शेली, पर्सी बिश : (८ ऑगस्ट १७९२-८ जुलै १८२२). एकोणिसाव्या शतकातील थोर व ख्यातकीर्त स्वच्छंदतावादी इंग्रज कवी. जन्म इंग्लंडमधील ससेक्स परगण्यात फील्ड प्लेस येथे एका जमीनदार कुटुंबात पर्सीझाला. वयाच्या अठराव्या वर्षी द नेसेसिटी ऑफ एथिइझम (१८११ म. शी. ‘ नास्तिकवादाची आवश्यकता’) ही पुस्तिका लिहिल्याबद्दल त्याला टॉमस जेफर्सन हॉग या त्याच्या मित्रासह ऑक्सफर्ड येथील महाविदयालयातून काढून टाकण्यात आले. त्याच्याशी मैत्री असल्यामुळे हॉगच्या बहिणीची शालेय मैत्रिण हॅरियट वेस्टबुक हिचा घरी छळ होत होता तेव्हा शेलीने पळून जाऊन तिच्याशी लग्न केले (१८११) तथापि हॅरियटशी त्याचे फार दिवस पटले नाही. याच सुमारास गॉडविन कुटुंबाशी त्याचा संबंध आला. गॉडविनच्या इनक्वायरी कन्सर्निंग पोलिटिकल जस्टिस (१७९३) या अराजकतावादी विचारसरणीच्या गंथाचा त्याच्यावर प्रभाव होताच. गॉडविनच्या सोळा वर्षांच्या मुलीच्या, मेरीच्या, प्रेमात तो पडला आणि तिच्याबरोबर फ्रान्सला पळून गेला. वाईट संगतीत सापडलेल्या हॅरियटने आत्महत्या केल्याचे कळल्यावर तो अतिशय व्यथित झाला. पुढे शेलीने मेरी गॉडविनशी लग्न केले (१८१६). हॅरियटच्या संगतीत लेक डिस्ट्रिक्टमधील मुक्कामात शेलीने ‘ क्वीन मॅब ’ ही प्रदीर्घ कविता लिहिली. शेलीच्या सर्व महत्त्वाच्या कांतिकारक संकल्पना या कवितेत आहेत. ही कविता प्रसिद्घ करण्याचा धोका पतकरण्यास कोणीही प्रकाशक तयार होईना, तेव्हा शेलीने खाजगी रीत्या ती छापून तिच्या प्रती मित्रांमध्ये वाटल्या. मेरीबरोबर बिडाप्सगेटजवळ राहात असताना शेलीने टेम्स नदीवरून दहा दिवसांची सहल केली. तेथून परत आल्यावर त्याने अलॉस्टर किंवा द स्पिरिट ऑफ सॉलिट्यूड (१८१६) हे दीर्घकाव्य आणि अनेक स्फुट कविता लिहिल्या. अलॉस्टर कवितेतील आदर्श प्रेमाच्या शोधाची कथा अखेर मृत्यूकडे जाते. आदर्शाची आणि मृत्यूची ओढ ही रोमँटिक प्रवृत्ती शेलीच्या काव्यात ठिकठिकाणी आढळते. स्वित्झर्लंडमध्ये लेक जिनीव्हा येथे ⇨ लॉर्ड बायरनच्या सहवासात त्याने ‘ हिम (Hymn) टू इंटलेक्चुअल ब्यूटी ’ आणि ‘ माँट ब्लांक ’ या कविता लिहिल्या. लंडनला परतल्यावर शेली टेम्सच्या काठी मार्लो येथे घर करून राहिला. हॉग, ⇨ टॉमस लव्ह पीकॉक,ली हंट या कवींच्या सहवासात त्याचा काळ येथे सुखाचा गेला. याच दिवसांत ⇨ जॉन कीट्स च्या एंडिमीयन या दीर्घकवितेपासून स्फूर्ती घेऊन शेलीने लाओन अँड सिथनाहे काव्य लिहिले. पुढे द रिव्होल्ट ऑफ इस्लाम या नावाने हे काव्य १८१८ मध्ये प्रसिद्घ झाले. जुलमी सत्ता आणि स्वातंत्र्य यांच्यांतील संघर्षावर आधारलेली ही दीर्घकविता आहे. शेलीचा हा सर्जनशील कालखंड होता. या काळात तो फुप्फुसाच्या व्याधीमुळे सहकुटुंब इटलीला गेला. तेथे असताना त्याने द सेन्सि (१८१९) आणि प्रॉमिथ्यूस अन्बाउंड (१८२०) ही दोन भावगीतात्मक नाट्ये लिहिली. येथेच त्याने ज्युलियन अँड मॅडलो ही काहीशी संभाषणात्मक, पण बरीचशी वर्णनात्मक दीर्घकविता लिहिली जिच्यातील ज्युलियनम्हणजे स्वतः शेली आणि काउंट मॅडलो म्हणजे बायरन असे जाणवते. आपला समवयस्क कवी कीट्स याच्याबद्दल शेलीला खूप आस्था होती. कीट्सच्या अकाली मृत्यूनंतर त्याने ॲडोनिसही गोपकाव्यात्मक विलापिका लिहिली. त्याच्या उत्कृष्ट काव्यनाट्यांमध्ये द विच ऑफ ॲटलास (१८२०) आणि ओडिपस टायरॅनस (१८२०) ह्यांचा समावेश होतो.

