स्विन्बर्न, ॲल्जर्नन चार्ल्स : (५ एप्रिल १८३७—१० एप्रिल १९०९). इंग्रज कवी आणि समीक्षक. जन्म लंडनमध्ये. त्याचे शिक्षण इटन आणि ‘बॅलिओल कॉलेज’, ऑक्सफर्ड येथे झाले. १८६० मध्ये पदवी न घेताच त्याने शिक्षण सोडले; तथापि विद्यार्थिदशेत त्याचा ⇨ विल्यम मॉरिस, ⇨ डँटी गॅब्रिएल रोसेटी, एडवर्ड बर्न-जोन्स या ⇨ प्रीरॅफेएलाइट्स कवींशी परिचय झाला आणि त्यांच्या वाङ्मयीन चळवळीकडे तो आकर्षित झाला. रॅफेएल या चित्रकाराच्या प्रबोधनकालीन अभिजात कलापंरपरेतून ब्रिटिश अकादेमिक चित्रकलेतील निर्जीवपणा व सांकेतिकता यांविरुद्ध प्रतिक्रिया म्हणून ‘प्री-रॅफेएलाइट् ब्रदरहुड’ ही संघटना उभारण्यात आली होती. प्री-रॅफेएलाइटांच्या पंथाला वाङ्मयीन बाजूही होती. कीट्स, टेनिसन यांच्यासारख्या कवींच्या कवितेतील भाव-गेयतेने ते प्रभावित झाले होते. या संघटनेच्या संपर्कात आल्यानंतर स्विन्बर्न वाङ्मयनिर्मितीकडे वळला.

स्विन्बर्नला पहिले वाङ्मयीन यश मिळाले, ते त्याच्या ॲटलांटा इन कॅलिडॉन (१८६५) या प्रसिद्ध पद्यनाटकामुळे. या नाट्यकृतीत त्याने ग्रीक शोकात्मिकेचा घाट आणि आत्मा आणण्याचा प्रयत्न केला होता. पोएम्स अँड बॅलड्स फर्स्ट सीरिज हा त्याचा काव्यसंग्रह १८६६ मध्ये प्रसिद्ध झाला. स्विन्बर्नच्या सर्वोत्कृष्ट कविता या काव्यसंग्रहात अंतर्भूत आहेत. सुंदर, लवचिक आणि अनोखी लय, शब्दांच्या ध्वनींतून निर्माण होणारे विलक्षण माधुर्य आणि गुंतागुंतीच्या प्रतिमा ही त्याच्या कवितांची लक्षणीय वैशिष्ट्ये होत. ह्या कवितांतून एक ख्रिस्तविरोधी वृत्ती आणि आत्मपीडन-विकृती स्पष्टपणे प्रत्ययास येत होती. त्यामुळे हा संग्रह वादग्रस्त आणि प्रक्षोभक ठरला तथापि तरुण पिढीने मात्र या कवितांचे स्वागत केले. १८६७ मध्ये स्विन्बर्नची त्याला आदरणीय असलेल्या जोसेफ मॅझिनीशी गाठभेट झाली. त्या थोर इटालियन देशभक्ताच्या प्रभावातून मुख्यतः राजकीय स्वातंत्र्य ह्या विषयाला वाहिलेला साँग्ज बिफोर सनराइज (१८७१) हा त्याचा कवितासंंग्रह जन्माला आला. पोएम्स अँड बॅलड्स सेकंड सीरिज हा काव्यसंग्रह १८७८ मध्ये प्रसिद्ध झाला. त्यातील कवितांमध्ये त्याच्या पूर्वीच्या कवितांमधला जोम नव्हता. कवी म्हणून त्याच्या प्रभावी कारकीर्दीची अखेर होत असल्याचीच सूचना या कवितांतून मिळत होती.

ह्याच सुमारास स्विन्बर्नची प्रकृती अतिमद्यपानामुळे ढासळू लागली. त्यात त्याच्या स्वभावातल्या आत्मपीडन-विकृतीसारख्या अपसामान्य प्रवृत्तींमुळे घडून येणाऱ्या दुष्परिणामांची भर पडली. त्याला निराशेचे झटके येऊ लागले. तरीही त्यांतून सावरण्याची क्षमता त्याच्या ठायी होती आणि त्यामुळेच तो बराच काळ तग धरू शकला. १८७९ मध्ये तो पूर्णतः खचला पण त्याच्या एका मित्राने त्याला संकटातून बाहेर काढले. त्याच्या आयुष्याची अखेरची वर्षे त्याने पटनी, लंडन येथे व्यतीत केली. ह्या काळातही त्याने विपुल लेखन केले; पण त्याचे महत्त्वाचे लेखन त्याच्या आयुष्याच्या पूर्वार्धातच झाले.

स्विन्बर्नने समीक्षात्मक लेखनही केले आहे. एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धातील महत्त्वाच्या इंग्रज समीक्षकांत त्याचा अंतर्भाव होतो. त्याच्या उत्कृष्ट समीक्षालेखनात एसेज अँड स्टडीज (१८७५) हा ग्रंथ, त्याचप्रमाणे शेक्सपिअर (१८८०), व्हिक्टर ह्यूगो (१८८६), बेन जॉन्सन (१८८९) ह्यांच्यावरील दीर्घ लेखन यांचा समावेश होतो. एलिझाबेथकालीन आणि जेकोबिअन नाट्यसाहित्याचा त्याचा उत्तम व्यासंग होता. विल्यम ब्लेक, शेली, शार्ल बोदलेअर यांच्यावरही त्याने लेखन केले.

पटनी, लंडन येथे तो निधन पावला.

कुलकर्णी, अ. र.