्याची खालावलेली आर्थिक परिस्थिती हेही एक कारण होते. मुद्रण-प्रकाशनाच्या व्यवसायात असलेल्या एका व्यक्तीबरोबर त्याने भागीदारी केली होती. ही संस्था जेव्हा आर्थिक आपत्तीत सापडली, तेव्हा तिला दिवाळखोरीपासून वाचविण्यासाठी स्कॉटलाच पुढे व्हावे लागले. त्यातून झालेल्या कर्जाची फेड करण्यासाठी लेखन करून पैसा मिळवणे आवश्यक होते. शिवाय ॲबट्सफर्ड येथे त्याने एक घर बांधायला घेतले होते. त्यासाठीही बराच खर्च होत होता. त्यात त्याने प्राचीन वस्तूंचा मोठा संग्रह केला होता. इंग्लंडच्या इतिहासावरील त्याच्या कादंबर्‍यांत इव्हान्हो (१८२०) ही त्याची आरंभीची आणि खूप लोकप्रिय ठरलेली कादंबरी होय. ह्या कादंबरीचे कथानक बाराव्या शतकातल्या इंग्लंडमध्ये घडते. द फॉर्च्यून्स ऑफ निगेल (१८२२), द टॅलिस्मन (१८२५), वुडस्टॉक (१८२६) या ह्या वर्गातील अन्य काही कादंबर्‍या. गाय मॅनरिंग (१८१५) आणि द अँटिक्वरी (१८१६) ह्या कादंबर्‍या जवळपास समकालीन वातावरणाशी निगडित म्हणता येतील.

  स्कॉटलंडच्या इतिहासाशी निगडित अशा कादंबर्‍या लिहिताना स्कॉटचा आपल्या मातृभूमीकडे पाहण्याचा एक प्रकारचा द्विधाभाव दिसून येतो. स्कॉटलंड आणि इंग्लंड ह्यांचे एकीकरण एका दृष्टीने त्यालास्वागतार्ह वाटत होते. कारण त्यातून व्यापारी प्रगती आणि आधुनिकी-करण हे फायदे मिळण्याची शक्यता होती पण ह्या एकीकरणामुळे नष्ट झालेले स्कॉटलंडचे स्वातंत्र्य आणि त्याच्या राष्ट्रीय परंपरा ह्यांची जाणीव त्याला क्लेशकारक वाटत असे. ह्या द्विधाभावातून त्याच्या कादंबर्‍यांत आलेला ताण अनेकदा जाणवतो. स्कॉटने काढलेल्या क्वार्टर्ली रिव्ह्यू ह्या वाङ्मयीन पत्रिकेमुळे ( जर्नल ) एडिंबरोला लंडनबाहेरील ब्रिटिश बौद्धिक जीवनाचे प्रभावी केंद्र, हे स्थान प्राप्त झाले. १८२० मध्ये त्याला बॅरोनिट करण्यात आले.

  रॉबर्ट कॅडेल ह्याने स्कॉटच्या ग्रंथांच्या आवृत्त्या काढल्या आहेत : वेव्हर्ली कादंबर्‍या, ४८ खंड (१८२९ — ३३)  काव्यग्रंथ, २८ खंड (१८३४ — ३६) आणि संकीर्ण गद्यग्रंथ, २८ खंड (१८३४ — ३६).

ॲबट्सफर्ड येथे तो निधन पावला.

 संदर्भ : 1. Brown, David, Walter Scott and the Historical Imagination, 1979. 

           2. Davie, Donald, The Heyday of Sir Walter Scott, 1971. 

           3. Gordon, Robert C. Under Which King : A Study of  the Scottish Waverley Novels, 1969. 

           4. Grierson, H. J. C. Sir  Walter Scott, Bart., A New Life, 1971. 

           5. Johnson,Edgar, Sir Walter Scott : The Great Unknown, 2 Vols., 1970. 

           6. Lockhart, J. G. Memoirs of the Life of Sir Walter Scott, 3 Vols., 1836–38. 

           7. Muir, Edwin, Scott and Scotland, 1982.

 कुलकर्णी, अ. र.