गॉल्झवर्दी, जॉन : ( १४ ऑगस्ट १८६७ — ३१ जानेवारी १९३३). इंग्रज कादंबरीकार आणि नाटककार. जन्म किंग्स्टन हिल, सरी येथे. शिक्षण ऑक्सफर्डला. १८९० मध्ये वकील झाला. नाविक कायद्याचा विशेष अभ्यास करण्यासाठी तो जलपर्यटनास निघाला. ह्या प्रवासात जोसेफ कॉनरॅड ह्या विख्यात अँग्लो-पोलिश कादंबरीकाराशी त्याचा परिचय झाला आणि ते निकटचे मित्र बनले. वकिलीमध्ये रस न वाटल्याने गॉल्झवर्दीने स्वतःला लेखनास वाहून घेतले. त्याचे आरंभीचे काही लेखन जॉन सिंजन ह्या टोपणनावाने प्रसिद्ध झाले. द आयलंड फॅरिसीज (१९०४) हे गॉल्झवर्दीच्या नावावर प्रसिद्ध झालेले पहिले पुस्तक होय.

द फॉरसाइट सागा  ह्या कादंबरीमालेवर गॉल्झवर्दीची कीर्ती मुख्यतः अधिष्ठित आहे. ह्या कादंबरीमालेतील कादंबऱ्या पुढीलप्रमाणे : द मॅन ऑफ प्रॉपर्टी (१९०६), इन चान्सरी (१९२०) आणि टु लेट (१९२१) इंडियन समर ऑफ अ फॉरसाइट (१९१८) आणि अवेकनिंग (१९२०) हे अनुक्रमे मॅन ऑफ प्रॉपर्टी आणि इन चान्सरी  ह्या कादंबऱ्यांना जोडलेले इंटरल्यूड्स होत.

फॉरसाइट ह्या आडनावाच्या एका मोठ्या कुटुंबाचा हा कुलवृत्तान्त आहे. ह्या घराण्याचे पूर्वज नशीब काढण्यासाठी खेड्यातून शहरात येतात. तेथे यशस्वी व्यापार करून धनिक होतात आणि फॉरसाइट मंडळींची गणना प्रतिष्ठितांत होऊ लागते. हे स्थित्यंतर केवळ पैशाच्या जोरावर घडून आलेले असल्यामुळे फॉरसाइट मंडळी लक्ष्मीपूजक बनतात. ह्या वस्तुस्थितीचा परिणाम त्यांच्या एकंदर विचारसरणीवर आणि

जॉन गॉल्झवर्दी

जगाकडे पाहण्याच्या दृष्टिकोनावर होतो. त्यामुळे निर्माण होणारे सामाजिक आणि मानसिक परिणाम ह्या कादंबरीमालेत चित्रित केले आहेत. उपर्युक्त कादंबऱ्या फॉरसाइट सागा  ह्या नावाने १९२२ मध्ये एकत्रित स्वरूपात प्रसिद्ध झाल्या. ह्या कादंबऱ्यांमुळे ‘फॉरसाइट’, ‘फॉरसाइटिझम’ असे शब्दही रूढ झाले.

  

पहिल्या महायुद्धानंतरच्या काळात फॉरसाइट घराण्याची कथा गॉल्झवर्दीने पुढील कादंबऱ्यांतून पुढे नेली : द व्हाइट मंकी (१९२४), द सिल्व्हर स्पून (१९२६) आणि स्वॉन साँग (१९२८), अ सायलेंट वूइंग (१९२७) आणि पासर्स बाय (१९२७) हे अनुक्रमे द व्हाइट मंकी आणि द सिल्व्हर स्पून  ह्या कादंबऱ्यांचे इंटरल्यूड्स होत. ह्या कादंबऱ्या अ मॉडर्न कॉमेडी  ह्या नावाने १९२९ मध्ये एकत्रित स्वरूपात प्रसिद्ध झाल्या.

महायुद्धामुळे पायाच उखडून गेलेल्या तत्त्वशून्य आणि श्रद्धाहीन समाजाचे दर्शन ह्या कादंबऱ्यांतून घडते. द सिल्व्हर बॉक्स (१९०६), स्ट्राइफ (१९०९), जस्टिस (१९१०) आणि लॉयल्टीज (१९२२) ही त्याने लिहिलेल्या नाटकांपैकी काही विशेष उल्लेखनीय नाटके. श्रीमंत आणि गरीब ह्यांना मिळणारा विषम न्याय द सिल्व्हर बॉक्समध्ये दाखविलेला आहे. स्ट्राइफमध्ये मजूर-मालक संघर्षाचे वेधक दर्शन घडविलेले आहे. जस्टिसमध्ये करण्यात आलेल्या कारागृहीय जीवनाच्या परिणामकारक वास्तववादी चित्रणामुळे इंग्लंडमधील तुरुंगांत काही सुधारणा घडून आल्या. लॉयल्टीज  ही त्याच्या साहित्यनिर्मितीच्या उत्तरकालातील एक नाट्यकृती असून तिच्यातील संविधानक आत्मपरतेकडे विशेष झुकणारे आहे.

१९३२ सालचे नोबेल पारितोषिक त्याला देण्यात आले. हॅम्पस्टेड येथे तो निधन पावला. 

संदर्भ :  Marrot, H. V. The Life And Letters of John Galsworthy, London, 1935.

बापट, गं. वि.