वोल सोयिंका

सोयिंका, वोल : (१३ जुलै १९३४). एक श्रेष्ठ नायजेरियन नाटककार आणि कवी. जन्म नायजेरियातील आबेओकूटा येथे एका निग्रो कुटुंबात. शिक्षण ईबादान येथील ‘गव्हर्नमेंट कॉलेज’ आणि ‘युनिव्हर्सिटी कॉलेज’ येथे. ‘गव्हर्नमेंट कॉलेजा’त नाट्यविषयक उपक्रमांची एक चांगली परंपरा होती. तिचे काही संस्कार सोयिंकावर झाले. ‘युनिव्हर्सिटी कॉलेजा’त कलाविषयक एक अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर तो इंग्लंडला आला आणि लीड्स विद्यापीठात शिक्षण घेऊन (१९५४–५८) त्याने इंग्रजी विषयात बी.ए. ची पदवी संपादन केली. ह्याच कालखंडात त्याने द हाउस ऑफ बॅनीगेजी (१९५६), द लायन अँड द ज्यूएल (१९५७) आणि द स्वाँप ड्वेलर्स ही आपली आरंभीची नाटके लिहिली. ह्यांपैकी द स्वाँप ड्वेलर्स ही नाट्यकृती ‘लंडन स्टुडंट ड्रामा फेस्टिवल’ ह्या नाट्यमहोत्सवात सादर केली गेली (१९५८). लंडनच्या ‘रॉयल कोर्ट थिएटर’शी निगडित असलेल्या ‘रायटर्स ग्रुप’चा तो सदस्य होता. द इन्व्हेन्शन ही त्याची एकांकिका ‘रॉयल कोर्ट थिएटर’मध्ये सादर केली गेली होती (१९५९). १९६० च्या आरंभी नायजेरियाला परत आल्यानंतर त्याला ईबादान विद्यापीठात नाट्यविषयक संशोधनासाठी अधिछात्रवृत्ती मिळाली. १९६० मध्येच त्याने ‘मास्क्स कंपनी’ ही नाट्यसंस्था स्थापन केली. १९६२–६७ ह्या कालखंडात द रिपब्लिकन (१९६४) आणि बिफोर द ब्लॅकआउट (१९६५) ही त्याची उपरोधप्रचुर नाटके सादर झाली. द रोड (१९६२) हे नाटक ‘कॉमनवेल्थ आर्ट्स फेस्टिव्हल’ लंडन येथे सादर करण्यात आले. कोंगीज हार्व्हेस्ट (१९६६) हे त्याचे एक महत्त्वपूर्ण नाटक ह्याच काळातले.

उपर्युक्त द स्वाँप ड्वेलर्स हे सोयिंकाचे पहिले प्रकाशित नाटक. एकीकडे देशात होणारी आमूलाग्र परिवर्तने आणि दुसरीकडे नैसर्गिक आपत्तींचे कायमचे बळी ठरणे, अशा दोन्ही बाजूंनी कोंडीत सापडलेल्या आपल्या देशबांधवांबद्दलची एक खोल कणव त्याने ह्या नाटकात प्रकट केली आहे. ए डान्स ऑफ द फॅारेस्ट्स (१९६०) ह्या नाटकात एका जमातीचा उत्सव त्याने दाखवला. ह्या उत्सवासाठी देव भूतकालीन वीरांच्या गौरवाची भाषणे करणारे वक्ते पाठवत नाहीत, तर काही अस्वस्थ मृतात्म्यांना तेथे पाठवतात जे त्यांच्या यातनांचे वर्णन करतात. भूतकाळ आणि वर्तमानकाळ हा सारखाच वेदनामय आहे स्वार्थ, अप्रामाणिकपणा आणि लालसा हे अवगुण भूतकाळातल्याप्रमाणेच वर्तमानकाळातही असतात असा आशय ह्या नाट्यकृतीतून व्यक्त केला होता. अनेक समीक्षकांच्या मते, सोयिंकाची ही एक उत्कृष्ट नाट्यकृती होय. द रोडमध्ये, अधिकारशाही गाजवणारे आफ्रिकन नेतृत्व आणि एकूणच नायजेरियन समाज ह्यांबद्दल त्याने भ्रमनिरास व्यक्त केला आहे.

