मिल्टन, जॉन : (९ डिसेंबर १६०८–८ नोव्हेंबर १६७४). इंग्रज महाकवी. लंडन शहरी एका संपन्न कुटुंबात जन्मला. लंडनच्या ‘सेंट पॉल स्कूल’ मध्ये त्याचे आरंभीचे शिक्षण झाले. केंब्रिज विद्यापीठातून त्याने बी.ए. (१६२९) आणि एम्.ए. (१६३२) ह्या पदव्या घेतल्या. ग्रीक, लॅटिन आणि इटालियन ह्या भाषांचे उत्तम ज्ञान त्याने मिळविले होते. शिवाय एका खाजगी शिकवणीच्या द्वारे तो हिब्रू भाषाही शिकला होता. विद्यार्थीदशेत असतानाच तो काव्यरचना करू लागला. विख्यात प्राचीन रोमन कवी ऑव्हिड ह्याचा प्रभाव दर्शविणाऱ्या काही लॅटिन कविता त्याने ह्या काळात रचिल्या इंग्रजीत आणि इटालियन भाषेतही काही कविता लिहिल्या. ल’ आलेग्रो आणि इल् पेन्सरोझो ही त्याची दोन इंग्रजी काव्य त्याने विद्यार्थी असतानाच लिहिली.
एम्.ए. झाल्यानंतर मिल्टन हॉर्टन, बंकिंगहॅमशर ह्या आपल्या वडिलांच्या मालमत्तेच्या ठिकाणी जवळजवळ सहा वर्षे जाऊन राहिला. थोर कवी होण्यासाठी आवश्यक ती साधना करणे, हा त्याचा तेथे राहण्यामागचा हेतू होता. इतिहास, साहित्य, तत्त्वज्ञान अशा विषयांचा त्याने तेथे स्वतंत्रपणे व साक्षेपी वृत्तीने अभ्यास केला. जेथून तो पदवीधर झाला, त्या केंब्रिज विद्यापीठातील अभ्यासक्रम उदार शिक्षणाला साजेसा नाही, अशी मिल्टनची धारणा होती. हॉर्टन येथील आपल्या वास्तव्यात मिल्टनने केलेल्या साहित्यनिर्मितीत कोमस हा मास्क (मुखवटा नाट्य-प्रथम प्रयोग १६३४) आणि लिसिडास (१६३७) ही विलापिका विशेष उल्लेखनीय. मिल्टनच्या मनाला कायम व्यापून राहिलेला विषय. ह्या विषयाचा, त्याने केलेला, पहिला नाट्यात्म आविष्कार कोमस मध्ये दिसतो. मिल्टनचा केंब्रिज विद्यापीठातील एक सहाध्यायी एडवर्ड किंग ह्याचा अपघाती मृत्यू हा लिसिडासचा विषय. गोपगीतप्रकारात (पास्टोरल) रचिलेल्या ह्या कवितेच्या निमित्ताने मिल्टनने नियती, अमरत्व, कीर्ती, जीवन-मृत्यूंचे गूढ अशा विषयांवरील आपले सखोल चिंतन सशब्द केले आहे.
