मार्कंडेय, कमला: (१९२४–  ). इंडो-अँग्‍लिअन कादंबरीकार. जन्म मद्रास येथे एका सुशिक्षित कुटुंबात. मद्रास विद्यापीठातच त्यांचे शिक्षण झाले. मद्रास येथे एका साप्ताहिकाच्या संपादकीय विभागात काही काळ काम केल्यावर त्या लंडनला गेल्या. तेथेच त्यांनी लेखनाला सुरुवात केली. नंतर लंडनमधील एका इंग्रज तरुणाशी विवाह करून त्या तेथेच स्थायिक झाल्या. त्यांचे विवाहानंतरचे नाव कमला टेलर असे असले, तरी कमला मार्कंडेय ह्या नावानेच त्या लेखन करतात. नेक्‌टर इन अ सीव्ह (१९५४) ही त्यांची पहिली कादंबरी. दक्षिण भारतातील एका खेडुताच्या कुटुंबाची वाताहात तीत दाखविली आहे. विख्यात अमेरिकन लेखिका पर्ल बक ह्यांच्या गुड अर्थ ह्या विश्वविख्यात कादंबरीशी ह्या कादंबरीची तुलना केली गेली व त्यामुळे त्यांचे नाव सर्वत्र गाजले. ह्या कादंबरीतील वातावरण ग्रामीण असले, तरी सम इनर फ्यूरी (१९५५) ही त्यांची शोकात्म कादंबरी म्हणजे एक शहरी प्रेमकथा आहे. अ सायलेन्स ऑफ डिझायर (१९६१) ही त्यांची सर्वोत्कृष्ट कादंबरी. दांडेकर नावाच्या एका कारकुनाच्या पत्‍नीची श्रद्धा एका स्वामीवर जडल्यामुळे त्याच्या वैवाहिक जीवनात उठलेले वादळ हे ह्या कादंबरीचे मुख्य कथासूत्र, श्रद्धा व विज्ञाननिष्ठा तसेच वैयक्तिक आणि सामाजिक हित ह्यांतील अंतर्विरोध ह्या कादंबरीत प्रभावीपणे दाखविलेला आहे. पझेशन (१९६४) ह्या कादंबरीत इंग्‍लंडमधील वातावरण आहे. इंग्‍लंडला जाण्याची संधी मिळाल्यानंतर तेथे जाऊन स्वैराचार करणारा नायक ह्या कादंबरीत त्यांनी रंगविलेला आहे. अ हँडफुल ऑफ राइस ही एका उनाड खेडूत तरुणाची कहाणी. जुन्या, परंपरागत समजुती आणि विज्ञानाधिष्ठित जीवनदृष्टी ह्यांचा संघर्ष कॉफर डॅम्‌स (१९६१) मध्ये पाहावयास मिळतो. द नोव्हेअर मॅन (१९७३) मध्ये श्रीनिवास हा इंग्‍लंडमधील वृद्ध भारतीय आणि त्याला त्याच्या दुःखात साथ देणारी मिसेस पिकरिंग ही इंग्रज महिला ह्यांचा समाजाकडून होणारा छळ चित्रित केला आहे. टू व्हर्जिन्स ह्या कादंबरीत ग्रामीण आणि शहरी जीवनद्दष्टींतील विरोध दर्शविला आहे, तर द गोल्डन हनिकोम (१९७७) ही ब्रिटिश साम्राज्यशाहीच्या काळातील एका रजपूत संस्थानाच्या अनौरस राजपुत्राची कथा, प्‍लेझर सिटी (१९८२) ही त्यांची अलीकडची कादंबरी.

कमला मार्कंडेय ह्यांच्या कादंबऱ्यांत पार्श्वभूमी, पात्रे व घटना विपुल आणि वैविध्यपूर्ण असतात. समरप्रसंग रंगवून सांगण्याचे कसब, प्रत्ययकारी वर्णने, जीवनविषयक चिंतन आणि ऋजू, प्रासादिक शैली ही त्यांच्या कादंबरीलेखनाची काही ठळक वैशिष्ट्ये. त्यांच्या कादंबऱ्या वाचनीय असल्या, तरी त्यांतील जीवनदर्शन मात्र वरवरचे वाटते.

संदर्भ : Prasad, Madhusudan, Perspectives on Kamala Markandeya, Gaziabad, 1984.

नाईक, म. कृ.