सोयिंकाच्या नाटकांत पश्चिमी नाट्यवैशिष्ट्ये आणि आपल्या जमातीच्या परंपरा व लोककथा यांतून उभे केलेले नाट्यविषय ह्यांचा मेळ कौशल्याने घातलेला आढळतो. डेथ अँड द किंग्ज हॉर्समन (१९७५) हे नाटक त्या दृष्टीने उल्लेखनीय आहे. त्यातील योरुबा जमातीची एक परंपरा अशी, की जेव्हा राजा मरे, तेव्हा त्याचा घोडेस्वार त्याच्या मागोमाग त्याच्या संरक्षणार्थ जाऊन स्वत:ही मरण पत्करी. अशा एका प्रसंगी एक ब्रिटिश अधिकारी ह्या आत्महत्येच्या कर्मकांडात हस्तक्षेप करून राजाच्या घोडेस्वाराला वाचवतो, तेव्हा तो घोडेस्वार जमातीच्या तिरस्काराचे लक्ष्य होतो तथापि परदेशातून नुकताच शिक्षण घेऊन आलेला राजपुत्र त्या घोडेस्वाराऐवजी स्वत:च आत्महत्या करतो. परंपरानिष्ठ योरुबा जमात आणि वसाहतवादी सत्ताधाऱ्याचे अधिकारी ह्यांच्या जगण्याच्या पद्धतींमध्ये होणारा संघर्ष ह्या नाटकातून सोयिंका प्रभावीपणे मांडतो. द स्ट्राँग ब्रीड (१९६३), ह्या नाटकातही अशाच एका पारंपरिक प्रथेचा उपयोग केलेला आढळतो. ह्या प्रथेनुसार दर वर्षी जमातीबाहेरचा एक माणूस आणून त्याचा बळीचा बकरा करायचा. असे केल्याने आपली जमात पापमुक्त होते, असा समज होता. प्रतीकात्मकता, पूर्वदृश्यचित्रण (फ्लॅश बॅक) आणि कथानकाची कौशल्यपूर्ण बांधणी ही त्याच्या नाट्यरचनेची अन्य महत्त्वपूर्ण वैशिष्ट्ये होत.

डकार येथील ‘निग्रो आर्ट्स’ उत्सवासाठी त्याने कोंगीज हार्व्हेस्ट हे नाटक लिहिले पण ते वादग्रस्त ठरले. ह्या नाटकामुळे आफ्रिकन एकता धोक्यात येईल अशी भीती व्यक्त केली गेली कारण सोयिंकाने ह्या नाटकात कोंगीच्या रूपाने त्याच्या उपरोधाचे लक्ष्य बनविलेले घानाचे अध्यक्ष क्वाहमेह एन्क्रुमाह ह्यांना ह्या नाटकाचा प्रयोग होण्याच्या आधी सत्ता सोडावी लागली होती.

सोयिंकाने द इंटरप्रिंटर्स (१९६५) आणि सीझन ऑफ ॲनॉमी (१९७३) ह्या कादंबऱ्याही लिहिल्या आहेत. इदान्रे अँड अदर पोएम्स (१९६७) आणि पोएम्स फ्रॉम प्रिझन [१९६९, ए शट्ल इन द क्रिप्ट ह्या नावाने पुन्हा प्रकाशित (१९७२)] हे त्याचे काही काव्यसंग्रह. शब्दांचा नेमका उपयोग करणारे भाषेवरील नियंत्रण, भावकवितेवरील प्रभुत्व ही त्याच्या काव्यलेखनाची काही लक्षणीय वैशिष्ट्ये. मिथ, लिटरेचर अँड द आफ्रिकन वर्ल्ड (१९७६) हा त्याचा महत्त्वपूर्ण समीक्षात्मक ग्रंथ. मॅन डाइड : प्रिझन नोट्स (१९७३) हे त्याचे आत्मचरित्रात्मक लेखन. इसारा : ए व्हॉयेज अराउंड एसे (१९९०), इबादान : द पेंकीलिमी यीअर्स, ए मेम्वार १९४६–६५ (१९९४) आणि यू मस्ट सेट फोर्थ ॲट डॉन (२००६) ही त्याची अन्य काही आत्मचरित्रात्मक पुस्तके. १९६०–६४ ह्या काळात सोयिंका हा ब्लॅक ऑर्फियस ह्या वाङ्मयीन जर्नलचा सहसंपादक होता. नायजेरियातल्या निरनिराळ्या विद्यापीठांतून त्याने साहित्य आणि नाटक ह्या विषयांचे अध्यापन केले होते. १९८६ चे साहित्याचे नोबेल पारितोषिक देऊन त्याच्या साहित्यसेवेचा सन्मान करण्यात आला. साहित्याचे नोबेल पारितोषिक मिळवणारा तो पहिला आफ्रिकन निग्रो होय. नायजेरियातील यादवी युद्धाच्या संदर्भात त्याला दोन वर्षे तुरुंगवास सोसावा लागला होता.

नोबेल पारितोषिकाव्यतिरिक्त त्याला मिळालेले सन्मान असे : लीड्स, हार्व्हर्ड आणि प्रिन्स्टन या विद्यापीठांकडून सन्माननीय डॉक्टरेट (१९७३, १९९३, २००५). तसेच २००५ मध्ये एन्साय्‌क्लोपीडिया ब्रिटानिकाच्या संपादक मंडळावर आणि सल्लागार समितीवर त्याची सदस्य म्हणून नेमणूक झाली.

कुलकर्णी, अ. र.