शेलीच्या मृत्यूनंतर त्याची पत्नी मेरी हिने हेलास (१८२२), ट्रायम्फ ऑफ लाइफ वगैरे अप्रसिद्घ भावकवितांचे संग्रह प्रसिद्घ केले पण समीक्षकांच्या मते त्याची कीर्ती त्याच्या दीर्घ, तात्त्विक आशयाच्या कवितांवरच आधारलेली आहे. शेलीच्या भावकविता ⇨ फ्रँक रेमंड लिव्हिससारख्या समीक्षकांच्या प्रखर टीकेचे लक्ष्य बनल्या पण कार्ल गाबो, ए. एन्. व्हाइटहेड यांसारख्या समीक्षकांनी शेलीच्या काव्याचा नवाच पैलू पुढे आणून त्याच्या काव्याचे पुनर्मूल्यांकन केले. ⇨विल्यम वर्ड्‌स्वर्थ आणि शेली हे दोघेही रोमँटिक परंपरेचे कवी असले, तरी शेली वर्ड्‌स्वर्थच्या अगदी विरूद्घ म्हणजे विज्ञानप्रेमी होता. विद्युत् शक्ती, अणूची रचना, अवकाश, उत्कांती अशा अनेक वैज्ञानिक संकल्पना प्रतीकात्मक रीत्या शेलीच्या काव्यात वापरलेल्या आहेत, हे प्रथमच कार्ल गाबोने दाखवून दिले. ⇨ जॉर्ज बर्नार्ड शॉने त्याच्या वैचारिक परिपक्वतेचा उल्लेख केलेला आहे. शेलीच्या ‘ अ फिलॉसॉफिकल व्ह्यू ऑफ रिफॉर्म ’ (१८१९-२०) या निबंधावरून हे स्पष्ट होते. ‘ डिफेन्स ऑफ पोएट्री ’ या निबंधाने शेलीने काव्यसमीक्षेतही भर घातलेली आहे. गोल्डन ट्रेझरीया प्रतिष्ठाप्राप्त काव्यसंगहात शेलीच्या पंधराच्यावर कविता आहेत. ‘ लाइन्स रिटन अमंग युजेनियन हिल्स ’, ‘ टू अ स्कायलार्क ’, ‘ द ओड टू वेस्ट विंड ’, ‘ द क्लाउड ’, ‘ ओड टू नेपल्स ‘ यांसारख्या त्याच्या भावकविता अनेक काव्यसंगहांतून पुनःपुन्हा प्रसिद्घ झाल्या आहेत. ली हंटला भेटण्यासाठी आपला मित्र एडवर्ड विल्यम्स याच्या-बरोबर तो बोटीतून लेगहॉर्नला गेला. ते परतताना वादळात बोट सापडून शेली आणि विल्यम्स दोघेही मरण पावले. त्याचे छिन्न-विच्छिन्न शरीर दहन करण्यात आले. दुर्दैवी कौटुंबिक जीवन, विवादय वैवाहिक जीवन, प्रेमप्रकरणे, अकाली अपघाती मृत्यू अशा रोमँटिक प्रणालीच्या व्यवच्छेदक लक्षणांनी युक्त असे शेलीचे संघर्षमय व करूणास्पद जीवन होते.

संदर्भ : 1. Barcus, James E. Ed. Shelley: The Critical Heritage, London, 1975.

2. Blunden, Edmund, Shelley: A Life Story, Toronto, 1973.

3. Cameron, Kenneth N. Ed. Shelley and His Circle, 6 Vols., Cambridge, 1961-1973.

4. Hogg, Thomas J. Life of Percy Bysshe Shelley, Folcroft, 1973.

5. Jeaffreson, John C. The Real Shelley, Darby, 1982.

कळमकर, यशवंत शं.