सॅक्व्हिल, टॉमस : (१५३६– १९ एप्रिल १६०८). इंग्रज मुत्सद्दी, कवी आणि नाटककार. जन्म इंग्लंडमधील ससेक्स परगण्यातील बकहर्स्ट येथे. १५५३ मध्ये तो लंडनमध्ये स्थायिक झाला. हार्टहॉल, ऑक्सफर्ड आणि सेंट जॉन्स कॉलेज, केंब्रिज येथे त्याचे शिक्षण झाले असावे. १५५८ मध्ये तो बॅरिस्टर झाला. त्याच वर्षी त्याला इंग्लंडच्या पार्लमेंटमध्ये प्रवेश मिळाला. त्याच्या आयुष्यात अनेक अधिकारपदे त्याला मिळाली. त्यांपैकी हेगला पाठविलेल्या परराष्ट्र शिष्टमंडळातील प्रतिनिधी व खजिनदार (१५९९–१६०३) ही महत्त्वाची होत. १५६७ मध्ये त्याला बकहर्स्टचा बॅरन करण्यातआले. अनेक राजनैतिक कामगिऱ्यांवर त्याला पाठविण्यात आले होते. १६०४ मध्ये त्याला डॉर्सट परगण्याचा सरदार करण्यात आले. ऑक्सफर्ड विद्यापीठाचा तो कुलगुरुही होता. फेरर्झ व बॉल्डविन यांनी संपादिलेल्या द मिरर फॉर मॅजिस्ट्रेट्स (१५५९) ह्या एलिझाबेथकालीन लोकप्रिय कथाकाव्यसंग्रहाचा ‘इंडक्शन’ हा प्रास्ताविक भाग आणि त्या कथाकाव्यसंग्रहातील ‘द कंप्लेट ऑफ हेन्री ड्यू क ऑफ बकिंगहॅम’ ही कविता त्याने लिहिली. सॅक्व्हिल व टॉमस नॉर्टन (१५३२–८४) यांनी रचिलेल्या द ट्रॅ जेडी ऑफ गॉरबडक (१५६१) ह्या इंग्रजीतील पहिल्या शोकात्मिकेचे शेवटचे दोन अंक सॅक्व्हिलने लिहिले आहेत.
लंडन येथे त्याचे निधन झाले.
पोळ, मनीषा