मिल्टनने जे गद्यलेखन केले, त्यात त्याच्या पुस्तपत्रांचा आणि लघुप्रबंधांचा (ट्रॅक्ट्स) समावेश होतो. राजवधाची निंदा करून क्रॉमवेलच्या राजवटीवर टीका करणाऱ्यांचा समाचार घेण्यासाठी त्याने राजकीय पुस्तपत्रे लिहिली धार्मिक वादांसाठीही लिहिले. त्याने घटस्फोट, शिक्षण ह्यांसारख्या विषयांवरही लेखन केले आहे. मिल्टनची पहिली पत्नी त्याला काही काळ सोडून गेली होती, ही बाब त्याच्या घटस्फोटविषयक लेखनाला निमित्त झाल्याचे दिसते. पतीपत्नीमध्ये अनुरूपता नसणे हे घटस्फोटासाठी व्यभिचारापेक्षाही अधिक सयुक्तिक कारण होय, असा विचार मिल्टनने मांडला होता. ज्यात प्रेम नाही असा विवाह म्हणजे मानवी प्रतिष्ठेविरुद्ध केलेला गुन्हा होय, असेही त्यात त्याने म्हटले होते. शिक्षणावरील त्याचे लेखन तर प्रबोधनकालीन मानवतावादाच्या उत्कृष्ट परंपरेत बसणारे आहे. सुजाण, सुसंस्कारित आणि जबाबदार नागरिक व नेते निर्माण करणे हा मिल्टनच्या दृष्टीने शिक्षणाचा हेतू होय. ख्रिस्ती धर्माची शिकवण, प्राचीन अभिजात साहित्यकृती ह्यांबरोबर विज्ञानाच्या अभ्यासावरही त्याने भर दिला होता. मुद्रणस्वातंत्र्याचाही त्याने आपल्या लेखनातून पुरस्कार केला होता. मिल्टनची कीर्ती आज मुख्यतः अधिष्ठित आहे, ती त्याच्या पॅरडाइज लॉस्ट ह्या महाकाव्यावर. ईडनच्या नंदनवनात असलेल्या एका वृक्षाचे फळ मोहाच्या भरात खाऊन आदम आणि ईव्ह ह्यांनी ईश्वरी आदेशाचा भंग केला त्यामुळे माणसाच्या पापमय जीवनाला आरंभ झाला माणूस स्वर्ग हरवून बसला, ह्या कथेवर मिल्टनने ह्या महाकाव्याची इमारत रचिली आहे. जगातील श्रेष्ठ महाकाव्यांत पॅरडाइज लॉस्टची गणना होते. ह्या महाकाव्यातून मिल्टनमधील थोर ख्रिस्ती मानवतावादी प्रत्ययास येतो. यूरोपीय साहित्यपरंपरेचे जे सत्त्व त्याने पचविले होते, ते त्याने ह्या महाकाव्याच्या निर्मितीत ओतले. प्राचीन अभिजात साहित्य आणि मध्ययुगीन रोमान्स ह्यांच्याशी नाते सांगणारी वैशिष्ट्यपूर्ण प्रतिमासृष्टी, अनेक मिथ्यकथा, ज्यू आणि ख्रिस्ती धर्मतत्त्वे ह्या साऱ्यांचे सुंदर संश्लेषण ह्या महाकाव्यात आहे.
पॅरडाईज रीगेन्ड हे मिल्टनकृत दुसरे महाकाव्य पॅरडाइज लॉस्टचा उत्तरार्ध म्हणता येईल. आदमने स्वर्ग घालवला परंतु ख्रिस्ताने तो पुन्हा मिळवून दिला. समोर मोह उभे करणाऱ्या सैतानावर ख्रिस्ताने मात केली हा ह्या महाकाव्याचा विषय. प्रबल इच्छाशक्ती आणि ईश्वरी आज्ञांचे विनम्र पालन ह्यांच्या आधारावर माणूस स्वतःचे हरपले श्रेय परत मिळवू शकतो, हे मिल्टनने ह्या महाकाव्यातून दाखवून दिले. तथापि एक साहित्यकृती म्हणून अनेक समीक्षकांना हे महाकाव्य पॅरडाइज लॉस्टच्या तुलनेत काहीसे फिके वाटते.
2. Barker, A. Milton and the Puritan Dilemma, Toronto. 1942.
3. Bush, D. John Milton, New York, 1966.
4. Bush, D. Paradise Lost in Our Time, New York, 1945.
5. Daiches, David, Milton, New York, 1957.
6. Empson, W. Milton’s God. London. 1961.
7. Fixler, Michael, Milton and the Kingdoms of God, Evanston, III. 1966.
8. Lewis, C. S. A Preface to Paradise Lost, London, 1942.
9. Masson, D. Life of John Milton, 6 Vols., London, 1859-1894.
10. Peter, J. A. Critique of Paradise Lost, London, 1960.
11. Saurat, D. Milton, Man and Thinker, rev. ed. London, 1944.
12. Tillyard, E. M. W. Studies in Milton, London, 1951.
13. Whiting, G. Milton’s Literary Milleu, Chapel Hill, 1939.
कुलकर्णी, अ. र.
“